कोलकाता, दिल्ली, हैद्राबाद आणि आता पुणे कुठलीही मेट्रो असुद्या, ई श्रीधरन यांची छाप त्यावर आहेच

त्यांना सुद्धा इतर इंजिनियर प्रमाणे क्लासमध्ये बसून लेक्चर करण्यापेक्षा मैदानात जाऊन फुटबॉल खेळायला आवडाचं. मात्र त्यांनी कधीही आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. ही गोष्ट आहे भारतातील प्रमुख शहरांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणाऱ्या ई. श्रीधरन यांची. कोलकाता, दिल्ली सारख्या मोठ्या शहरात मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करुन देशासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. 

कोलकाता, दिल्ली प्रमाणे ई श्रीधरन हे पुणे मेट्रो बांधण्यासाठी थेट हेल्मेट घालून उतरले नाहीत. मात्र, त्यांनी सगळ्यात अगोदर पुणे मेट्रोचा डीपीआर तयार केला होता. पुढे जाऊन यात काही बदल झाले मात्र या मेट्रो प्रकल्पावर ई श्रीधरन यांची मोठी छाप आहे. 

याच मेट्रो प्रकल्पाचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ६ मार्चला झालं. या उदघाटनाच्या भाषणादरम्यान नरेंद्र मोदींनी प्रोजेक्ट्स लवकर पूर्ण झाले पाहिजेत असं म्हटलं आहे. मात्र वेळेच्या अगोदर आपले प्रकल्प पूर्ण करण्याची ‘मेट्रो मॅन ई श्रीधरन’ यांची जुनी सवय आहे. त्यांचीच ही मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भातील गोष्ट.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक म्हण लय फेमस आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब. सरकारी काम ठरवलेल्या वेळेत पूर्ण होत नाहीत असा सर्वांचाच विश्वास आहे. त्यामुळे वेळेत काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांबद्दल भारतीय नेहमीच आदर व्यक्त करतात. 

ई-श्रीधरन   

१९५४ मध्ये सहायक अभियंता म्हणून श्रीधरन भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेत दाखल झाले होते. ३६ वर्षांच्या सेवेनंतर १९९० मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित स्थापन करण्यात आले, ज्यात त्यांचा सहभाग होता. १९९७ मध्ये दिल्ली मेट्रो रेल्वे कॉरपरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बनले. तेव्हा ते ७९ वर्षांचे होते. एवढ्या वयात सुद्धा ते रस्त्यावर उतरून काम करत. त्यांच्यातील उत्साह वाखण्याजोगा होता. 

असं सांगण्यात येतं की, श्रीधरन रेल्वे खात्यात असतानाच्या काळातच सर्व महत्त्वाच्या रेल्वेमार्गाचं बांधकाम आणि नूतनीकरण झालं आणि या प्रक्रियेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. 

त्यांच्या कामाकडे सगळ्या जागाचं लक्ष गेलं ते पाम्बन पुलाच्या कामामुळे. वादळ आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेला पूल विक्रमी वेळेत त्यांनी उभा केला.  १९६४ मधील ही घटना. दक्षिण मध्य रेल्वेला  या पुलाच्या बांधकामासाठी ६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यांनी केवळ ४६ दिवसांत हे काम पूर्ण करून सगळ्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला. त्यानंतर त्यांना रेल्वे मंत्रालयातर्फे पुरस्कार देण्यात आला.

यावेळी ते केवळ ३१ वर्षांचे होते. यानंतर त्यांनी मात्र कधीही मागे वळून पहिलं नाही. ते काम करत गेले आणि तेही विक्रमी वेळेत पूर्ण करत राहीले. यानंतर त्यांना देशातील सर्व मोठ्या प्रकल्पांत सामावून घेण्यात आलं. त्यांच्या कामाची छाप आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. 

कोलकाता मेट्रो 

देशात पहिली मेट्रो सुरु झाली ती कोलकाता शहरात. त्या प्रकल्पाची रचना आखण्याची जबाबदारी सुद्धा ई श्रीधरन यांच्यावर होती. मात्र भारतासाठी मेट्रो हे नवीन तंत्रज्ञान होतं. त्याबद्दल म्हणावी तशी माहिती उपलब्ध नव्हती. हे अवघड आव्हान श्रीधरन यांनी स्वीकारलं. स्वखर्चाने जपानला जाऊन त्यांनी टोकियो मेट्रोचा ४ दिवस अभ्यास केला. त्यातून पुढे कोलकात्यात जागतिक दर्जाची मेट्रो उभी केली.   

भारतीय रेल्वेच्या इतिहासात अभिमानाने कोरलं गेलेलं श्रीधरन यांचं पुढचं काम होतं ते कोकण रेल्वे प्रकल्पाचं. ब्रिटिशांच्या काळातही हा प्रकल्प अशक्य काम म्हणून गणला गेला होता. पण श्रीधरन यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प सात वर्ष आणि तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झाला.

कोकण रेल्वे म्हणजे वेड्या माणसांनी पाहिलेलं वेडं स्वप्न होतं.

दिल्ली मेट्रो

कोकण रेल्वेची मोहीम संपली तोपर्यंत श्रीधरन यांच्या सरकारी कार्यकीर्दीची ४ दशकं उलटली होती. ते निवृत्त जीवन जगण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात दिल्ली मेट्रोसाठी डिएमआरसीची स्थापना करण्यात आली आणि श्रीधरन यांच्यावर व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली.

सुरुवातीच्या काही दिवसांत कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रोचं काम सोबतच सुरु होतं. न थकता दिल्ली-मुंबई अशा त्यांच्या फेऱ्या सुरु होत्या. केवळ २ वर्ष ९ महिन्यात दिल्ली मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला. प्रस्तावित वेळेच्या ३ महिने अगोदर हा प्रकल्प पूर्ण झाला. महत्त्वाचं म्हणजे अंदाजपत्रकात नोंदविलेल्या दहा हजार ५०० कोटींपेक्षा एक रुपया देखील अधिक लागला नाही.

दिल्ली मेट्रोचा दुसरा टप्पा १२४ किमीचा होता. हा टप्पा सुद्धा साडे चार वर्षांत पूर्ण झाला. दिलेल्या वेळेपेक्षा कमी कालावधीत काम पूर्ण करण्यात ई श्रीधरन यांचा हातखंडा होता. 

पुणे मेट्रो संदर्भात सांगायला गेलं तर  २००९ मध्ये मेट्रोचा डिपीआर म्हणजेच डिटेल रिपोर्ट तयार करण्यात आला होता. दिल्ली मेट्रोचे जनक ई. श्रीधरन यांनी स्वतः हा अहवाल पुणे महापालिकेत सादर केला होता.  पुढे जाऊन यात काही बदल झाले मात्र या मेट्रो प्रकल्पावर ई श्रीधरन यांची मोठी छाप असल्याचं अनेक अधिकारी सांगतात. 

हे ही वाच भिडू  

 

Leave A Reply

Your email address will not be published.