धर्म, अध्यात्म आहेच पण एका वारीत कोटींचा टर्नओव्हर होतो, कित्येकांचा संसार चालतो..!!!
जून महिन्यात एकीकडे बळीराजा पेरणीची तयारी करत असताना दुसरीकडे गावोगावचे वारकरी आषाढी वारीसाठी आळंदीत दाखल होत असतात. कोरोनामुळे सलग दोन वर्ष आषाढी पायी वारी रद्द करण्यात आली. मात्र यंदा सगळ्या पालख्यांनी थाटात प्रस्थान केलं आणि पांडुरंगाचा गजर करत, पंढरपूर गाठलं.
उन पाऊस याची तमा न बाळगता शेकडो वर्षापासून नित्यनेमाने सुरू असलेली आळंदी ते पंढरपूर पायी वारीची परंपरा पुन्हा एकदा उत्साहात न्हाऊन निघाली.
लाखो वारकरी एकाच वेळी पायी चालत असल्याने वारीची एक अर्थव्यवस्था तयार झाली आहे. जी वारी दरम्यान समांतर सुरु असते. पायी वारीमुळे अर्थव्यवस्थेवर काय परिमाण होतो, याचा बोल भिडूने घेतलेला आढावा.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दोन वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरच्या दिशेने जातात. यात लहान-मोठ्या १५० दिंड्याच्या माध्यामतून १० लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी होत असतात. हे वारकरी आळंदी, देहू, पैठण, मुक्ताईनगर येथून पंढरपूरसाठी पायी वारी करतात.
महाराष्ट्राच्या कान्याकोपाऱ्यातून लाखो वारकरी पायी वारी साठी आळंदीत दाखल होतात. यासाठी आपल्या गावातून बस, रेल्वे, जीपच्या माध्यमातून येत असतात.
बस
२०१८ सालचा विचार केला त्यावेळी राज्यभरातून आषाढी वारीसाठी पंढपूरला एसटी महामंडळाच्या वतीनं ३ हजार ७८१ बस सोडण्यात आल्या होत्या. तसेच वारी सुरु होण्यापूर्वी राज्यभरातून पुण्यासाठी हजारो विशेष बस सोडण्यात येतात. पुण्यावरून मग हे वारकरी पीएमपीच्या माध्यमातून आळंदीला जातात.
त्याच वर्षी रेल्वेच्या वतीने ७२ विशेष रेल्वे पंढरपूरसाठी राज्यभरातून पाठविण्यात आल्या होत्या. या सर्व रेल्वेचे रिजर्वेशन फुल्ल झाले होते. साहजिकच हा एवढा सगळा महसूल वारीच्या काळात शासनाच्या तिजोरीत जमा होतो.
खासगी वाहने
महाराष्ट्र राज्य वाहन मालक चालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी बोल भिडूशी बोलताना सांगितलं होतं की, ‘दरवर्षी ३०० ट्रक आणि एक ते दीड हजार खासगी बस वारी निम्मित पंढरपूरला जात असतात. या सर्वांची आर्थिक उलाढाल १० कोटींपेक्षा जास्त असते.’
किराणा दुकान
पायी वारीत कुटुंबाच्या कुटुंब सहभागी होत असतात. आळंदी ते पंढरपूर असा १८ ते १९ दिवस हे चालत असतात. एकाच वेळी सर्व वस्तू सोबत घेवून प्रवास करणे शक्य नसते. त्यामुळे दोन ते तीन दिंड्यांमागे एक किराणा दुकान असते. वारकरी रोजच्या लागणाऱ्या सर्व गोष्टी या दुकानांमधून घेत असतात. यांचीही मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल या काळात होत असते.
मुक्कामाच्या ठिकाणी यात्रा
ज्ञानेश्वर माऊली पालखीचा विचार केल्यास वारी दरम्यान १५ ठिकठिकाणी मुक्काम करते. सासवड सारख्या ठिकाणी २ दिवस पालखी मुक्कामाला असते. या प्रत्येक ठिकाणी यात्रा भरते. मुक्कामाच्या ठिकाणी पालखीच्या आजूबाजूंच्या ५० गावाचे लोक येतात. त्याठिकाणी मोठ्ठी यात्रा भरते, जिथं कित्येकांना रोजगार उपलब्ध होतो.
जेवण बनवणाऱ्या १५ हजार लोकांना रोजगार
साधारण १५० लहान- मोठ्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने वेगवेगळ्या मार्गाने येतात. प्रत्येक दिंडी सोबत एक आचारी आणि जेवण बनवणारे ८ ते १० जण आणि तंबू ठोकणारे ३ ते चार जण सोबत असतात. हे लोक पगारी असतात आणि त्यांचा उदरनिर्वाह हा या कामातून चालतो.
१ हजार वारकऱ्यांचं जेवण बनवायला १० ते १२ जण तरी लागतात. जेवण बनवणारी १५ हजार जण वारीसोबत असतात. साहजिकच या १८-१९ दिवसांत त्यांच्या रोजगाराची सोय होते.
“साधारण १० हजार खासगी वाहने वारीत सहभागी होतात. त्यावर असणाऱ्या ड्रायव्हर यांचं पोटपाणी वारीवर अवलंबून असतं. खासगी वाहनावरील ड्रायव्हरला पगाराव्यतिरिक्त भत्ता देण्यात येतो, यातून त्यांना चांगले पैसे मिळत असतात,” असं ड्रायव्हर कबीर चव्हाण यांनी सांगितले.
वारीचे अभ्यासक सचिन पवार बोल भिडूशी बोलताना म्हणाले की,
“वारीच्या माध्यामातून वारकरी दरवर्षी शासनाला प्रत्यक्ष कोट्यावधीचा महसूल देतो. वारी रद्द झाल्याने हा महसूल शासनाला मिळणार अन्ही. वारीत १० लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी होत असतात. त्यांच्या माध्यमातून एक समांतर अर्थव्यवस्था चालत असते.”
वारकऱ्यांच्या दिंड्यांना एक चालक असतो. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचं जेवण, नाश्ता आणि राहण्यासाठी १ ते दीड हजारांची भिशी घेतली जाते. यातून सुद्धा मोठे पैसे बाजारात येतात. त्यामुळे वारीसोबतच मोठी आर्थिक उलाढाल होत असते.
फोटो क्रेडिट- अप्पा चंदा चौगुले जयसिंगपूर
हे ही वाच भिडू:
- तुकोबांच्या पादुका पालखीत ठेऊन त्यांनी पहिली वारी केली ती आजतागायत सुरू आहे.
- ब्रिटिशांनी देखील वारीवर बंदी घातलेली, ती मोडण्यासाठी सावरकरांनी एक प्लॅन बनवलेला…
- जसा १५ ऑगस्टला तिरंगा पिक्चर तसाच एकादशीला, ‘पंढरीची वारी’