ज्या कोलकाता कनेक्शनमुळे अनिल देशमुख गोत्यात आले आहेत ते असं आहे…

आज ईडीने अनिल देशमुख यांच्या घरावर सकाळी-सकाळी छापेमारी केली. प्रामुख्यानं ही छापेमारी कोलकाता प्रकारणात तपास केल्यानंतर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे तिकडे झालेल्या आर्थिक व्यवहारांचे संबंध तपासण्यासाठी हे छापे असल्याचा दावा केला जातं आहे.

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील आज पत्रकार परिषद घेऊन कोलकात्यामधून अनिल देशमुख यांनी पैसे वळवले असल्याचा आरोप केला आहे.

१०० कोटी वसुलीचे आरोप झाल्यानंतर देशमुख यांच्यामागे आधी सीबीआयचा आणि नंतर ईडीचा ससेमिरा लागला आहे. याआधी एप्रिलमध्ये सीबीआयकडून छापेमारी झाली होती. त्यानंतर आता ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात ईडीकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पण हे नेमकं कोलकाता कनेक्शन काय आहे याबद्दल विचारले जात आहे

तर सीबीआयच्या तपासानंतर आणि गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर मागच्या महिन्यात ११ मे रोजी ईडी कडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी ईडीने सांगितले कि आम्ही सीबीआयने नोंद केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

 

त्यावेळी १०० कोटी वसुली प्रकरण तसेच बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या आरोपांनंतर या पैशाचं नेमकं झालं काय झालं? या पैशांचा वापर कसा करण्यात आला? हवाला मार्फत ते बाहेर पाठवण्यात आले का? किंवा कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्याची गुंतवणूक केली गेली का? या सर्वांचा तपास ईडी करणार असल्याचं माध्यमांमधून सांगण्यात आलं होतं. 

आता याच ठिकाणी कोलकात्याचा संबंध आला. सीबीआयने अनिल देशमुख यांचे आर्थिक व्यवहार तपासताना काही त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित आर्थिक व्यवहार देखील तपासले असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यावेळी सीबीआयला कोलकातामध्ये दोन बनावट कंपनीची कागदपत्र आढळून आली होती. 

या बनावट कंपनीद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. ते देशमुखांशी संबंधित असल्याचा संशय ईडीला आला. त्यानंतर याच कागदपत्रांचा आधार घेत ईडीने तपास सुरू केला. यात २६ मे आणि १७ जून रोजी ईडीने देशमुख यांच्याशी आणि त्यांच्या मुलांशी संबंधित काही मित्र आणि चार्टड आकाउंटन्ट यांच्या घरी नागपूरमध्ये छापेमारी केली होती.

त्यानंतर आज ईडीने थेट अनिल देशमुख यांच्या घरी छापेमारी केली आहे. 

सीबीआयच्या सूत्रांनी काही हिंदी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार,

सीबीआयला आढळलेल्या कागदपत्रांमध्ये मुख्य कंपनी रडारवर होती ती म्हणजे अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांचे शेअर्स असलेली झोडियाक डेलकॉम हि कंपनी.

झोडियाक डेलकॉम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोलकात्यामध्ये असून २०१९ साली ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांनी ती विकत घेतली होती. देशमुख यांचे पुत्र चालवत असलेल्या अयती जेम्स, काँक्रीट रियल इस्टेट, अटलांटिक विस्टा रियल इस्टेट आणि काँक्रीट इंटरप्रासेस या कंपन्यांच्या माध्यमातून २०१९ साली झोडियाक डेलकॉम कंपनी विकत घेण्यात आली होती.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार,

या झोडियाक डेलकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अधिकृत पत्ता होता, 9/12 लाल बाजार, ब्लॉक ई, सेकेंड फ्लोअर, कोलकाता.

आता हा जो पत्ता आहे तो शेल कंपन्यांचा हॉटस्पॉट मानला जातो. 

या पत्त्यावर असलेली इमारत ही ब्रिटिशकालीन आहे, ज्याचा वापर ब्रिटिश इंग्लंडमधून आयात केलेले लोखंडी बीम ठेवण्यासाठी करत होते. ज्याला आता मर्केंटाइल बिल्डिंग्स असं देखील म्हंटलं जातं. या इमारतीला २०१७ मध्ये केंद्र सरकारकडून शेल कंपन्या आणि काळ्या पैशावर कारवाई करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सने शेल कंपन्यांचे हॉटस्पॉट म्हणून सांगितलं होतं.

मात्र पुढे या शेल कंपन्यांना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून बंद करण्यात आलं होतं. पण रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या रेकॉर्डनुसार त्यामधील १०० पेक्षा अधिक कंपन्या अजूनही एकाच इमारतीमध्ये सक्रिय आहेत. यातील कमीत कमी ३० सक्रिय कंपन्यांकडे झोडियाक डेलकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा जो पत्ता आहे तोच पत्ता आढळून आला आहे.

सध्या ईडीकडून याच कंपन्यांचा तपास करण्यात येत असल्याचं सांगितलं जातं आहे. याआधी देखील ईडीकडून कोलकात्यामध्ये तपास केला असल्याचं माध्यमांमध्ये सांगितलं जातं आहे.

आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांनुसार छगन भुजबळ यांनी देखील अशाच प्रकारे कोलकत्याच्याच कंपन्यांनमधून पैसा आपल्या व्यवसायात वळवला होता. आता अनिल देशमुख यांनी देखील तशाच प्रकारे पैसे वळवले आहेत. त्यामुळे आता देशमुख हे देखील लवकरचं तुरुंगात जातील असं त्यांनी म्हंटलं आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.