गेल्या सात महिन्यात वाघाच्या हल्ल्यात एकट्या गडचिरोली जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू

सुट्ट्यांमध्ये जंगल सफारी करण्याची इच्छा झाली आणि त्यातही वाघ बघायचा असेल तर डोळ्यासमोर एकच पर्याय उभा राहतो..

तो म्हणजे ताडोबा..

वाघ म्हटलं कि ताडोबा.. हे समीकरण इतकं जुळलं आहे कि दुसरं कोणतंही ठिकाण सहजासहजी आठवत नाही आणि का आठवू नये ? ताडोबा आहेच असं कि सगळ्यांना त्याची भुरळ पडते.. 

पण ताडोबाच नाही तर महाराष्ट्रातील सहा पैकी पाच व्याघ्र प्रकल्प एकट्या विदर्भात आहेत. परंतु वाघ जरी विदर्भाचे भूषण असले तरी त्यातून निर्माण झालेला मानव वन्यजीव संघर्ष मात्र दिवसेंदिवस वाढत चालला आहे..

गडचिरोली शहराजवळ वाघाच्या हल्यात एका युवकाचा मृत्यू झालाय. गेल्या सात महिन्यात वाघाच्या हल्ल्यात झालेला हा दहावा मृत्यू आहे. 

तर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जारी केलेल्या आकडेवारीवरून महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षात ४२ वाघांचा मृत्यू झालाय. दिवसेंदिवस वाढत चालेल्या मानव-व्याघ्र संघर्षाला इंटरनॅशनल टायगर डेच्या निमित्ताने समजून घ्यायलाच हवे.. 

आधी समजून घेऊयात पूर्व विदर्भातील टायगर रिझर्व्ह बद्दल.. 

मध्य भारत हा कायम वाघांचं मोठं निवासस्थान राहिला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि विदर्भ या विस्तीर्ण प्रदेशात भारतातील सगळ्यात जास्त वाघ राहतात. त्यामुळेच विदर्भात ताडोबा, पेंच, मेळघाट, नवेगाव नागझिरा आणि बोर हे पाच टायगर रिझर्व्ह आहेत. 

यातील मेळघाट वगळलं तर बाकी चार व्याघ्र प्रकल्प एकट्या पूर्व विदर्भात एकमेकांच्या शेजारीच वसलेले आहेत. त्यामुळेच पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात वाघांचा मुक्त संचार आहे. 

ताडोबा, नवेगाव नागझिरा, पेंच व बोर आणि यामधील कॉरिडॉर..

ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यात अगदी मधोमध वसलेलं आहे त्यामुळे इथले वाघ पश्चिमेकडील वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील बोर आणि टिपेश्वर अभयारण्यात जातात सोबतच पूर्वेकडील गडचिरोली जिल्ह्यातील जंगलामध्ये जातात. 

गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेला गोंदिया जिल्हा आहे. गोंदिया जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. यातील वाघ सुद्धा गडचिरोली कॉरिडॉरमधून ताडोबाकडे येतात तसेच बाजूला असलेल्या भंडारा  जिल्ह्यातील जंगलांमधून नागपूर आणि मध्य प्रदेशात पसरलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात जातात.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघ सुद्धा पूर्वेकडील भंडारा कॉरिडॉरमधून नवेगाव प्रकल्पात जातात तसेच नागपूरच्या जवळ असलेल्या वर्धा जिल्ह्यातील बोर आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रकल्पाकडे जातात.

बोर प्रकल्पातील वाघ हे नागपूर जिल्ह्यातील पेंच, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा आणि यवतमाळ जिल्यातील टिपेश्वर अभयारण्यात फिरत असतात. 

एकमेकांच्या शेजारी वसलेले हे व्याघ्र प्रकल्प आणि त्यांच्या मधोमध असलेल्या अभयारण्यांमुळे वाघ या भागात वावरत असतात. वाघांच्या या मुक्त संचारामुळे कॉरिडॉर भागात आणि बफर झोन मध्ये संघर्ष वाढायला लागला आहे.  

व्याघ्र प्रकल्प आणि बफर झोन..

