दस का दम : संघाने केलेली ती 10 कामे ज्यांची प्रशंसा त्यांच्या विरोधकांनी पण केलेली आहे !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज भारतातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून कार्यरत आहे. भारताच्या स्वातंत्र्याआधीच्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात घडलेल्या अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडीत संघाचा सहभाग राहिला आहे.

एक सांस्कृतिक संघटना म्हणून उभी राहत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भारतात अनेकाविधी क्षेत्रात योगदान राहिले आहे. अनेक मोठ्या बदलांचे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरला आहे.

आज सत्तेत असलेल्या भाजपा या राजकीय पक्षा पासून ते असंख्य सेवाभावी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनांची निर्मिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आली आहे. अनेक वादग्रस्त विषयात संघाचा सहभाग देखील राहिला आहे. पण संघ एक विशाल संघटन म्हणून आज भारतात उभं आहे.

ह्या सर्व काळात देशसेवा म्हणून आणि समाजसेवा म्हणून संघाने अनेक कामं केली आहेत. पण आपल्याला संघाने केलेल्या कामा बद्दल माहिती आहे का?

संघाने केलेली ती 10 कामे ज्यांची प्रशंसा त्यांच्या विरोधकांनी पण केलेली आहे!

1) 1965 चा युद्धात संघाने सांभाळली होती दिल्लीची ट्रॅफिक यंत्रणा.

1965 च्या युद्धाच्या वेळी पाकिस्तानने दिल्ली जिंकण्याची घोषणा केलेली , सीमेवर युद्ध सुरू होते,  दिल्ली शहरातील संपूर्ण पोलीस व संरक्षण यंत्रणा ही युद्धसामग्री गोळा करणे आणि  कायदा व व्यवस्था टिकवण्याचा कामात व्यस्त होती. सगळी कडे गोंधळ उडालेला, अश्यावेळी दिल्ली शहरातील वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली होती. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारणा करण्यात आली.

तेव्हा संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी संघ स्वयंसेवकांना दिल्लीच्या वाहतूक यंत्रणेला नियंत्रित करण्याचे व पोलिसांनी सहयोग करण्याचे आदेश दिले. तेव्हा संघाच्या स्वयंसेवकांनी युद्धकाळात दिल्लीची वाहतूक यंत्रणा सांभाळली होती. पुढे जाऊन तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी संघाच्या कार्याची प्रशंसा केली होती.

2) आपत्ती निवारण. 

संघ देशभरात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीवेळी अथवा कुठल्याही आपत्ती वेळी मदतीसाठी धावून जात असतो.आपत्ती ग्रस्त नागरिकांची मदत करणे त्यांना औषधोपचार पुरवणे, अन्न पदार्थ पोहचवणे, ह्यासारखे अनेक कामं संघ त्यांचा स्वयंसेवकांच्या माध्यमातून करत असतो. आसाम, उत्तराखंड अथवा आता केरळ / नागालँड मध्ये आलेला पूर असो, संघाचे स्वयंसेवक मदती साठी धावून गेले आहेत.

असाच एक पूर आसामला आलेला ज्यात मोठया प्रमाणावर जीवित हानी झाली होती. त्याप्रसंगी संघाच्या स्वयंसेवकांनी मृत नागरिकांचे अंत्य दहन केले होते.

3) चित्रकूट.  

चित्रकूट पर्वत हा उत्तर प्रदेशातील अवध प्रांतात येतो, ह्या पर्वत रांगेच्या आसपासच्या भागात 70- 80 च्या दशकात गुंड चोरटे दरोडेखोरांचे राज्य होते. इथला शेतकरी हा पूर्णपणे पिचला होता. तेथील लोकांचे जीवन हे नरक यातने सारखे झाले होते. अश्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक नानाजी देशमुख, जे खासदार पण राहिले होते, त्यांनी या परिसराचा ग्रामविकासाची जबाबदारी खांद्यावर घेतली व त्यांनी 5 वर्षात ह्या भागाचा चेहरा मोहरा पालटला इथे अनेक स्वयंरोजगार प्रकल्प सुरू केले.

शेतकऱ्यांचं एकत्रीकरण करून विविध शासकीय योजना राबविल्या, वीज पुरवठा गावागावात पोहचवला आणि एका स्वयंपूर्ण प्रदेशाची निर्मिती केली. एकेकाळी डाकू आणि गुंडांनी ग्रस्त हा प्रदेश एक स्वयंपूर्ण उद्योगशील भाग बनला. संघाने केलेल्या या कामाचे कौतुक तत्कालीन जनता दलाचे नेते जयप्रकाश नारायण यांनी केले होते.

4) 1962 चं चीन युद्ध. 

1962 चा चीन युध्दावेळी पूर्वोत्तर राज्यात भारतीय आर्मी युद्ध लढत होती.अश्यावेळी आर्मीला तिथल्या अत्यंत दुर्गम आदिवासी भागात रसद पोहचवणे जिकरीचे काम होते. अश्यावेळी संघाच्या स्वयंसेवकांनी तिथे भारतीय सैन्याला रसद पुरवठा करण्याचा कामात व औषधोपचार करण्याचा कामात मदत केली होती. ह्याचं कौतुक भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं.

5) अंदमान त्सुनामी. 

