बंडखोरीचा एक मुद्दा होता घराणेशाही पण शिंदे गटातही “घराणेशाही” आहे
मागेच मोदी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, राजकारणातली घराणेशाही संपायला हवी असं आवाहन दिलेलं. देशाच्या राजकारणात पक्ष कोणताही असो घराणेशाहीचा मुद्दा काय संपता संपत नाही. काँग्रेस, भाजप अशा पक्षातल्या घराणेशाहीबद्दल आपणाला माहितीच आहे आज शिंदे गटातल्या घराणेशाहीवर बोलूया..
याची सुरुवातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापासून होते.
एकनाथ शिंदे – श्रीकांत शिंदे
एकनाथ शिंदेंना घरातून राजकीय वारसा नसला, तरी शिंदे सलग चौथ्यांदा आमदार झाले आहेत, तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवली मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार आहेत. साहजिकच एकाच घरात मुख्यमंत्री (आमदार)-खासदार ही पदं आहेत.
एकनाथ शिंदेंनी बंड करण्यामागे श्रीकांत शिंदे यांचे राजकीय भवितव्य सुरक्षित करणे हा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येतं. कारण श्रीकांत शिंदेंच्या कल्याण मतदारसंघात संघाच्या विचारसरणीचा प्रभाव आहे त्यामुळे भाजपच्या मदतीशिवाय श्रीकांत शिंदेंना निवडून येत येणारच नाही.
२०१४ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंद परांजपे राष्ट्रवादीत गेल्यामुळे शिवसेनेचा हा लोकसभा मतदारसंघ राखण्यासाठी शिंदेंनी श्रीकांत शिंदेंना उतरवलं. श्रीकांत शिंदे हे २०१४ पासून सक्रीय राजकारणामध्ये आहेत. ते पहिल्याच प्रयत्नात खासदार झाले.
२०१९ मध्ये ही ते निवडून आले. २०२४ मध्ये देखील श्रीकांत शिंदे निवडून यावेत आणि देशात भाजपची सत्ता येईल आणि केंद्रात श्रीकांत शिंदेंना मंत्रिमंडळातही संधी मिळेल यासाठी शिंदेंचे प्रयत्न चालू आहेत.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिंदे गटाचं राजकीय अस्तित्व दीर्घकाळ टिकलंच तर त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेंच्या नंतर श्रीकांत शिंदेंच्या हातात जाईल अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात.
हीच बापलेकाची जोडी शिंदे गटातली घराणेशाही सांगत नाहीय तर शिंदे गटातल्या इतर जोड्यांवर नजर मारली तर शिंदे गटात घराणेशाही पुढं येतेय या उदाहरणांवरून स्पष्ट होते.
संदीपान भुमरे – विलास भुमरे
शिंदे गटातील संदीपान भुमरे हे पैठण विधानसभा मतदार संघातुन आमदार असून शिंदे सरकारमध्ये ते राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री आहेत व त्यांचे चिरंजीव विलास भुमरे हे औरंगाबादचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.
म्हणजे आतापर्यंत तरी विलास भुमरे हे जिल्हा परिषदेच्या राजकारणापुरते मर्यादित होते पण राजकीय वर्तुळात असं सांगितलं जातंय कि, संदीपान भुमरे यांनी सत्तांतरात जी महत्वाची भूमिका बजावलीय त्यामागे त्यांनी शिंदेंना एक अट घातलेली की, मुलगा विलासला पैठण तालुक्याचा नेता म्हणून लॉन्च करावं. थोडक्यात भुमरे आपल्या चिरंजीवाला आमदारकीसाठी वातावरणनिर्मिती करत असल्याचं दिसून येत आहे.
त्याचाच एक म्हणजे, अलीकडेच मुख्यमंत्री शिंदेंची पैठणमध्ये झालेली सभा, या सभेचे आयोजन, नियोजनात देखील विलास भुमरेंचा असलेला पुढाकार पाहता त्यांची पुढील वाटचाल स्पष्ट होते. इतकंच नाही तर, औरंगाबाद ते पैठण रस्त्यावर फक्त विलास भुमरेंचेच बॅनर लागेलेले दिसून येत होते…
प्रताप सरनाईक – पूर्वेश सरनाईक
पूर्वेश सरनाईक हे प्रताप सरनाईक यांचे पुत्र. पूर्वेस यांच्याकडे युवा सेनेच्या सचिवपदाची जबाबदारी होती. युवासेनेच्या प्रचारात त्यांचा सक्रिय सहभाग होता सद्या युवासेनेची जबाबदारी आता पूर्वेश सरनाईकांच्या खांद्यावर येणार असल्याचे समजतेय.