व्याघ्र प्रकल्पाचा निश्चित असा भाग असतो मात्र वाघ आणि वन्य प्राणी हे या नियमाला ते आपल्या नैसर्गिक उर्मीने आपले इलाखे ठरवतात. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवताल असलेल्या  भागाला बफर झोन म्हणतात. 

या बफर झोनमध्ये माणूस आणि वाघ दोघांचा संघर्ष कायम आहे. मात्र हा संघर्ष या बफर झोनच्या बाहेर पडत आहे. कारण विदर्भात असलेल्या वाघांच्या संख्येनुसार त्यांना राहायला जागा उरलेली नाही. 

तसेच म्हातारे वाघ, जखमी वाघ, आणि तरुण झालेले वाघ जेव्हा प्राईडच्या बाहेर हाकलले जातात तेव्हा ते या कॉरिडॉरमध्ये भटकतात आणि त्यामुळे परिस्थिती बिघडते. 

प्राईड हा वाघिणींचा असतो.. 

वाघांचा जो प्राईड असतो त्यात निव्वळ वाघिणी असतात. त्या मातृसत्ताक पद्धतीने त्या प्राईडमध्येच राहतात. त्या प्राईडचा प्रमुख एक नर वाघ असतो आणि तोच वाघ या सगळ्या वाघिणींचा जोडीदार असतो. 

यात वाघाने जन्माला घेतलेली पिल्लं  जेव्हा तरुण होतात तेव्हा त्यांना या प्राईडमधून हाकलून लावलं जातं. तसेच जेव्हा प्राईडचा प्रमुख नर म्हातारा होतो तेव्हा दुसरा तरुण वाघ म्हाताऱ्या वाघाला हरवून त्याचा प्राईड जिंकून घेतो. 

बाहेर काढण्यात आलेले तरुण वाघ आणि म्हातारे झालेले वाघ जेव्हा बाहेर पडतात तेव्हा कॉरिडॉर मध्ये संघर्ष निर्माण होतो. 

अन माणूस नि वाघ एकमेकांच्या समोर आले..

१९७० मध्ये लुप्त होत चालेल्या वाघांचे संरक्षण करण्याची सुरुवात झाली. त्यामुळे भारतात अनेक टायगर रिझर्व्ह घोषित केले जाऊ लागले. यातूनच विदर्भात मेळघाट, पेंच आणि ताडोबा या व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती झाली. 

याच काळात शेतजमिनीच्या कमतरतेमुळे लोकांनी जंगलाची तोड सुरु केली. त्यातच शिकार आणि वनउपज गोळा करण्यावर बंधनं आल्यामुळे आदिवासी समुदायालासुद्धा जमिनींचे वाटप करण्यास सुरुवात झाली. 

वाघांचे संवर्धन सुरु झाल्यामुळे वाघांची संख्या वाढायला लागली तर शेतीसाठी माणसाची जमिनीची भूक सुद्धा वाढत गेली. त्यातूनच माणूस आणि वाघांमधील संघर्ष जन्माला आला .. 

मानव व्याघ्र संघर्ष असा आहे.. 

 

सहसा वाघ मानवी वस्तीत येत नाही. मात्र वाघ जखमी असेल, त्याचा दात तुटला असेल, किंवा वाघ म्हातारा असेल तरच वाघ मानवी वस्तीच्या जवळ येतो. आणि सहज मिळणाऱ्या पाळीव प्राण्यांची शिकार करतो.

अपघाताने माणूस वाघाच्या जवळ आला किंवा वाघ जखमी असेल तरच तो माणसाची शिकार करतो. अन्यथा वाघ माणसाला मारत नाही. परंतु हल्ली वाघाने माणसावर हल्ला करण्याचे प्रमाण वाढत आहे..

विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांच्या बफर क्षेत्रात एकूण ४८५ गावं आहेत तर तब्बल ९००० गावांमध्ये वाघाचा वावर आहे. २००७ ते २०२० या काळात एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात १६५ लोकांचा मृत्यू झालाय.

वाघांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर..

