जग इलेक्ट्रिक गाड्यांचा विचार करतय आणि इथं पुण्यात ई-बसेस कधीच दाखल झाल्यात

आपल्या देशात प्रत्येक विषयामागे हजारो तज्ञ असतात. तसेच सार्वजनिक वाहतुकी  बाबत मत असणारे कमी नाहीत. त्यांचे मते जगभरातील कुठलीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हि कायमच तोट्यात चालत आहे. त्याकडे फायद्याची बाब म्हणून पाहता येणार नाही. मात्र, पुणे महानगर परिवहन महामंडळाने तोट्यात असणे कसे फायद्याचे आहे हे दाखवून दिलंय

पीएमपीच्या ताफ्यात एकूण २ हजार २०५ बसेस आहेत. यातील ९५६ बस या भाडेतत्वार घेण्यात आल्या आहेत. तर १ हजार २४९ बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. यातील १५० बस या ई-बस आहेत.

देशात सर्वाधिक ई-बस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात असा दावा करण्यात येतो.

पुढील काही दिवसांतच पीएमपीच्या ताफ्यात नव्याने ५०० ई-बस सामील होणार आहेत. त्यातील ३० ते ४० ई-बस पीएमपीच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. आरटीओ संदर्भातील कामे बाकी आहेत. ती पूर्ण झाल्या नंतर हा ई-बस पीएमपीच्या ताफ्यात सामील होणार आहेत.

फेब्रुवारी २०१९ मध्ये पहिली ई-बस 

पुण्यात पहिली ई-बस १२ फेब्रुवारी २०१९ मध्ये धावली. यावेळी २५ ई-बस पीएमपीला मिळाल्या होत्या. १५ ऑगस्ट २०१९ नंतर १२५ ई-बस टप्याटप्याने पीएमपीला मिळाल्या.

पुढील काही दिवसात ५०० ई-बस पीएमपीच्या ताफ्यात सामील होईल अशी माहिती वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी बोल भिडूशी बोलतांना दिली. तसेच यावेळी बोलतांना झेंडे म्हणाले की, देशात पहिल्यांदा एखाद्या शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एवढ्या मोठ्या प्रमाणात ई-बस वापरण्यात येते. पुणे हे देशात पहिले शहर ठरले आहे. 

२०२२ मध्ये एकूण ६५० ई-बस पीएमपीच्या ताफ्यात असणार आहेत.

२०१४ मध्ये असणारा डिझेलच्या दराचा विचार केला तर आता या दरात दुपटीने वाढ झाली आहे. त्यावेळी सीएनजीचे दर हे केवळ ३५ रुपये किलो होते. त्यात सुद्धा आता दुपटी पेक्षा अधिक वाढ झाली आहे. हे झालं इंधन दर वाढीचे. मात्र २०१४ नंतर एकदाही तिकिटाच्या दरात कुठलीही वाढ झाली नाही.

त्यामुळे पीएमपीचा आर्थिक फायद्या  होण्याऐवजी तोटा वाढ होत गेली. पीएमपीकडे तिकीट विक्री वगळता आर्थिक स्त्रोत्र खूप कमी आहे. मात्र मागच्या काही वर्षांचा विचार करता पीएमपीचे आर्थिक स्त्रोत्र वाढीसाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत.

तसेच प्रवासी संख्या वाढविणे गरजेचे होते ते झाले नाही. मात्र त्यासाठी विशेष असे काहीही प्रयत्न झाले नाही. मागच्या चार वर्षात मात्र याबाबत पीएमपी प्रशासन सकारात्मक प्रतिसाद दाखवला असून विविध योजना अमलात आणल्या आहेत.

कमी भाडे आणि त्वरित उपलब्ध असणारी बससेवा या नव्या फॉर्म्युल्यामुळे ‘पीएमपीएमएल’च्या प्रवासीसंख्येत चांगली वाढ झाली आहे.

‘पुण्यदशम ही सेवा शहरातील मध्यवर्ती भागातील ९ मार्गावर चालते.  एक दिवसात ३५ हजार प्रवासी या योजनेचा लाभ घेतात.

डिझेल बस आणि ई-बसची तुलना केली तर  

डिझेल बसला एक किलो मीटर धावण्यासाठी ३१ ते ३२ रुपयाचे इंधन लागते. त्याच बरोबर देखभाल दुरुस्तीचा खर्च सुद्धा अधिक आहे. डिझेल बसला प्रत्येक किलो मीटर मागे देखभाल दुरुस्तीसाठी ५ रुपये  खर्च येतो. तसेच एका बससाठी चालक वाहक वगळता ८ कर्मचारी लागतात.

