1989 साली दिल्लीत “साऊथ फिल्मचा अपमान केलेला” आज सिद्ध झालय तेच बाप आहेत

कधी तुम्ही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवला हजेरी लावली आहे का?  पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (PIFF), औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (AIFF) असे महोत्सव दरवर्षी महाराष्ट्रात होत असतात बघा…

त्यामध्ये आशियायी चित्रपट निवडले जातात. अशा महोत्सवांमध्ये एंट्री मिळणं आणि त्यातही पुरस्कृत केलं जाणं हे कोणत्याही चित्रपटाचं यश मानलं जातं. ‘दर्जा’ सेट करतात असे चित्रपट. मग ते भले पडद्यावर चालो न चालो, कमवायचं ते कमावलेलं असतं.

या महोत्सवांमध्ये भारतीय सिनेमे या कॅटेगिरीमध्ये भारताच्या सगळ्या भाषांचे चित्रपट असतात. मात्र जागतिक स्तरावर हे चित्र नव्हतं.

तिथे ‘भारतीय सिनेमे’ असं जेव्हा म्हटलं जायचं तेव्हा फक्त ‘हिंदी भाषिक’ ज्याला आपण ‘बॉलिवूड’ म्हणून संबोधित करतो त्यांनाच स्थान असायचं. भारतात बाकी भाषांमध्ये बनणारे चित्रपट यांना ‘प्रांतिक सिनेमे/प्रादेशिक सिनेमे’ इतकीच ओळख होती. म्हणून तर जागतिक पुरस्कारांसाठी देखील हिंदी चित्रपट पोहोचल्याचं काही वर्षांपूर्वी आपण बघायचो. 

ही लढाई अस्मितेची होती आणि आहे. कारण जागतिक स्तर तरी ठीक आहे मात्र भारतातल्या भारतातही प्रादेशिक सिनेमांना भारतीय सिनेमे म्हणून नाव कमावण्यात मोठी कसरत करावी लागली आहे, मोठी लढाई द्यावी लागली आहे. 

याचं उदाहरण म्हणजे साऊथ इंडस्ट्री.

टॉलिवूड, कॉलिवूड म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते सिनेमे. 

आज आरआरआर, केजीएफ, पुष्पा असे एकामागून एक चित्रपट भारत गाजवताना आपण बघतोय. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांना भारतीय सिनेमे म्हणूनच स्वीकारलेलं नव्हतं. अगदी भारतातच. 

याचमुळे सुपरस्टार चिरंजीवी यांना अपमानित झाल्यासारखं वाटलं होतं. 

किस्सा आहे १९८९ चा.

दक्षिण भारतीय अभिनेता चिरंजीवी यांचा ‘आचार्य’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र त्याआधी त्यांचा ‘रुद्रवेणी’ हा चित्रपट ‘नर्गिस दत्त’ पुरस्कारासाठी निवडला गेला होता. सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं होतं. 

पुरस्कार सोहळ्याच्या एक दिवस आधी सरकारने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्याठिकाणी हा कार्यक्रम होता त्याठिकाणी चिरंजीवी पोहोचले. तिथे छान सजावट करण्यात आली होती. ज्यात भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचं चित्रण करणारी एक भिंत होती. 

या भिंतीवर पृथ्वीराज कपूर यांच्यापासून अमिताभ बच्चनपर्यंतची छायाचित्रे होती. त्याखाली त्यांचं थोडक्यात वर्णन देखील करण्यात आलं होतं.

हे बघून चिरंजीवी यांना खूप भारी वाटलं. पुढे दक्षिणेतील चित्रपटांच्या संदर्भात देखील असं चित्र बघायला मिळेल म्हणून ते पाहत गेले. मात्र ज्या आशेने ते भिंतीजवळून चालत जात होते तेवढीच त्यांना निराशा येत होती. त्यांना भिंतीवर दिसलं ते केवळ जयललितांसोबत एमजीआर आणि प्रेम नझीर यांचंच चित्र. त्याच चित्राला फक्त साऊथ फिल्म्स असं नाव दिलं गेलं होतं.

मात्र सत्य परिस्थिती काही वेगळीच होती.

