“E-बिझ” चे फॅड आणणारे हेच ते दोन कलाकार, सध्या काय करतात माहिताय का ?

भिडू कार्यकर्त्यांच्या मते काळ ही जगातली सगळ्यात भारी गोष्ट आहे. म्हणजे दूपारच्या वेळी शांतपणे बसलं की जूनेजूने विचार मनात घोळू लागतात. विचार करता करता कॉलेजच्या वयात जातं. गावागावात BCA, BBA ची कॉलेज सुरू झालेली तो काळ. हिमेश रेशमियां जरा जूना होवू लागलेला तरी टिकून होता तो काळ. गुरू पिक्चर रिलीज झाला होता तो काळ. बुटकट पॅन्टा आलेल्या तो काळ. करिम्झा गाडी येड लावत होती तो काळ. सगळ्यात भारी गाडी म्हणजे स्कोडा ऑक्टाव्हिया असते हे माहिती असण्याचा तो काळ.

या काळात गावाच्या इंजनियरींग कॉलेजपासून ते जोंधळ्याच्या शेतात नव्यानं उभा राहिलेल्या BCA,BBA कॉलेजात EBiz कंपनीचं वार शिरलेलं. बुटकट घालणारी पोरं फॉर्मलमध्ये आलेली. काळी निळी पॅन्ट आणि पांढऱा शर्ट घालून पोरं सकाळ, दूपार, संध्याकाळ आणि मध्यरात्रीपण गुड मार्निंग म्हणायची.

कारणं इंग्रजांच्या आणि इबिजवाल्यांच्या साम्राज्यावरचा सुर्य कधी मावळायचा नाही.

काय होतं ते इबीज प्रकरण…

रंग दे बसंती आल्यानंतर झालेल्या पंधरा दिवसांच्या मनातल्या विद्रोहानंतर त्या काळात मुलांकडे करण्यासारखं काही नव्हतं. याच सुमारास सांगली-सातारा-कोल्हापूर-सोलापूर या भागात इबीजचं वारं आलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देखील या कंपनीचं वार होतं.

त्यांची स्किम होती की ७ हजार भरा आणि कंपनीचे सभासद व्हा.

७ हजारात तुम्हाला एक सिडी मिळायची. ऑनलाईन कोर्स यामध्ये असायचे. कोर्स कसले तर बेसीक लॅग्वेज कोर्स असायचे. C, CPP सारखे कोर्स. मार्केटमध्ये जावून असे कोर्स करायचे असतील तर निवांत दहा वीस हजार खर्च व्हायचे असे कोर्स ७ हजारात मिळायचे.

तर ७ हजार देवून सभासद झाल्यानंतर लागलीच दोघांना तयार करायच. आपल्या खाली त्यांना सभासद करायचं. ते दोघं अजून दोघा दोघांना सभासद करणार. म्हणजे टोटल झाले सभासद झाले सहा. तुम्ही फक्त दोनच सभासद केले पण आत्ता झाले सहा. अशाप्रकारे संख्या वाढत जाणार. प्रत्येक सभासदामागे तुम्हाला काही रक्कम कमीशन म्हणून मिळणार.

असा हिशोब लावून मुलांना पहिल्या टप्यात करिझ्मा गाडी मिळणार, दूसऱ्या टप्यात ऑक्टाव्हिया घेता येणार. महिना चौवीस लाख घरबसल्या मिळणार असं सांगितलं जायचं.

मग पोरांचा वारू चहूबाजूंनी उडांरला. पोरं ७ हजार भरून सभासद झाले. आत्ता प्रत्येकजण आपल्या खालचे दोघेजण शोधू लागला. गल्लीतली पोरं, पैपाहूणे हमखास शिकार होवू लागले. त्यांच्याकडून सात हजार घेवून सभासद केलं जावू लागलं. आत्ता या ठिकाणी समोरच्याला सभासद करण्याची जबाबदारी याच बकऱ्यांची असल्याने त्यांनी एक फॅड आणलं. काळीनिळी पॅन्ट आणि पांढऱा शर्ट घालून ही पोरं हिंदीतून बोलू लागली.

गल्लीतल्या वाळूवाल्याला पोराला ही पोरं सुनैऐं सर म्हणू लागली.

त्या वाळूवाल्याला माहित असायचं ह्या पोरांच्या बापानं नुकतचं पतसंस्थेचं कर्ज काढून पोराला इंजिनिरींगला घालवलय. अस पोरगं आपल्याला सर म्हणलं म्हणल्यानंतर वाळुवाल्याचा स्वाभीमान जागा होत असे. तो देखील पैसे लावायचां. मिळालेला ऑनलाईन कोर्सची सिडी टॅक्टरमध्ये लावून प्ले करायचा अयशस्वी प्रयत्न करायचा. अशा प्रकारे खोगीरभरती झाल्याप्रमाणे सभासद वाढू लागले. ठिकठिकाणी टाय घातलेली पोरं दिसू लागली. वरच्या थरावर पोहचलेल्यांनी करिझ्मा घेतली आणि आत्ता चांद दूर नहीं या स्वप्नात पोरं गल्लीभर फिरू लागली.