ई-बसला एक किमी धावण्यासाठी  ७ ते ८ रुपये खर्च येतो तर देखभाल दुरुस्तीचा खर्च सुद्धा नगण्य आहे. केवळ टायर खराब झाले तर ते बदलावे लागतात.

डिझेल बस मध्ये लहान मोठे ३ हजार सुटे भाग असतात. तर ई-बस मध्ये केवळ १ हजार सुटे भाग आहेत. यामुळे देखभाल दुरुस्ती खर्च हा नगण्य आहे.

साध्या बसच्या तिकीट दरात एसी बस मध्ये प्रवास करायला मिळत असल्याने आपसूकच या ई-कडे प्रवाशांचा ओढा आहे.

कोरोना काळ वगळता पुण्यातील ई-बस ने १ कोटी ३६ लाख किमीचा प्रवास केला

१२ फेब्रुवारी ते आता पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात असणाऱ्या सर्व ई-बस ने १ कोटी ३६ लाख किमीचा प्रवास केला. जर डिझेल बस एवढ्याच धावल्या असत्या तर त्यासाठी  ४५ लाख ३३ हजार लिटर डिझेल लागले असते. त्याची किंमत साधारण ४० कोटी ८० लाख होते. तर ई-बसला १० कोटी ८० लाख रुपये चार्जिंगसाठी खर्च आला आहे.

यामुळे एक लक्षात येईल की, पीएमपीने ई-बसने दोन वर्षात इंधनाच्या बचत पोटी ३० कोटींपेक्षा अधिक रक्कम बचत केली आहे. तसेच आर्थिक बचती बरोबर प्रदूषण सुद्धा कमी झाले आहे. असा दुहेरी फायदा ई-बसमुळे झाला आहे.

सार्वजनिक वाहतुकीसाठी – बस आणण्याचा मान पुण्याचा 

शहर वाहतुकीसाठी देशात सर्वप्रथम – बस आणण्याचा मान पुणे शहराला मिळाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने डिझेलच्या बस ताफ्यातून बाद करून यापुढे इलेक्ट्रिक आणि ‘सीएनजी’वर धावणार्‍या बसच खरेदी करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे.

विविध गटांतील प्रवाशांसाठी सोयीच्या व परवडणाऱ्या अभिनव बससेवा गेल्या चार वर्षांत सुरू झाल्या आहेत. यात महिलांसाठी ‘तेजस्विनी’, रात्री उशिरा शहरात येणार्‍यांसाठी ‘रातराणी’,  १० रुपयांत दिवसभर वातानूकुलित प्रवासाची सुविधा देणारी ‘पुण्यदशम’ आणि विमानतळावर जाण्यासाठी ‘अभी’ या सेवांचा समावेश आहे. प्रवाशांना दूरवरूनच इच्छित मार्गाची बस ओळखता येऊ शकेल अशा प्रकारचे ‘कलर कोडिंग’ करण्याची योजनाही लागू करण्यात आली आहे.

ई-बस  दिवसाला सरासरी २२५ किलो मीटर चालते.

पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या ई-बस फेब्रुवारी २०१९ पासून पुणेकरांच्या सेवेत दाखल झाल्या. यानंतर टप्प्याटप्याने सुमारे ९६ बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. ई-बससाठी पुण्यातील भेकराईनगर आणि पिंपरी-चिंचवडमधील निगडी डेपोत चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे.

या आगारातून दोन्ही शहरांत ई-बससेवा उपलब्ध करून दिली जाते. सध्या भेकराईनगर डेपो आणि निगडी डेपोत १५० बसच्या माध्यमातून २५  मार्गांवर सेवा दिली जाते. पुणे स्टेशन, कात्रज, निगडी, शेवाळवाडी, हिंजवडी, धायरी, आळंदी, वाघोली, आकुर्डी रेल्वे स्टेशन आणि चिंचवडगाव या लांब पल्ल्यांच्या मार्गावरदेखील या बसद्वारे सेवा दिली जात आहे.

डिझेल बसमुळे होणारे प्रदूषण आणि वाढत्या इंधनाच्या दरामुळे पीएमपीच्या २३३ मिडी बस पैकी   केवळ ९६ मिडी बस सुरु आहे. पीएमपीच्या वतीने मिडी बस वगळता डिझेल वर चालणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत.

