गेली ४८ वर्ष गावात सफाई काम करणाऱ्या मावशींनी केलाय सरपंचाच्या बायकोचा पराभव..!

महाराष्ट्रातल्या बऱ्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार नुकताच उडाला.विजयी उमेदवारांनी तरी जेसीबीनेच गुलाल उधळला.आपली बायको निवडून आली म्हणुन नवऱ्यानं तिला खांद्यावर घेत जल्लोष केला तर एका ठिकाणी बायकोनेच नवऱ्याला खांद्यावर घेतलेला फोटो तुमच्या व्हॉट्स ॲपवर आलाच असेल.

गावाच्या ग्रामपंचायतीचा मेंबर म्हणजे आमदाराला कमी नसतोय.’राजकारण म्हणजी गोर गरिबांचा खेळ नव्हं’ असं म्हणलं जातं.

पण इथं विषयच हार्ड हाय,कारण एका सफाई कर्मचारी म्हणुन काम करणाऱ्या मावशीनं इलेक्शन मध्ये थेट पराभव केलाय माजी सरपंचाच्या बायकोचा….

व्हंय तर…

त्याच झालं असं,कोल्हापुर जवळचं गडमुडशिंगी हे गाव. ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं. कोण कुठल्या वार्डात उभारणार याची फिल्डींग गावचं पुढारी लावायला लागलं. इच्छुकांची मांदियाळी लागली होती.

पण वार्ड नंबर १ मधुन एक नाव पुढं आलं ते म्हणजे दुरपामावशी…

ही गावची मावशी म्हणजे द्रौपदी रामचंद्र सोनुले….

जवळपास १९७३ पासुन दुरपामावशी गावात सफाई कर्मचारी म्हणुन ४८ वर्षे झाली काम करतेय. द्रौपदी सोनुल अतिशय गरिबीतून संसाराचा डोलारा सांभाळला. त्या नोकरीला लागल्या तेव्हा त्यांना पगार होता फक्त ६० रुपये महिन्याला. गावात ‘आपण भलं आणि आपले काम भलं’ इतकाच काय तो मावशीचा कार्यक्रम. इमानेइतबारे गावाची सेवा त्यांनी बजावली.
पतीच्या निधनानंतर मुलांचा संसार उभा केला.

एका मुलीचं लग्न लावून दिले. दुर्दैवाने दोन वर्षा पुर्वी त्यांच्या एका मुलाचे निधन झालं. पण दुरपा मावशी खचल्या नाही, हातातला झाडू खाली ठेवला नाही. गावच्या स्वच्छतेचं व्रत त्यांनी मोडलं नाही.

या जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणूकीचा नारळ फुटला अन् कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अनपेक्षितपणे गावच्या एका पुढाऱ्याने द्रौपदी मावशीला वार्ड नंबर १ मधून उभा राहाण्यासाठी गळ घातला.

दुरपामावशी म्हणाली,

‘सरपंच हे आम्हा गरिबाचं काम नव्हं,आम्ही आमचं काम करतोयच की, कशाला व्ह्यो राजकारणाचा नाद करायचा ?’

पण त्या पुढाऱ्यांनं दुरपा मावशीच १ नंबर वार्डात उभारणार अशी खुणगाठ मनात बांधलेली. मावशी होय नाय, होय नाय म्हणत तयार झाली. डायरेक्ट नोकरीचा राजीनामा दिला अन् भरला की इलेक्शनचा फॉर्म…

काही लोकं म्हणाली म्हातारी उगच या इलेक्शनच्या नादी लागली, खुशाल बघायचं आपलं काम म्हातारपणी तर व्ह्यो नाद केला.

काही जण मात्र दुरपामावशीच्या पाठीमागं ऊभा राहिली. मावशीला बळ मिळालं. दुरपामावशीच्या समोर विरोधातला उमेदवार काय साधासुधा नव्हता. त्या होत्या गावातल्याच माजी सरपंचांच्या पत्नी.

इतक्या तगड्या उमेदवारा समोर कसा निभाव लागायचा म्हणुन लोकांनी मावशीकडं दुर्लक्ष केलं. पण मतदान जवळ आलं अन् वातावरण तापायला लागलं. दुरपामावशी वार्डात फिरायला लागली, प्रचार करु लागली. लोकं हळू हळू मावशीच्या मागं जमु लागली.

वातावरण फिरलं.

मावशीनं केलेल्या सेवेचा वसा मतदारांनी जाणला. मतदारांच्या मनात दुरपा मावशीनं जागा निर्माण केली. मतदानाचा दिवस आला. वार्डात मोठ्या इर्षेने मतदान झालं. दुरपामावशी बाजी मारणार की विरोधातली माजी सरपंचाची बायको ? अशी चर्चा गावभर रंगत होती.

शेवटी निकालाचा दिवस उजाडला.

अख्ख गाव वार्ड नंबर १ च्या निकालाकडं डोळं लावून बसलं होतं. अन् शेवटी दुरपामावशीच्या नावाचा गुलाल उधळला. चांगल्याचं लीडनं मावशीनं बाजी मारली. ती ज्या पँनल मधुन ऊभा राहिली होती ते पँनल पण बसलं.

शेवटी गावानं एका सफाई कर्मचारी मावशीला ग्रामपंचायतीचं मेंबर म्हणुन निवडून दिलं. ज्या गावात कित्येक वर्ष सेवा केली तिथे हे मानाचं पद मिळालं. दुरपामावशी निवडून आल्या आणि त्यांच्या सेवा सार्थकी लागल्याची भावना गावकरी अन् द्रौपदी सोनुले या गडमुडशिंगी (ता.करवीर) गावच्या नुतन ग्रामपंचायत सदस्य व्यक्त करत आहेत.

लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून उभारलेली व्यवस्था म्हणजे ‘लोकशाही’ अशी सोप्पी व्याख्या आपल्या लोकशाहीची केली जाते. समाजातल्या एखाद्या वंचित घटकालाही समान संधी देणे हे भारतीय लोकशाहीचं एक वैशिष्ट्ये आहे.

सफाई कामगार ते ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणुन निवडून आलेल्या द्रौपदी अर्थात गावच्या लाडक्या ‘दुरपामावशी’ या एक आपल्या सशक्त लोकशाहीचं एक प्रतिक आहे असं म्हणायला हरकत नाही. 

  •  पैलवान भिडू 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.