तर सरनाईक कुटुंबातील प्रताप सरनाईकांचे दुसरे पुत्र विहंग सरनाईक यांचीही लवकरच राजकारणात एंट्री होण्याचे चान्सेस असल्याचे चित्र स्थानिक राजकारणात दिसून येतेय.
तर परिषा सरनाईक या ठाणे महापालिकेत नगरसेवक आहेत, त्या प्रभाग क्रमांक २९ चे प्रतिनिधित्व करतात. २०१७ च्या महानगपालिकेच्या निवडणुकीत परिषा सरनाईक यांना महापौरपदाची संधी मिळण्यासाठी अनुकूल वातावरण होतं पण निकाल वेगळा लागला त्या आत्तापर्यंत तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सरनाईक महापौर पदाच्या जवळ जाऊ शकतात.
पूर्वेस सरनाईकांचं बोलायचं तर, जसं शिवसेनेत बंड झालं तसं बंडखोरांविरोधात आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली असतांना शिंदे गटाच्या आमदारांनी भूमिका आताच्या परिस्थितीला धरुन कशी बरोबर आहे, हे जनतेला पटवून देण्याकरिता पूर्वेश सरनाईक महाराष्ट्र दौरा करणार आहेत. नाराज पदाधिकारी हेरुन त्यांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी पूर्वेश सरनाईक यांच्याकडे दिली आहे. एकंदरित शिंदे गटाची ताकद वाढविण्याची मदार युवासेना म्हणून पूर्वेश सरनाईक यांच्या खांद्यावर असणार आहे.
रामदास कदम – योगेश कदम
निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम जे आता शिंदे गटात सामील झालेत त्यांचे सुपुत्र म्हणजे योगेश कदम. योगेश कदम हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले असून, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत.
या बाप लेकाची जोडी शिंदे गटाच्या बंडानंतर चर्चेत आली जेंव्हा बंडात सामील झालेल्या रामदास कदमांनी ठाकरे गटात असणाऱ्या अनिल परब यांच्यावर घणाघाती टीका केलेली की, “रामदास कदमांचे चिरंजीव योगेश कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघाचे तिकीट मिळू नये आणि कदम कुटुंबीयांना राजकारणातून संपायचे असा प्लॅन परब यांचा होता, असा गौप्यस्फोट कदम यांनी केलेला. तर आमदार योगेश कदम यांनी देखील आरोप केला कि, “अनिल परब आपली गळचेपी करत होते, राष्ट्रवादीच्या पडलेल्या आमदाराला आणि खासदार सुनील तटकरे यांना निधी द्यायचे’.
आनंदराव अडसूळ -अभिजित अडसूळ
शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव म्हणजे माजी आमदार अभिजित अडसूळ.
अभिजित अडसूळ २००९ च्या विधानसभा विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या संचालकपदी निवड झाली.
त्यांचे वडील आनंदराव अडसूळ हे -ऑपरेटीव्ह क्षेत्रातलं मोठं प्रस्थ आहे. ते सिटी कॉ-ऑपरेटीव्ह बँक या बँकेचे अध्यक्ष होते. या बँकेचा टर्नओव्हर सुमारे एक हजार कोटींच्या आसपास होता. याच सिटी बँकेचे अभिजित अडसूळ संचालक आहेत. थोडक्यात याच जोरावर अभिजित अडसूळ हे येत्या निवडणुकीची तयारी करत असल्याची चर्चा आहे.
अनिल बाबर -सुहास बाबर
आत्ता शिंदे गटात असणारे अनिल बाबर यांनी १९९० मध्येच राजकारणात एंट्री मारलीय. सलग ४ वेळेस आमदार म्हणून निवडून आलेले अनिल बाबर यांनी सहकार क्षेत्रातही आपलं साम्राज्य वाढवलं. १९९१ मध्ये बाबर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी होते.
तर २००१ मध्ये सांगली जिल्हा सहकारी बँकेचं संचालकपदही भूषवलं आहे. त्यांचे चिरंजीव म्हणजे सुहास बाबर. सुहास बाबर हे सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत.
या सगळ्या जोडगोळ्या पाहिल्यात तर लक्षात येतं कि, घराणेशाहीचा शाप फक्त काँग्रेस सारख्या पक्षाला लागला असला तरी पक्ष कोणताही असो राजकारणात घराणेशाही कायमच दिसून येते हे नक्की.
हे ही वाच भिडू :
- सरवणकरांचा राडा काहीच नाही सेनेच्या आमदाराने विधानभवनातच पिस्तुल बाहेर काढलं होतं…
- काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना-शिंदे गट असा राजकीय प्रवास अन् दीपक केसरकरांची पक्षनिष्ठा
- विस्तार तर झाला, पण शिंदे-फडणवीस गटाच्या मंत्र्यांचा इतिहास काय सांगतो..?