एडवर्ड जेन्नर : देवीला पळवणारा देवमाणूस

आज आपण कोरोनावर लस घेण्याची आतुरतेने वाट पाहत असताना सिरम आणि भारत बायोटेक यांचे लसयुद्ध सुरू आहे. कोवॅक्सीन लसीच्या पुरेश्या चाचण्या झाल्या नाहीत असा स्पर्धक कंपनीचा दावा आहे. तर भारतीय संशोधकांनी लस असल्याने कोवॅक्सीन हीचा पुरस्कार करण्याची त्याच त्या “नेहमीच्या देशभक्तांना” घाई झाली आहे.

या गोंधळावर लवकर पडदा पडावा आणि कोरोना विषाणूवर लवकर विजय मिळावा ही सामान्य जनतेची अपेक्षा.

जसा विजय मानवाने १९८० साली देवीचा विषाणू जगातून हद्दपार करून मिळवला होता..

देवीचा भयानक आजार.. ज्यावर मात करण्यासाठी सव्वादोनशे वर्षापूर्वी लस शोधून काढली गेली होती. ही लस शोधून जगातील सर्वात जास्त जीव वाचवल्याबाबत निर्विवाद श्रेय जाते अशी व्यक्ती म्हणजे,

“प्रतिकारशक्ती शास्त्राचा जनक” एडवर्ड जेन्नर.”

देवीचा संसर्गजन्य आजार सर्वात भयानक होता. दरवर्षी जगभरात किमान दहा लाख लोकांचा बळी घेत होता. याच्या जोरावर स्पेनच्या ५०० सैनिकांनी कोट्यावधी अमेरिकेन मूळनिवासींना नामोहरम केले.

जेव्हा अमेरिका खंड इतर जगापासून अलिप्त होता, तेव्हा साहजिकच इकडच्या कोणत्याच विषाणूच्या संपर्कात नव्हता. कसली प्रतिकारशक्ती विकसित झाली नव्हती. जेव्हा स्पेनची जहाजे तिथे पोचली तेव्हा सोबत नकळत विषाणूदेखील घेऊन गेली होती. जिथे त्या खंडाची लोकसंख्या ६ कोटी होती, पुढच्या शंभर वर्षात ९० टक्के घट झाली.

कोट्यावधी लोकांचा मृत्यू देवीमुळे झाला होता. एकदा साथ आली की ६० टक्के जनता बाधित होणार आणि त्यापैकी ३० टक्के जनता मृत्युमुखी पडणार. जिवंत राहिलेल्या व्यक्तींना आयुष्यभर साठी व्रण देऊन जाणार. काही लोकांना अंधत्व देखील.

अशा या भीषण देवीला पळवून लावणारा व्यक्ती एडवर्ड जेन्नर हा लयं मोठा देव माणूस… जगात देव कुठे नाही, मात्र अशी देवमाणसं आहेत म्हणून तर हे जग सुरू आहे..