या बद्दल सांगताना चिरंजीवी म्हणाले होते,

“ते लोक राज कुमार किंवा विष्णुवर्धन, एन.टी.रामाराव किंवा नागेश्वर राव किंवा शिवाजी गणेशन… इतकंच काय तर आमच्या उद्योगक्षेत्रातील दिग्गज चित्रपट निर्मात्यांना ओळखत नव्हते. हे जाणून त्या क्षणी मला खूप अपमानित झाल्यासारखं वाटत होतं. तो प्रकार अपमानास्पदच होता”.

“त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला भारतीय चित्रपट म्हणून चित्रित केलं होतं, तर इतर चित्रपटांना ‘प्रादेशिक चित्रपट’ म्हणून वर्गीकृत केलं गेलं होतं आणि त्यांचा आदर केला जात नव्हता.”

याबद्दल चिरंजीवी तेव्हा बोलले देखील होते मात्र त्यांना काहीच प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. 

चिरंजीवी एकटेच नाही तर अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांना हा अनुभव आलेला…

नागार्जुन, चिरंजीवी यांच्या सारखे अभिनेते साऊथ इंडस्ट्रीमध्ये होते तर बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, अनिल कपूर यांच्यासारखे अभिनेते होते. दर्जेदार चित्रपट तर दोन्ही इंडस्ट्री देत होत्या मात्र ‘दर्जा’ मिळायचा तो फक्त बॉलिवूडच्या अभिनेत्यांना, निर्मात्यांना. यात अनेकदा तर साऊथच्या चित्रपटांचे कथानक घेऊन बॉलिवूड वाले चित्रपट बनवत असत आणि त्यांना पुरस्कृत केलं जात असायचं.

हा खरा सन्मान साऊथ वाल्यांचा आहे, हे कुणाला माहित देखील नसायचं.

दिलीप कुमार यांचा ‘राम और श्याम’ हा १९६७ ला आलेला चित्रपट ‘रामुडू भीमूडू’ या १९६४ ला आलेल्या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. मात्र आज ओळखतो आपण दिलीप कुमारच्या चित्रपटाला. विनोद खन्ना यांचा १९८८ चा ‘दयावान’ चित्रपट हा १९८७ च्या ‘नायगन’चा रिमेक आहे. यात कमल हसन मुख्य भूमिकेत आहेत. अनिल कपूरचा ‘नायक’ चित्रपट  तमिळ भाषेतील ‘मुधलवन’चा रिमेक आहे. अमिताभ यांचा ‘सूर्यवंशम’ देखील तमिळ रिमेक आहे.

पुढे ऐका… गजनी, फोर्स, जुडवा, वॉन्टेड, बॉडीगार्ड, तेरे नाम, जुदाई इतकंच काय सगळ्यांचा आवडता ‘रेहाना है तेरे दिल मे’ आणि अक्षय कुमारचा ‘हेरा फेरी’ सुद्धा रिमेकच आहे. अजून ढिगाने अशी नावं आहेत.

हे सगळेच बॉलिवूडचे चित्रपट ब्लॉकबस्टर आहेत. मात्र खरं श्रेय, कथा, कष्ट तर साऊथचे होते.

अशी ही लढाई अस्मितेची होती, अस्तित्वाची होती. जिच्या विजयाची सुरुवात झाली ‘बाहुबली’ विजय ध्वजापासून.

२०१५ ला आलेला ‘ बाहुबली : द बिगिनींग’ चित्रपटाने कल्ला केला. एस.एस. राजमौली यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटाने नवीन ट्रेंड भारतीय सिनेमांमध्ये आणला. याआधी अनेक साऊथ सिनेमे आपण हिंदी डब केलेले टीव्हीवर बघायचो, मात्र या चित्रपटाने साऊथ सोबतच हिंदी भाषेत मोठ्या पडद्यावर स्वतःला लॉन्च केलं.

प्रेक्षकांना अगदी हवं ते मिळालं आणि साऊथ इंडस्ट्रीला देखील. जेव्हा हा चित्रपट भारतात हिट ठरला तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवाजे उघडे झाले. साऊथ इंडस्ट्रीला ‘भारतीय सिनेमे’ म्हणून अधिकृत दर्जा मिळू लागला, ओळखलं जाऊ लागलं.

