गावातल्या पोरांना शाळेला जाता यावं म्हणून वनविभागाने उभा केला शिक्षणाचा सेतू

आपल्या आयुष्यात शिक्षण किती महत्वाचं आहे, हे काय वेगळं सांगायला नको. सध्या कोरोनाच्या काळातही शाळा जरी बंद असल्या तरी मुलांच्या शिक्षणात खंड पडता कामा नये म्हणून ऑनलाईन शिकवणी सुरु केलीये. आधी मोबाईल घेऊ नको म्हणून बोलणारे पालक, आज स्वतःहून पोरांना मोबाईल घेऊन बस, असं म्हणायला लागलेत.

पण या महामारीच्या आधीचं बोलायचं झालं तर शाळेत गेल्यावर मास्तर मारतात, या भीतीनं बहुतेक घरात सकाळ- सकाळी रडगाणं ऐकायला मिळायचं, यात घरच्यांचा मार बसायचा तो वेगळाच.

पण असं एक गाव आहे जिथं शाळेतली मुलं तर शाळेत जायला टाळाटाळ करायचीच पण पालकही आपल्या पोरांना शाळेत पाठवायला घाबरायची.

यामागचं कारण होत गावातून शाळेत जाताना लागणारा पूल.

हे गाव म्हणजे भंडारदऱ्यातल्या जंगलातलं पाचनाई खोकडेवस्ती.  जिथल्या नदीवर असलेला लाकडाचा तरंगता पूल अक्षरशः कोलमडलेल्या अवस्थेत होता. ज्यामुळे शाळेतली मूलचं काय गावकरी सुद्धा  या पुलावरून ये-जा करायला घाबरायची. 

आपला जीव मुठीत ठेवून शाळेत जायचं  म्हटलं की अर्थातच कोणीही टाळाटाळच करेल.  अशीच काहीशी अवस्था या गावातल्या मूलांचीही होती. 

हा प्रकार भंडारदरा वन विभागाला समजला. तिथल्या अधिका-यांनी तातडीने याची दखल घेत या मुलांसाठी मजबूत पूल उभा केलाय. 

भंडारदरा वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी बोल भिडूशी संवाद साधताना सांगितलं की, ‘पाचनाई खोकडेवस्ती हे अत्यंत दूर्गम आदिवासी गाव आहे. भंडाराऱ्यातलं शेवट टोकं. जिथं अंबिल वस्ती, कुुमशेत अशा 7 – 8 छोट- छोट्या वस्त्या आहेत.

या वस्ती वरच्या गावकऱ्यांना बाजारासाठी, मुलांना शाळेत जाण्यासाठी तो एकचं पूल होता. गावात याआधी कधीही मजबूत पूल बांधण्यात आला नव्हता.

तिथली गावकरी स्वत: दरवर्षी  लाकडाच्या पायऱ्यांचा पूल तयार करत. त्याला दोरीच्या सहाय्याने वर लटकवायचे. अर्थातच पूल म्हणावा तेव्हढा मजबूत नव्हता. त्यामुळे दरवर्षी गावकरी नवीन लाकडी पूल बनवायची. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या गावासमोर सगळ्यात मोठी समस्या होती, ती म्हणजे आरोग्य व्यवस्था. गावात जर एखादी व्यक्ती आजारी पडली तर गावकरी मोठ्या कापडाची झोळी बनवून रूग्णाला त्या झोळीतून आणायची. गंभीर अवस्थेत तर अनेकांचा रस्त्यांची जीव जायचा.

वैतागलेल्या गावकऱ्यांनी अखेर आपलं गाऱ्हाणं या वनविभागाच्या अधिकाऱ्यांजवळ मांडलं. या अधिकाऱ्यांनी लगेच पुढाकार घेत सरकार दरबारी पूलाचा प्रस्ताव मांडला आणि गावासाठी नवीन आणि मजबूत असा पूल उभा केला. 

रणदिवे यांनी सांगितलं की, जिल्हा वार्षिक योजना अहमदनगर या योजनेच्या मदतीने या पूल उभारणीसाठी फंड गोळा केला. सोबत भारत सरकारच्या वन योजनेचीही यात मदत झाली.

मार्च 2021 ला या पूल बांधणीच्या कामाला सुरुवात झाली. ज्यानंतर 3 महिन्यात म्हणजे जून महिन्यात हा पूल नागरिकांसाठी सुरू करण्यात आला.

एस. पी. लांडे या आणखी एका वनअधिऱ्यानं बोल भिडूशी बोलताना सांगितलं की, 150  – 200 लोकांची वस्ती असणाऱ्या खोडके गाव त्या लाकडी पुलामुळे अनेक समस्यांचा सामना करायला लागायचा. 

त्या गावाला आणि पेठेच्या वाडीला जोडणारा तो पूल होता. त्या पुलावरूनचं विद्यार्थी आणि नागरीकांना जावं लागायचं.

लांडे यांनी सांगितलं की, अधिकाऱ्यांनी तिथल्या नागरीकांची भेट घेतली असता त्यांनी या पुलाची समस्या मांडली. तिथली बरीचशी मंडळी अशिक्षित होती.

यामागील कारण जेव्हा गावकऱ्यांना विचारलं गेलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, पावसाळ्यात नदी ओसंडून वाहते. त्यामुळे बऱ्याचदा पूल कोसळतो.  सगळा पावसाळा आम्हाला घरीच राहावं लागतं.  आणि यामुळेच शाळेत जाणं अवघड होत. एवढचं काय तर या चार महिन्यात कोणी आजारी पडले तरी तिथले गावकरी लोकल ट्रीटमेंट करायचे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आता पूल तयार झाल्यामुळं अनेक वस्त्या कनेक्ट झाल्यात. आरोग्य, शिक्षण अशा अनेक सुविधा घेणं आता गावकऱ्यांना सोयीस्कर ठरणार आहे. 

हे ही वाचंं भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.