एडवर्डचा जन्म १७ मे १७४९ रोजी इंग्लंडमध्ये, ग्लुसस्टरशायर प्रांतात असलेल्या बर्कली नावाच्या छोट्या खेड्यात झाला. वडील स्टीफन आणि आई सारा जेन्नर यांच्या नऊ अपत्यांपैकी एडवर्डचा नंबर आठवा. पाद्री असलेला स्टीफन जेन्नर बऱ्यापैकी जमीनजुमला बाळगून होता. घरात शिक्षणाला पोषक वातावरण होते. पोरं मोठी झाली की उच्च शिक्षणाला ऑक्सफर्डला वगैरे पाठवायची पद्धत होती.
मात्र एडवर्डच्या नशिबात ऑक्सफर्ड नव्हते. अवघा पाच वर्षाचा असताना आई आणि बाप दोघेही वारले.. फक्त दोन महिन्यांच्या अंतराने…
मोठे भाऊ तर ऑक्सफर्डला शिकायला गेले होते. नऊ पैकी तीन भावंडे लहानपणीच मेली होती, उरलेल्या सहामध्ये सर्वात मोठी १९ वर्षाची बहीण होती. तीनेच घराची सूत्रे हाती घेऊन अनाथ चिल्यापिल्या भावंडांचा सांभाळ केला. छोट्या एडवर्डला वनस्पती व प्राणी यांचे अवशेष शोधण्याचा छंद जडला होता. त्याला शाळेत इतिहासातील गोष्टीची घोकंपट्टी करण्याऐवजी निसर्ग रोज जो इतिहास घडवतो तो पाहण्यात जास्त रस होता.
पप्पांनी मरायच्या आधी याचा शैक्षणिक पाया पक्का करून घेतला होता त्यामुळे मेहनत न करता देखील शाळेत तो आघाडीवर असायचा. त्याला स्वतःला लहानपणी देवीचा आजार होऊन गेला होता. ज्याचा त्रास त्याला पुढे आयुष्यभर झाला. तेव्हा त्याच्याशी पंगा घेतला नसता देवीने, तर कदाचित याने पण तिचा नाद नसता केला कदाचित.
एडवर्ड आठ वर्षांचा असताना त्याला गरीब मुलांसाठी असणाऱ्या निवासी शाळेत दाखल केले. पण तिथे शिक्षण अतिशय सुमार होते. लवकरच एडवर्डला त्याच्या भावंडांनी तेथून काढून एका लहान खासगी शाळेत घातले. एडवर्डने लहानपणीच ठरवले की मोठे झाल्यावर वैद्यकीय व्यवसाय करायचा. ग्रीक, लॅटिन भाषांचा त्याने शाळेत अभ्यास केला.
त्याकाळात बहुतेक वैद्यकीय ज्ञान याच भाषेत उपलब्ध असायचे. वयाच्या १४ व्या वर्षी सहाय्यक म्हणून डॉ.डेनियल लुडलव या सर्जनच्या हाताखाली एडवर्ड काम करू लागला. तिथे सात वर्षे शिकल्यानंतर एडवर्ड जेन्नर पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी लंडन येथील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.

सेंट जॉर्ज इस्पितळात दाखल होणे त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे होते.

तिथे त्याला भेटले डॉ. जॉन हंटर. प्रख्यातशल्य चिकित्सक, जीवशास्त्रज्ञ आणि निसर्गशास्त्रज्ञ. हंटरशी जेन्नरचे नाते कायमचे जडले. जेन्नर हा त्यांच्या घरी राहून शिकलेला एकमेव विद्यार्थी. हंटर यांनी १७६७ मध्ये “बॉडी टेंपरेचर” यावर संशोधन करून लंडनमधील प्रसिद्ध रॉयल सोसायटीचे सभासदत्व मिळविले होते. हंटरकडून संशोधनवृत्ती आणि “डोंट थिंक ओन्ली ट्राय इट” ची शिकवण जेन्नरला मिळाली.
त्याच्या आयुष्यामध्ये हंटर यांचा एवढा प्रभाव होता की पुढील संशोधनामध्ये देखील त्याने वेळोवेळी हंटर यांची मदत घेतली. हंटर यांच्याकडे १७७० ते १७७३ अशी तीन वर्ष शिकुन, पदवी प्राप्त करून जेन्नर आपल्या गावी परत आला.
मधल्या काळात त्याची ओळख एच एम बँक या वनस्पतीशास्त्रज्ञाशी झाली. (पुढे ४२ वर्ष बँक हा रॉयल सोसायटीचा अध्यक्ष होता) कॅप्टन कुक आपली सुप्रसिद्ध पॅसिफिक समुद्रात केलेली पहिली सफर संपवून परत आला होता. बँक हा त्याचा हमसफर होता. त्या दोघांनी गोळा करून आणलेल्या सागरी जैविक नमुन्यांचे वर्गीकरण करण्याचे काम अतिशय नीटनेटकेपणाने जेन्नरने केले.
त्याच्या कामाने प्रभावित होऊन कॅप्टन कुकने त्याच्या दुसऱ्या समुद्रसफरीसाठी एडवर्डने सोबत यावे म्हणून ऑफर दिली. पण एडवर्डने कॅप्टन कुकचे मीठ खायला नकार दिला.. त्याला तर डॉक्टर व्हायचे होते,

संशोधन करायचे होते आणि देवीचा काटा काढायचा होता.