2004 साली अंदमानात आलेल्या  त्सुनामी ने हाहाकार माजवला होता. तिचा फटका पूर्व किनारपट्टीला ही बसला, त्यावेळी संघाचे स्वयंसेवक अंदमान ला आपत्ती ग्रस्तांची मदत करायला बंगाल व तमिळनाडुतुन गेलेले. त्यांनी तिथे मदत कार्य केलं होतं.

6) स्वामी विवेकानंद स्मारक ,कन्या कुमारी.

कन्या कुमारी येथील भारताच्या सदूर दक्षिण टोकावर असलेल्या एका शिळेवर बसुन स्वामी विवेकानंदांनी तप करत त्यांचा भारत भ्रमण यात्रेची सांगता केली होती. तिथून त्यांनी हिंदू धर्माला विश्वात पोहचवण्याचा संकल्प केला होता. त्या भव्य शिळेवर स्वामीजींच्या स्मृती प्रित्यर्थ काही दिव्य स्मारक व्हावं अशी इच्छा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होती.

संघाचे सरकार्यवाह एकनाथ रानडे यांनी त्यासाठी तेव्हा प्रचंड कष्ट करत स्वामी विवेकानंदांचे स्मारक त्या शिळेवर उभारले. आज ते स्मारक कन्या कुमारीची ओळख बनले आहे. तो एक आकर्षक टुरिस्ट स्पॉट बनला असून त्याठिकाणी हजारो पर्यटक भेट द्यायला जात असतात. त्यामुळे भारताला व तमिळनाडू सरकारला मोठया प्रमाणात फायदा होतो. तसेच स्वामी विवेकानंदांच्या उज्ज्वल स्मृतीना पुन्हा जाग ही येते.

7) कच्छ भूकंप.

2001 साली गुजरातच्या कच्छ येथे एक विनाशकारी प्रलयंकारी भूकंप आला. ज्यात शेकडो लोक दगावले आणि असंख्य लोक जखमी झाले. त्यावेळी NDRF आणि बचाव पथकासोबत संघाच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर बचाव कार्यात मदत केली. अनेक लोकांचे प्राण वाचवले. तसेच निराधार मुलांसाठी अनाथालय काढले.

8 ) गोवा विलीनीकरणं. 

गोव्यात पोर्तुगीज सत्ते विरोधात जनमानसात असंतोषाची निर्मिती करण्यात संघाचा मोठा वाटा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गोव्यातील हिंदू समाजाला जागृत करत पोर्तुगिजांचा सत्तेला उडवून लावण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले.

ह्या असंतोषातुन पोर्तुगीज सत्तेविरुद्ध असंतोष पसरला आणि गोवा मुक्ती संग्राम लढ्याला चालना मिळाली. मुळात ख्रिस्तीकरण ह्या मुद्द्यावर हा असंतोष निर्माण करण्यात संघाला यश आले.

9) काश्मिरी पंडित.

1987 मध्ये काश्मिरी पंडितांवर अत्याचार करण्यात येत होता. मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होऊन अनेकांना आपले प्राण यात गमवावे लागले होते. अनेक काश्मिरी पंडितांना आपलं घरदार सोडून पळ काढावा लागला. ह्या वेळी देशभर विखुरलेल्या भयग्रस्त काश्मिरी पंडितांचा सेवा सुश्रुषेची तसेच पुनर्वसनाची जबाबदारी संघाने स्वीकारत अनेक काश्मिरी पंडितांना मदत पुरवली.

10) आणीबाणी. 

1975 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. त्यांनी सर्व विरोधकांना तुरुंगात पाठवलं.   राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी होती .  संघ सदस्य जेल मध्ये होते. तेव्हा संघाच्या रचनेतून निर्माण झालेल्या इतर संघटनांच्या  माध्यमातून संघाने सरकारविरोधात लढा उभारला, समाजवादी आणि कम्युनिस्ट ह्या वैचारिक विरोधकांना सोबत घेऊन हा लढा उभारण्यात आला.

इंदिरा गांधींच्या लोकशाहीविरोधी कृत्याची माहिती जनाजना पर्यंत पोहचवली. यातून पुढे वाढलेल्या दबावामुळे इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली. पुढे त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. हे सर्व शक्य झालं ते संघाने उभारलेल्या देशव्यापी लढ्यामुळे,  संघाच्या या कार्याची प्रशंसा तत्कालीन जनता दलाचे अध्यक्ष जय प्रकाश नारायण यांनी केली होती.

अश्याप्रकारे एक संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खूप मोठे योगदान स्वातंत्र्य भारतात राहिले आहे.

लेखक – नचिकेत.

हे ही वाचा.

2 Comments
  1. milind says

    बोलभिडू नचिकेत शिरुडे यांनी वर दिलेली माहिती हि याअगोदरही अनेकदा सोशल मीडियात येवून गेली असून ती अनेकांनी खोडून काढलेली आहे.आताच कर्नाटक मध्ये पूर आला तेव्हा संघ काय करत होता हे देशाने पाहिले आहे.भारतीय लष्करी जवान आणि सेवादलाचे कार्यकर्ते यांचे ड्रेस सार्धम्य याचा फायदा घेत संघांचे कार्य म्हणून आजवर थोपवण्यात येत होते.

  2. Moresh says

    He sarvach khote ahet….. Yaat kutehi satya nahi….. Satya asel tar authentic references dakhava

Leave A Reply

Your email address will not be published.