तसं तर थलैवा रजनीकांत यांचा २०१० ‘रोबोट’ चित्रपट देखील असा प्रदर्शित झाला होताच. वर्ल्डवाईड ग्रॉस कलेक्शन ७२३.३० कोटींच्या घरात गेलं होतं. मात्र जी साखळी त्यानंतर हवी होती ग्रीप धरून ठेवण्यासाठी ती तेव्हा नव्हती. रोबोट तेव्हा एकटाच पडला होता. 

बाहुबलीने क्षेत्रीय सिनेमा आणि हिंदी सिनेमा यातील अंतर दूर केलं. बाहुबली नंतर यशचा केजीएफ आला. मग अल्लू अर्जुनचा पुष्पा आणि राम चरण, ज्युनिअर एन्टीआरचा आरआरआर यांनी एंट्री करत ‘प्रादेशिक सिनेमा’ हा टॅग पुसला आहे. दरम्यान साहो, राधे श्याम हे चित्रपट हवी तशी कमाई करू शकले नसले तरी ओळख निर्माण करण्यात हातभार राहिलाच कारण लोकांना हे चित्रपट प्रदर्शित होतायेत याची जाणीव होतीच. 

साऊथच्या या लढाईमुळेच आज इतर प्रादेशिक भाषांच्या सिनेसृष्टीकडे बघण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांना देखील भारतीय चित्रपट म्हणून स्वीकारलं जातंय. हीच अस्मितेची लढाई जाणत आता मराठी चित्रपटसृष्टीही देखील एकामागून एक खुंखार चित्रपट देत आहेत.

शिवाय आता बॉलिवूड जेव्हा कुणाची कॉपी करतं तेव्हा लगेच सर्वांना कळतंय. आणि लोक मुख्य चित्रपटाला जास्त पसंती देताना दिसतात. उदाहरण घ्यायचं तर कबीर सिंग हा चित्रपट. साऊथ मुव्ही ‘अर्जुन रेड्डी’ चा हा रिमेक असल्याचं लोकांना कळलं तेव्हा अनेकांनी तो चित्रपट बघितला आणि ‘ओरिजनलच वंटास असतंय’ हे मान्य केलं.

आज साऊथचे चित्रपट एका मागून एक रेकॉर्ड तोडत आहेत. बाहुबली १ ने तब्बल ६५० करोंड कमावले आणि सिनेमाचं बजेट १८० करोड रुपये होतं. तर बाहुबली २ सिनेमाने १८१० करोड रुपयांची कमाई केली. केजीएफ १ हा २५० कोटींच्या घरात गेला होता. अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राइजने जगभरातील तिकीट विक्रीतून ३०० कोटींहून अधिक कलेक्शन केले. तर आरआरआरने रिलीजच्या ४-५ दिवसात तब्बल ५०० कोटी कमावले…  

यशच्या केजीएफ : चॅप्टर २ ची सध्या जगभरात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई होत आहे. तर या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात ९०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आणि अजूनही जोरदार चालू आहे. 

अशा या साऊथ चित्रपटांनी सगळे रेकॉर्ड तोंडात स्वतःवरील ‘प्रादेशिक’ टॅग तोडला आहे. आता तर जागतिक स्तरावर त्यांनीच जम बसवला आहे. त्यांचे रिमेक कुणी करू शकेल अशी जागाच सोडली नसल्याने बॉलिवूड शांत दिसतंय.

या चित्रपटांमुळे साऊथ अभिनेत्यांची अभिनय कला तर सर्वाना दिसत आहेच मात्र त्यांचे कथा लेखक आणि दिग्दर्शक यांची प्रतिभा सर्वश्रुत होतेय. म्हणून तर आता साऊथ दिग्दर्शकांसाठी बॉलिवूड हातपाय मारताना दिसतंय.

आजवर ज्यांच्या कलेला चोरून बॉलीवूडने ‘भारतीय सिनेमा’ म्हणून स्वतःला मिरवलं त्यांनी स्वतःच्या अस्मितेची लढाई जिकली आहे आणि नवीन गड जिंकत झेंडे गाडताना दिसत आहेत. जगभरात धूर करणाऱ्या साऊथ इंडस्ट्रीच्या जिद्दीचं हे उदाहरण आहे.

खऱ्या अर्थाने ‘कलेचा’ हा विजय आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.