वयाच्या चोविसाव्या वर्षी एडवर्ड डॉक्टर बनून आपले मूळ गाव बर्कले येथे परतला आणि वडिलांप्रमाणेच पाद्री झालेल्या (फादर प्रमाणे फादर?) झालेल्या मोठा भावासोबत राहू लागला. गावामध्येच राहत असल्यामुळे शेतीकडे लक्ष देणे शक्य होते, त्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होत होती.
तसेच त्या गावामध्ये एवढा शिकलेला डॉक्टर असणे हीच खूप मोठी उपलब्धी होती. लवकरच चांगला फॅमिली डॉक्टर व सर्जन म्हणून जेन्नरची कीर्ती पंचक्रोशीत पसरू लागली. प्रचंड काम येऊ लागले, जेन्नर देखील निष्ठेने काम करत होता.
एका रात्री तर पेशंटला बघून परत येत असताना हिमवादळात सापडून जेन्नर मरता मरता वाचला. जेन्नरने पंचक्रोशीत नवेनवे प्रयोग करणे सुरू केले. त्याचे लेख, कविता वैद्यकीय पत्रिकेत छापून येऊ लागले. आसपासच्या गावातील वैद्यकीय मित्रांना एकत्र घेऊन एक अभ्यासगट गट निर्माण केला, जिथे सगळे एकत्र येऊन वैद्यकीय माहितीवर चर्चा करीत, वैद्यकीय शोधनिबंधांचे वाचन करीत, आपले ज्ञान अद्ययावत करीत. 
आर्थिक बाबतीत सेटल झाला तरी लग्नाची घाई त्याने केली नाही. अगदी दहा वर्ष डेटिंग केल्यावर कॅथरीनसोबत लग्न केलं.

त्यांच्या भेटीचा पण किस्सा भारी आहे..

एकदम फिल्मी स्टाईल. जेन्नरला इतर विषयांची पण आवड होती. वनस्पतीशास्त्र, भूगर्भविज्ञान याबाबत त्याचा अभ्यास होता. त्याशिवाय आसपास विज्ञानात होत असलेले प्रयोग स्वतः करून पाहण्यात त्याला आनंद वाटत होता.
अशाच एका प्रयोगाने त्याला त्याची ही जीवनसाथी मिळवून दिली. हायड्रोजन फुग्यांचे प्रात्यक्षिक जेन्नरला एवढे आवडले की त्याने स्वतः असे फुगे दोनदा बनवून हवेत पाठविले. त्या फूग्यांनी २० किलोमीटरचा प्रवास यशस्वीपणे केला. आणि असाच एक फुगा कॅथरीनच्या बागेत पडला आणि यांची भेट झाली. पण भावड्याने लग्न करायला दहा वर्ष घेतली. मार्च १७८८ मध्ये यांचे लग्न झाले. पुढे या जोडीला तीन पोरं झाली.
एडवर्डला लहानपणापासून पक्षांचा अभ्यास करण्याची आवड होती. कोकिळेवर त्याने केलेल्या अभ्यासातून असे निष्कर्ष पुढे आले ज्याने आधीच्या कल्पनांना पूर्णपणे छेद दिला. कोकिळा इतर पक्ष्यांच्या घरट्यामध्ये आपली अंडी घालते, एका घरट्यामध्ये एकच अशी अनेक ठिकाणी अंडी घालते हे सगळ्यांनाच माहित.
आधी असा समज होता की अंडी घालताना कोकिळा घरट्याच्या मालक पक्षिणींची अंडी ढकलून देते. एडवर्डने हे शोधून काढले की, कोकिळा नाही अंड्यातून कोकिळ पिल्लू जेव्हा बाहेर येते त्यावेळेस आजूबाजूची सगळी अंडी ढकलून देते. त्याचा हा शोधनिबंध प्रसिद्ध होऊन त्याला १७७८ मध्ये रॉयल सोसायटीचे सन्माननीय सदस्यत्व मिळाले. १७९२ साली सेंट अँड्रूज विद्यापीठाकडून एडवर्डला एम. डी. ही पदवी देखील मिळाली.
याकाळात देवीबद्दल त्याचे निरीक्षण सुरू होतेच.
देवी, युरोपात स्मॉलपॉक्स या नावाने प्रचलित असलेला रोग. शेतीमुळे मानवाचे नागरीकरण झाले तेव्हापासून देवीचा आजार मानवाला छळत आहे असे मानले जाते. पिरॅमिडमध्ये इजिप्तचा पाचव्या फॅरो रॅमसेसच्या तीन हजार वर्षांपूर्वीच्या ममीच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण दिसून येतात. देवीच्या आजाराचा सगळ्यात जुना पुरावा हाच मानण्यात येतो.
मरिआई किंवा शितळादेवीच्या कोपामुळे देवी रोग होतो असा भारतात समज होता. रोगाचे कारण देवी आणि इलाज देखील देवी, त्यामुळेच या आजाराला “देवी” नाव पडले आहे. कुणाला देवी आली की या देवींची पूजा केली जायची.