उत्पन्नात वाढ 

फेब्रुवारी महिन्यात पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या वातानुकूलित ई-बस अल्पावधीतच नागरिकांच्या पसंतीस उतरल्या आहे. परिणामी, पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ झाली असून, प्रवासी संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

साध्या बसच्या दरात वातानुकूलित प्रवासाचा लाभ घेता येत असल्याने प्रवासी या बसला पसंती देत आहेत. परिणामी, भेकराईनगर डेपोतील उत्पन्नात वाढ झाली आहे. भेकराईनगर डेपोतील बसने प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची संख्या जानेवारी २०१९ मध्ये ४० हजार २९१ होती. त्यातून डेपोला सरासरी पाच लाख ५१ हजार ८१९ रुपये उत्पन्न मिळाले होते. तर, डिसेंबर २०१९ मध्ये यात वाढ होऊन प्रवासी संख्या ५५ हजार ७६५ झाली असून, उत्पन्नही आठ लाख ५६ हजार ३२१ रुपये झाले आहे.

पीएमपीने या बससाठी बस पुरवठादार कंपनीशी १२ वर्षांचा करार केला आहे.

‘सीआयआरटी’च्या निकषांप्रमाणे पीएमपीला एक लाख लोकसंख्येमागे ५० बसची आवश्यकता आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड, कॅन्टोंन्मेंट आणि ‘पीएमआरडीए’ क्षेत्रातील नागरिकांना सेवा देण्यासाठी जवळपास ३५०० बसची आवश्यकता आहे. सध्या पीएमपीकडे एकूण २ हजार २०५ बस आहेत.

त्यापैकी स्क्रॅप होणाऱ्या बस, शहरातील वाढते प्रदूषण आणि बसची गरज विचारात घेऊन पीएमपी संचालक मंडळाने ५०० ई-बससाठी निविदा प्रक्रिया राबवण्यास मान्यता दिली होती.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) वाघोली आणि बाणेर डेपोमध्ये ई-चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील ई-बसचे मार्ग वाढण्यास मदत होणार आहे. सध्या केवळ दोन डेपोतून ई-बस धावत आहेत. ई-बस पुरविणाऱ्या कंपनीने या दोन्ही ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू केले आहे.

‘लॉकडाउन काळात पीएमपीची सेवा बंद असल्यामुळे पीएमपीला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना सेवा देण्याबरोबरच उत्पन्न वाढीसाठी विविध पर्यायांचा अवलंब करण्याचे धोरण पीएमपी प्रशासनाने स्वीकारले आहे.  मालवाहतूक, खासगी कंपन्यांची कर्मचारी वाहतूक किंवा सीएनजी विक्री असे निर्णय  घेण्यात आलेले आहेत.

तसेच वीज बचत आणि त्याद्वारे खर्च कपात करण्यासाठी पीएमपीने सौरऊर्जा निर्मितीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर काम सुरु आहे. 

महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजेन्सीच्या (मेडा) माध्यमातून १३ डेपो आणि बीआरटी थांब्यांवर पीएमपी सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. इंधनावरील खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने लागणाऱ्या एकूण विजेपैकी किमान १० ते १२ टक्के विजेची पूर्तता सौरऊर्जेच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे.

२०२१ अखेरपर्यंत ३०० इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंगसाठी दररोज एक लाख युनिट विजेची गरज भासेल. त्याचा वार्षिक खर्च २२ कोटी रुपये इतका असेल, असा अंदाज आहे. वीजनिर्मितीमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी सौरऊर्जेच्या माध्यमातून ३० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे ध्येय ‘पीएमपीएमएल’ने ठेवले आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या ६० एकर रूफटॉपचा वापर करून पहिल्या टप्प्यात आठ ते १२ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार असून, आगामी काळात १५० एकर रूफटॉपच्या माध्यमातून ३० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे नियोजन आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी खासगी वाहनांचा वापर कमी करत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करणे, हे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.

‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी विशेष प्रयत्न

शहरातील नागरिकांना पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम बससेवा देण्यासह ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या दिशेने दीर्घकालीन विचार करून २०३० पर्यंतची उद्दिष्टे ‘पीएमपीएमएल’ने निश्चित केली आहेत.

१०० टक्के पर्यावरणपूरक बसताफा, सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती आणि तिकीटविक्रीव्यतिरिक्त पर्यायी उत्पन्नाचे मार्ग तयार करणे अशा तीन प्रमुख बाबींवर काम सुरू करण्यात आले आहे. २०३० पर्यंत ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यातील सर्व बस पर्यावरणपूरक इंधनावर चालणाऱ्या असतील, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बस वापरणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.

त्यासोबत दररोज २७ लाख प्रवाशांची वाहतूक करण्याचेही उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी ताफ्यातील बसची संख्या टप्प्याटप्प्याने ३ हजार ६०० पर्यंत नेण्यात येणार येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे हि वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.