दिवसांमागून दिवस गेले आणि वरच्या पोरांनी हात झटकले. वरच्या थरातल्यांनी निदान करिझ्मा तर काढली पण हिकडं वाळूवाले ऐकणाऱ्यातले नव्हते. त्यांनी जमलं तसे पैसे गोळा केले. पतसंस्थेचं कर्ज काढून फि भरलेल्या बापाने परत एकदा प्रकरण केलं आणि पोराला बाहेर काढलं.

बस्स इथ इबीज संपलं.

खूप लांबड झाली पण तरिही खूप लवकर आटोपलं. ईबीज या प्रकरणाची ही फक्त पार्श्वभूमी होती. संदर्भासहित स्पष्टीकरण तर आत्ता मांडणार आहोत.

MLM काय असतं…?

MLM म्हणजे मल्टि लेव्हल मार्केटिंग. जगातली चांगली गोष्ट भारतात येवून दळभद्री होण्याचा प्रकार. यात कस असतं तर एकाखाली एक ग्राहक तयार करायचे असतात. म्हणजे काय तर तुम्ही टिव्हीवर एखाद्या बिस्किटची जाहिरात पाहता. त्याचं मार्केटिंग कस अस तर, ती कंपनी प्रॉडक्ट काढते. प्रॉडक्ट काढलं की ते होलसेलवाल्यांकडे जातं. ते यावर ठरावीक रुपये कमिशन घेतात. नंतर ते रिटेल वाल्याकडे जातं. तो ठरावीक कमिशन घेतो. तिथून तुमच्या हातात एका विशिष्ठ किंमतीला हे प्रॉडक्ट येत. यात सर्वांच कमिशन आणि जाहिरात हा खर्च आला.

MLM सिस्टिम हाच खर्च वजा करून थेट तुमच्या हातात प्रॉडक्ट देतं. मग यासाठी जाहिरात कशी करायची तर कंपनीचा ग्राहक तोच जाहिरातदार. म्हणजे तू बिस्किट घ्यायचं आणि पुढेच्या दोन माणसांना सांगायचं बिस्किट छान आहे विकत घे. त्याने बिस्किट घेतलं की त्याचं कमिशन तुला.

एकाखाली एक ग्राहक तयार करणारी MLM सिस्टिम. यानुसारच amway चे प्रोडक्ट विकत असतात. याच सिस्टिमवर आधारित ईबीजने मार्केटमध्ये उतरली होती.

E BIZ कुणाची कंपनी होती ?

E बिझच्या मालकांच नाव पवन मल्हान आणि त्यांच्या पोराचं नाव ह्रितिक मल्हान. हे दोघं या आयडियाचे मुळपुरुष. यांनी २००१ मध्ये कंपनी सुरू केली. सुरवातीला MLM मध्येच त्यांनी टुरिस्ट कंपनीसारखे पॅकेज देण्यास सुरवात केली. पण कंपनीने खरा जोर पकडला तो २००७-०८ नंतर सुरू केलेल्या ऑनलाईन कोर्समुळे. ऑनलाईन कोर्सचा बळी नुकतीच कॉलेजमध्ये गेलेली मुलं पडली. हाच कोर्स २०१९ पर्यन्त चालू होता. दरम्यानच्या काळात काय झालं तर कंपनी जो कोर्स ७ हजारला द्यायची त्यांची बाजारात किंमत कमी झाली. दूसरी गोष्ट म्हणजे कंपनीकडे ६० टक्यांहून असे सदस्य झाले होते ज्यांचा या कोर्ससोबत दूरदूरचा संबध नव्हता.

आत्ता असे लोकं कंपनीवर वारंवार केस करत असत. पण कंपनीचे मालक यात घावत नव्हते, कारण काय तर कंपनी कुठल्याही नियमांचा भंग करत नव्हती. आमची एखादी गोष्ट सात हजारला आहे अस सांगितल्यानंतर ती घ्यायची का नाही हे पुर्णपणे ग्राहकांवर ठरतं. त्यामुळे डेड झालेल्या चेनमधील लोकांनी कितीही आदळाआपट केली तरी बिघडणाऱ्यातलं नव्हतं.

मग कंपनी कुठे फसली…?

कंपनी फसल्याची कारणे अनेक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कंपनीचे प्रॉडक्ट म्हणजे भूलथाप होती. या सात हजारांमध्ये काहीना काही ग्राहकांना मिळालं असतं तरी डेड झालेल्या चेनमधील लोकांनी दंगा केला नसता. दूसरी गोष्ट म्हणजे या कंपनीने पळवाट शोधत सरकारचा टॅक्स चुकवला. त्यामुळे सरकारने आपली कंबर कसली आणि थेट कंपनीची स्किमच इनलिगल असल्याचं सांगितलं.

त्यामुळे आजवर कंपनीने केलेल्या टर्नओव्हरचा अंदाज लावून ५ हजार कोटींचा घपला केल्याबद्गल कंपनीच्या मालकांना अर्थात पवन मल्हान आणि त्यांचे पुत्र ह्रितिक मल्हान यांना ऑगस्ट २०१९ साली अटक करण्यात आली.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.