भारतात बनारस मध्ये देवी होऊ नये यासाठी टीका देणाऱ्यांचा धंदा देखील अनेक वर्ष होता. हे टीकावाले वर्षातून एकदा येऊन टोचून जायचे.. त्यात काय गूढ असायचे काय माहीत.

चीनमध्ये लाल रंगाचे महत्त्व आपल्याला माहीत. लाल रंगाचे कपडे घालून देवीच्या रुग्णाला लाल रंगाच्या खोलीत ठेवले जायचे. गेल्या २५०० वर्षा पासून चीन मध्ये व्हॅरिओलेशन म्हणजे लसीकरणाची अघोरी प्रक्रिया वापरली जात आहे.
या प्रक्रियेमध्ये देवी झालेल्या रोग्याच्या फोडातील जिवंत विषाणूयुक्त द्रव निरोगी व्यक्तीच्या त्वचेवर जखम करून त्यावर चोळून किंवा देवीच्या फोडावरच्या खपलीची भुकटी नाकावाटे हुंगायला लावले जायचे. मात्र यामध्ये निरोगी व्यक्तीला लागण होऊन विनाकारण रुग्ण दगावयाची शक्यता होती.
तुर्कस्तानातील ब्रिटिश अँबेसेडरच्या पत्नी लेडी मेरी वर्टले माँटेने ही व्हेरिओलेशनची पद्धत १७२१ मध्ये ब्रिटनमध्ये वापरण्याचा प्रयत्न सुरू केला होता. उपाय अघोरी असला तरी तेव्हा देवीची दहशत एवढी होती की धोका पत्करून अनेक लोक तो उपाय करून पाहात होते.

एडवर्डने देवीवर लस शोधली असे म्हणणे अन्यायकारक होईल. त्याच्या आधीही अनेकजण जणांनी यशस्वी प्रयत्न केले होते. मात्र शास्त्रशुध्द लस बनवण्याचे श्रेय एडवर्डला मिळेल.

१७६५ मध्ये डॉ. जॉन फ्यूस्टर याने काऊपॉक्समुळे देवीला प्रतिबंध करता येऊ शकेल अशी मांडणी करत लंडन मेडिकल सोसायटीत एक शोधनिबंध सादर केला होता. पण विषय केवळ मांडून चालत नाही, तडीस न्यावा लागतो. जे त्याला जमले नाही.
पुढे अनेक लोकांनी काऊपॉक्सची लस ही देवीचा प्रतिबंध करण्यासाठी यशस्वीरीत्या वापरली होती. जेस्टी या शेतकर्याने देखील आपली बायको व दोन मुले यांना काऊपॉक्स टोचून घेऊन १७७४ च्या देवीच्या साथीमध्ये स्वत:चे संपूर्ण कुटुंब वाचवले होते.

आपण काऊपॉक्स म्हणजे काय ते समजून घेऊ.

काऊपॉक्स हा गायींचा आजार, ज्यात त्यांच्या आचळावर फोड येतात. अगदी देवीसारखेच फोड. गाईच्या धारा काढणाऱ्या गवळ्यांना याची लागण होत असे. त्यांच्या हातावर छोटे फोड येत असे. काही दिवस बारीक ताप येऊन जात असे. मात्र ज्याला काऊपॉक्स होऊन गेला त्याला नंतर भविष्यात कधीही देवी होत नसे.
जेन्नर हे समजून चुकला की देवीवर कायमचे औषध शोधायचे असेल तर काऊपॉक्स मध्येच उत्तर दडले आहे. मात्र आजवर जे प्रयोग झाले होते, ते वैयक्तिक पातळीवर. अन् शास्त्र वैयक्तिक अनुभूतीवर सिद्ध होत नाही.
एडवर्डने काऊपॉक्स होऊन गेलेल्या लोकांची कसून तपासणी करून एक यादी करून ठेवली. पुढच्या देवीच्या साथीत त्याला अनुमानाची १०० टक्के पुष्टी मिळाली.
हंटर गुरुजींनी सांगितलेला मंत्र ” केवळ विचार करू नका, कृती करून पहा” हा त्याने अमलात आणायचे ठरवले.
१४ मे १७९६ रोजी जेम्स फिफ्स या ८ वर्षाच्या मुलावर जेन्नरने लसीकरणाचा पहिला प्रयोग केला. जेम्सचे वडील जेन्नरकडे माळीकाम करायचे. सारा नेल्म्स ही जेन्नरची गवळण. तिच्या हातावर काऊपॉक्सचे फोड आले होते. साराच्या फोडातील द्रव हळूच काढून जेन्नरने जेम्सच्या हातावर टोचले.

