तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपाचा अंदाज आधीच आला होता?

कोणत्या एका देशात नाही तर, एकाच वेळी ४ वेगवेगळ्या देशात भुकंप आला. तुर्की, सीरिया, लेबनॉन व इस्रायल या चार देशांमध्ये भुकंप झाला. या भूकंपामुळे जवळपास दीड हजाराहून अधिक लोकांचा मत्यू झालाय. या भुकंपाचं केंद्र हे तुर्कीमध्येत होतं. तुर्की देशातल्या गझियानटेप इथून भुकंपाला सुरूवात झाली.

तुर्कीमध्ये सर्वाधिक एक हजारापेक्षा अधिक मृत्यू झालेत. तर, पाच हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झालेत.

तुर्कीतल्या स्थानिक माध्यमांमधल्या वृत्तांमधल्या माहितीनुसार भूकंपाचे दोन धक्के बसले. पहिला धक्का हा तिकडच्या वेळेनुसार पहाटे ४ वाजता आणि त्यानंतर सकाळी १० वाजता दुसरा धक्का बसला. पहिल्या धक्क्याची तीव्रता ७.७ होती तर दुसऱ्याची ७.६ इतकी होती. याशिवाय, ७८ आफ्टर शॉट्स म्हणजे भूकंपानंतर जाणवणारे धक्के नोंदवण्यात आलेत.

सोशल मीडियावर तुर्की आणि सीरियामधल्या मोठमोठाल्या इमारती पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळतानाचे व्हिडीओ तुम्ही बघितले असतीलच. त्या व्हिडीओजमधून या भुकंपाची तीव्रता आणि तो किती भीषण होता याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल.

यापुढे जाऊन सांगायचं झालं तर, या भूकंपाचा अंदाज दोन दिवस आधीच आला होता.

डच संशोधक रँक फ्रँक हूगरबीट्स, जे सोलार सिस्टीम जीओमेट्री सर्व्हे या संस्थेत काम करतात. नेदरलँडमधली ही संस्था भूकंपाच्या क्रियाकलापांशी संबंधित खगोलीय पिंडांमधील भूमितीचे निरीक्षण करते. त्यांनी तीन दिवसांपूर्वी म्हणजे ३ फेब्रुवारी रोजी भूकंपाचा अंदाज व्यक्त केला होता.

हा अंदाज त्यांनी ट्वीट करून व्यक्त केला होता. त्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय,

“येत्या काही दिवसात किंवा काही काळानंतर तुर्की, सीरिया, जॉर्डन, लेबनॉन या ठिकाणी जवळपास ७.५ मॅग्निट्यूडचा भूकंप होऊ शकतो.”

याशिवाय ते काम करत असलेल्या सोलार सिस्टीम जीओमेट्री सर्व्हे या संस्थेनेसुद्धा आपल्या वेबसाईटवर एक अहवाल प्रदर्शित केला होता. त्यामध्ये त्यांनी या भूकंपाबद्दल अंदाज दिला होता.

या अहवालात संस्थेने २ फेब्रुवारीमध्ये म्हटलं होतं, ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान बहुधा मध्य किंवा उच्च ६ मॅग्निट्यूडच्या तीव्रतेपर्यंतची मोठ्या भूकंपाची क्रिया होऊ शकते. ४ फेब्रुवारीच्या आसपास भूकंपाची मोठी घटना घडण्याची किरकोळ शक्यता आहे.

आता हा भूकंप झाल्यानंतर त्यांचं ट्वीट हे जास्त व्हायरल होतंय. त्यांनी आज सकाळी एक नवीन ट्वीट केलंय,

“मी आधी म्हटल्याप्रमाणे लवकरच किंवा नंतर हे घडणारच होतं.”

हूगरबीट्स यांनी ट्वीट केलं आणि ते आता व्हायरल होतंय, पण त्यांनी एकट्यानेच हा अंदाज व्यक्त केला होता असं नाहीये. याआधीही अभ्यासू लोकांनी हा अंदाज वर्तवला होता.

मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात या भूकंपासंदर्भात अंदाज वर्तवण्यात आला होता. भूकंप या विषयाचा अभ्यास करणाऱ्या एका व्यक्तीने हा अंदाज वर्तवला होता. गाझियानटेपपासून १,२४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या मारमारा प्रदेशात मोठ्या हालचाली होऊ शकतात असा अंदाज त्यांनी वर्तवला होता.

विशेष म्हणजे त्यांनी सांगितलेलं हे ठिकाण आजच्या भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून अगदी जवळ आहे.

सोलार सिस्टीम जीओमेट्री सर्व्हे या संस्थेने वेबसाईटवर टाकलेल्या अहवालाचा किंवा हूगरबीट्स यांनी केलेल्या ट्वीटचा विचार करून योग्यवेळी उपाययोजना करण्यात आल्या असत्या तर, भूकंप रोखणं तरी शक्य झालं नसतं, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली जीवितहानी आणि वित्तहानी टाळणं नक्कीच शक्य झालं असतं असं बोललं जातंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.