निधी नाही म्हणून उपोषणाला बसणाऱ्या आमदारांना सांगा, हा नेता नारळ फोडून मग मंजूरी घ्यायचा

राज्यात निधीचं समान वाटप होत नसल्याचं सांगत कॉंग्रेसच्या ११ आमदार उपोषण करणार असल्याची बातमी सकाळी चर्चेत आली. या बातमीमुळे महाविकास आघाडीत कुरबूरी वाढल्या असल्याची बातमी  देखील माध्यमांमधून रंगवण्यात आली.

आत्ता खुद्द राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यातून तोडगा काढणार असल्याची बातमी देखील आली. थोडक्यात काय तर महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक असणाऱ्या कॉंग्रेसला आज निधीसाठी उपोषणाला बसावे लागत असल्याचं जगजाहीर झालं.

या बातमीवरून जूना किस्सा आठवला,

बोलभिडूवर यापूर्वी देखील हा किस्सा सांगण्यात आला होता. तोच किस्सा पुन्हा पब्लिश करण्यात येत आहे. कारण काय तर उपोषणाला बसून मार्ग निघत नसेल तर आपल्याचं पक्षाचा एका मोठ्या नेत्याचा आदर्श या आमदारांनी घ्यावा.

हे नेते कशाप्रकारे थेट नारळ फोडूनच कार्यक्रम करत हे सांगणारा हा किस्सा. 

कॉंग्रेस पक्षाचे जुनेजाणते नेते म्हणजे बाळासाहेब देसाई. कित्येक राजकिय किस्से सांगत असताना त्यामध्ये हयगय न करणारे व्यक्ति म्हणजे बाळासाहेब देसाईच असतात हे विशेष. बाळासाहेब देसाई यांनी गृहमंत्री, शिक्षणमंत्री, महसुलमंत्री, कृषीमंत्री म्हणून कारभार केला. धिप्पाड शरीरयष्टी, पायघोळ धोतर, खादीचा नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी, खादीचा कोट, पायात कोल्हापुरी चपला असा वेष असणारे बाळासाहेब देसाई स्वत: वकिल होते. उच्चशिक्षणाबरोबर राजकारणात असणारा एक रांगडेपणा त्यांनी जपला.

मंत्रीमंडळाची परवानगी न घेता विकासकामाचा नारळ फोडणारा असा नेता महाराष्ट्रात एकमेव झाला असावा. 

त्यांच्या निर्णयक्षमतेचे अनेक किस्से सांगितले जातात त्यापैकीच एक किस्सा म्हणजे करुळ आणि भुईघाटाचा. . 

बाळासाहेब देसाई तेव्हा सार्वजनिक खात्याचे मंत्री होते. करुळ घाटाचा काम सुरू करण्यात येणार होतं. आणि त्याच्या भूमीपूजनासाठी बाळासाहेब देसाई यांना बोलवण्यात आलं होतं. पण झालेलं अस की करुळ घाटाला लोकांचा विरोध होता. काहीजणांच्या मते भूईबावडा घाट देखील व्हायला पाहीजे होता. गगनबावड्याचे तत्कालिन आमदार ए.पी. सावंत यांनी तर त्यासाठी प्रखर आंदोलनच उभारलं होतं. काहीही झालं तर करूळ घाटासोबत भूईबावडा घाटास सुरवात व्हायला हवी अस त्यांच मत होतं. मात्र शासनदरबारी फक्त करुळ घाटालाच मान्यता देण्यात आली होती.

अशा परिस्थितीत करुळ घाटाच्या भूमिपूजनाची तारिख ठरवण्यात आली.

बाळासाहेब देसाईंच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार होता पण भूईबावडा घाटासाठी मोठ्या प्रमाणात लोक विरोधासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले होते. जर फक्त करोळ घाटाचं काम झालं तर काहीही दगाफटका होवू शकतो अशी शक्यता निर्माण झाली होती. बाळासाहेब देसाई हे आपल्या गाडीतून अशा परिस्थितीत देखील नियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले.

मात्र गाड्या घाटाजवळ पोहचताच जमलेला जमाव पाहून पोलीसांनी त्यांना कोणत्याही प्रकारे गाडीतून न उतरण्याची ताकीद दिली. लोक प्रचंड संतापले असून काहीही होण्याची शक्यता होती. मात्र पोलीसांच्या सूचनांच पालन न करता बाळासाहेब देसाई त्या संतापलेल्या जमावापुढे उभा राहिले.

बाळासाहेबांनी लगेच तिथल्या एका व्यक्तिला दोन नारळ आणायला सांगितले. एक नारळ करोळ घाटासाठी आणि दूसरा भूईबावडा घाटासाठी. कदाचित मंत्रालयाची मान्यता न घेता भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतलेला घाट असावा.

बाळासाहेब देसाई समोरच्या लोकांना म्हणाले,

हा बाळासाहेब देसाईचा शब्द आहे. करुळ आणि भूईबावडा घाट होणार म्हणजे होणार. त्याच कोणताही बदल होणार नाही.

ज्या लोकांनी काही वेळापुर्वी बाळासाहेब देसाई मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या त्याच लोकांनी आत्ता बाळासाहेब देसाईचा जयजयकार करण्यास सुरवात केली.

आत्ता प्रश्न होता तो म्हणजे मंत्रीमंडळाची बैठक न घेता, प्रस्ताव न मांडता, मंजूरी न घेता बाळासाहेबांनी केलेल्या भूमीपूजनाचा. मात्र बाळासाहेब देसाई भल्याभल्यांचे मन वळवण्यास प्रसिद्ध होते. त्यांनी मंत्रीमंडळात आपली भूमिका आणि घाटाची गरज पटवून दिली. एकमुखाने भूईबावड्याच्या घाटाची फाईल देखील मंजूर झाली.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.