विदर्भातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये एकूण ५५२ वाघांची नोंद आहे. यात ८० वाघ ताडोबा प्रकल्पात आहेत. मात्र अभयारण्याच्या बाहेरील क्षेत्रापेक्षा अभयारण्याच्या आतच मोठ्या प्रमाणावर वाघांचा मृत्यू होत आहे. 

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१२-२२ या दहा वर्षात महाराष्ट्रात एकूण १८३ वाघांचा मृत्यू झालाय. तर गेल्या दीड वर्षात ४२ वाघांचा मृत्यू झालाय. २०२२ या चालू वर्षात देशभरात ७५ वाघांचा मृत्यू झालाय तर महाराष्ट्रात १४ वाघांचा मृत्य झालाय.

यात अपघात, वृद्धापकाळ, शिकार, लढयात होणाऱ्या जखमा इत्यादी कारणांमुळे वाघांचा मृत्यू होत असला तरी शिकार आणि अभयारण्यातील विकासकामांमुळे होणारे अपघात याच्यामुळे वाघांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. 

सर्वाधिक वाघांची मृत्यू होणारा मध्य प्रदेशची सीमा विदर्भाला खेटलेली आहे..

भारतात सर्वाधिक वाघांची संख्या मध्य प्रदेशात आहे आणि सर्वाधिक वाघांचा मृत्यू सुद्धा मध्य प्रदेशातच  होतो. यातच विदर्भ आणि मध्य प्रदेशाची सीमा एकच आहे. 

त्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन राज्यांमध्ये विभागलेले आहे. त्यामुळे वाघांच्या मृत्यूवर मध्य प्रदेशातील कारणं जबाबदार असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. 

 तर मेळघाट आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प अगदी सीमेवर आहे त्यामुळे वाघांचा मध्य प्रदेशात संचार असतो. सोबतच याच व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. 

विदर्भात आणि प्रामुख्याने पूर्व विदर्भात वाढत चाललेला माणूस आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष वाढत आहे. परंतु वनविभाग आणि सामान्य नागरिकांमध्ये समन्वय साधला जात नसल्याने भविष्यात हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे..

हे ही वाच भिडू  

 

 

1 Comment
  1. not so important says

    कोणाच्यातरी बोलण्याने किंवा मते ऐकल्याने ती पब्लिश करू नका. सामान्यतः वनालगत राहणाऱ्या आदिवासी व गावकरी बऱ्याच वेळा सांगूनही जंगलात जातात. ब्रह्मपुरी गडचिरोली या भागात बरेचसे वेळा वाघाचे प्रमुख अन्न हे पाळीव पशु असतात. जे जंगलात चरण्यासाठी सोडलेले असतात. अशावेळी पशु सोबत जर गुराखी असेल तर पशु प्रथमता आणि गुराखी जर चपळ नसेल तर गुराखी ही मारला जातो. दुसरे कारण जंगलात एकट्याने प्रवास करणे. वनविभागाने पुन्हा पुन्हा सांगून गावकरी कधीही ऐकत नाही. आपला रोजचा गाडा आपल्या प्रकारे चालूच ठेवतात. तिसरे कारण सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे आता दूध न देणाऱ्या गाई कोणाला विकू शकत नाहीत. या गाई जंगलात सोडून जर एखादा वन्य पशु तिला खाऊन टाकेल तर त्यास नुकसान भरपाई मिळते. कारण एक व कारण तीन हे मुख्य कारण असून सरकारने कितीही जनजागृती केली तरी त्यास अर्थ नसतो. गडचिरोली भागात किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या ही भागात प्रशासनावर लोकांचा प्रचंड दबाव आहे. लोक सांगितलेल्या गोष्टी जरी पाळल्या तरी मानव वन्यजीव संघर्ष नक्कीच किमान 50 टक्क्यांनी अथवा त्याहुनी जास्त कमी होण्याची शक्यता आहे. आपल्या चॅनलची रिसर्च नेहमीच उत्कृष्ट असते. तरी आपणास पुनश्या विनंती करण्यात येते की कृपया ग्राउंड truthing करून घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.