लव्ह इन टोकियोच्या शूटिंगवेळी जॉय मुखर्जीला आपल्या ताकदीवरचा आत्मविश्वास नडला होता…

हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी कधीकधी खूप फनी इंसिडन्स घडतात. आज हे प्रसंग पाहताना आपल्याला हसू येते पण त्यावेळी चित्रीकरणाच्या वेळी घडलेल्या गोष्टी काहींना पेनफुल आठवणीच्या असतात! तसेच संपूर्ण टीमची एका छोट्या शॉटसाठी घेतलेली तारेवरची कसरत, मेहनत असते हे लक्षात येते.

 हा किस्सा आहे प्रमोद चक्रवर्ती यांच्या १९६६ साली प्रदर्शित झालेल्या ‘लव इन टोकियो’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा. जपानमध्ये टोकियो शहरामध्ये चित्रित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होता. साठच्या दशकामध्ये ‘संगम’ च्या यशानंतर परदेशात चित्रीकरण करण्याची एक टूमच निघाली आणि भारतीय निर्माते युरोपमध्ये, मध्य आशियामध्ये आणि जपानमध्ये चित्रीकरणासाठी जाऊ लागले. 

प्रमोद चक्रवर्तींच्या ‘जिद्दी’ या यशस्वी चित्रपटानंतर जॉय मुखर्जी आणि अशा पारेख हीच पेअर ठेऊन त्यांनी या चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले. ‘जिद्दी’चे संगीत सचिन देव बर्मन यांनी दिले होते. या चित्रपटासाठीही सचिन देव बर्मनच संगीत देणार होते, परंतु त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने या चित्रपटाचं संगीत शंकर-जयकिशन यांच्याकडे आले. 

प्रमोद चक्रवर्ती या चित्रपटातील सर्व गाणी भारतातच ध्वनिमुद्रित करून जपानला घेऊन गेले होते. फक्त या चित्रपटाचे टायटल सॉंग रेकॉर्ड करायचे राहिले होते. कारण त्यामुळे नेमके मोहम्मद रफी परदेशाच्या  दौऱ्यावर गेले होते. सर्व काही शेड्युल व्यवस्थित ठरल्यावर प्रमोद चक्रवर्ती यांनी जपानला सर्व युनिट  सोबत जाण्याचा निर्णय घेतला. 

संगीतकार शंकर-जयकिशन यांना रफी आल्यानंतर ते गाणे रेकॉर्ड करून जपानला ती टेप पाठवण्याची व्यवस्था करण्याचे सांगितले. परंतु तिकडे रफीचा दौरा लांबल्यामुळे जपान मध्ये सर्व शूटिंग पूर्ण झाले होते. फक्त टायटल सॉंगचे शूटिंग राहिले होते. पण टायटल सॉंग प्रमोद चक्रवती यांच्या हातात नव्हते!

त्यामुळे त्यांनी एक भन्नाट आयडिया केली. संपूर्ण टोकियो शहराचे शूटिंग त्यांनी हेलिकॉप्टरमधून केले. हे सर्व शूट त्यांनी प्रील्यूड आणि इंटरल्यूड मध्ये वापरले. सर्व एरियल शूट पूर्ण झाले. टोकियोचे विहंगम दृश्य आपल्याला या गाण्यात दिसते. 

दरम्यान रफी भारतात परत आले. प्रमोद चक्रवर्ती यांचा रेकॉर्डिंगसाठी त्यांना सारखा सारखा निरोप जात असल्यामुळे विमानतळावरून ते घरी न जाता तडक रेकॉर्डिंग स्टुडिओत पोचले. शंकर-जयकिशन यांनी गाणे त्यांच्या हातात ठेवले. दोन तीनदा रिहर्सल झाल्यानंतर गाणं रेकॉर्ड करायचे ठरलं. 

रफीला घरी जाऊन आपल्या कुटुंबियांना भेटायची खूप घाई झाली होती. त्यामुळे त्यांनी हे गाणे थोडे हाय पेसमध्ये रेकॉर्ड केले. गाण्याचे बोल होते ‘ले गई दिल गुडिया जापान की, पागल मुझे कर दिया जापान लव इन टोकियो…’ रेकॉर्डिंग पूर्ण झाले. शंकर-जयकिशन यांनी ताबडतोब संध्याकाळच्या फ्लाईटने टेप टोकियोला पाठवली.

आता गंमत पाहा गाणे हातात नसताना त्याचे अर्ध्याहून अधिक गाण्याचे चित्रीकरण ऑल रेडी झाले होते. त्याच्यावर आता इम्पोज करून गाणे टाकायचे होते. आता फक्त काही ओळी जोय मुखर्जी आणि आशा पारेख यांच्यावर शूट करायच्या होत्या.

या गाण्याच्या चित्रीकरणाच्या दरम्यान एक गंमत झाली या गाण्यात अभिनेता जॉय मुखर्जी याला आशा पारेखना दोन्ही हातांनी उचलून झेब्रा क्रॉसिंग वरून रस्त्याच्या पलीकडे न्यायचे होते हा शॉट देखील एरियल शूट होणार होता.

ऐन गर्दीच्या ठिकाणी टोकियोच्या मध्यवर्ती भागात याचे चित्रीकरण होणार होते. त्यामुळे फार काही वाहतुकीचा खोळंबा होणार नाही म्हणून एका टेक मध्ये हा शॉट ओके करायचा होता.

तत्पूर्वी प्रमोद चक्रवर्ती यांनी जॉय मुखर्जी ला विचारले “तुम्हाला आशा पारेख ना दोन्ही हाताने उचलून घेऊन रस्ता ओलांडता येणे शक्य आहे का? नसेल तर तसे सांगा. आपण काही बदल करू!” पण जॉय मुखर्जीने उत्साहात सांगितले “का नाही? मी व्यवस्थित करेन.”

या गाण्यात जास्त लीप सिंकींग  नसल्यामुळे एका टेक मध्ये गाणे ओके होणार होते. पण या दरम्यान एक गंमत घडली. जॉय मुखर्जीने आशा पारेखना दोन्ही हातांनी उचलले खरे आणि झेब्रा क्रॉसिंग देखील पार केली पण (कदाचित?) ओझे जास्त झाल्यामुळे त्याच्या हातातून आशा पारेख  निसटली आणि ती चक्क खाली पडली!

वरून सर्व शूट होत होते. सर्व क्रू मेंबर धावत धावत आशा पारेख कडे गेले तिच्या पाठीला बराच मार लागला होता आणि पुढचे काही दिवस तिला त्याच्या वेदना देखील जाणवत होत्या. पण थोडक्यात निभावले!

गाण्यात हा शॉट सुरुवातीला दिसत असला तरी सर्वात शेवटी शूट झाला होता!  तुम्ही आजही हे गाणे युट्युब वर पाहू शकता. गाण्याच्या ओपनिंग म्युझिकमध्येच हा प्रसंग आहे नक्की पहा आणि एन्जॉय करा.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.