पहिले लसीकरण झाले अन् सारा आणि जेम्सचे नाव एडवर्ड जेन्नर सोबतच इतिहासात अजरामर झाले.

त्या रात्री जेम्सला थोडा ताप आला. रोज त्याची तब्येत कशी आहे यावर जेन्नरने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले. पुढे जेम्स तंदुरुस्त झाला होता, त्याला कुठलाही देवीसदृश आजार झाला नाही. तरी पुढची दोन महिने जेन्नरने वाट पाहिली. प्रयोग यशस्वी झाल्याची खात्री पटल्यानंतर हाच प्रयोग मोठ्या प्रमाणात करायचे ठरवले.
असाच प्रयोग त्याने इतर २३ व्यक्तींवर केला. त्यामध्येही त्यांना समाधानकारक यश मिळाले. या प्रयोगाची मांडणी केलेला शोधनिबंध अनेक ठिकाणी प्रसिद्धीला पाठवला मात्र कुणी मान्य करायला तयार नाही. मात्र खचून ना जाता त्याने हाच प्रयोग अजून मोठ्या प्रमाणात करायचे ठरवले. यावेळी त्याने प्रयोगात आपल्या ११ महिन्यांच्या मुलाचा समावेश केला. यावेळी मात्र संशोधनाला मान्यता मिळाली.

लंडन येथे रॉयल जेन्नेरियन सोसायटी स्थापन झाली व त्यामार्फत जेन्नर ने देवीप्रतिबंध लस टोचणी कार्यक्रम सुरू केला, पहिल्या अठरा महिन्यांत १२,००० व्यक्तींना लस टोचण्यात आली.

याकाळात लंडनमध्ये देवीमुळे दगावणाऱ्यांची वार्षिक मृत्यूसंख्या २,०१८ वरून ६२२ इतकी घटली. कोणत्याही शोधाला सर्वात आधी बाधा येते ती धर्माच्या ठेकेदारांकडून. इथे देखील जेन्नरविरुद्ध अपप्रचार सुरू झाला.
गायीतील विषाणू माणसाला टोचले की माणसाचा “गायतोंडे” होतो अशी आवई उठवून दिली. लस टोचली आहे अश्या व्यक्तींना गायीचे तोंड प्राप्त झाले आहे, असे एक कार्टून देखील ब्रिटनमधील प्रसिद्ध वर्तमानपत्रात छापून आले होते.
136184551 429098084803676 3385523511705518 o

भारतात देखील जेव्हा देवीवर लस आली तेव्हा प्रचंड विरोध झाला होता.

‘टीकादार’ मंडळींनी या लशीला तीव्र विरोध केला. कारण यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनावरच गदा येणार होती. “सुदृढ मुलांमध्ये गुरांचा आजार सोडू नका” असा प्रचार त्यांनी हिरीरीने केला. याशिवाय अस्पृश्यता हा महारोग देखील देवीच्या साथीला होता.
ही लस एका व्यक्तीकडून दुसऱ्याला अशी देण्यात यायची. (त्याकाळात प्रीजर्व करून ठेवायची सोय कुठून असणार..) व्यक्तीच्या दंडात सुईद्वारे लस सोडली जायची. एका आठवड्यानंतर इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी फोड येणार. त्यातील पू म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची लस. म्हणजेच ही लस सर्व जाती, धर्म, वर्ण, वंश, स्त्री-पुरूष अशा सर्वांच्याच शरीरातून जाणार आणि आमचा धर्म बाटनार ना राव.. या किरिस्ताव मंडळींनी आमच्या सनातन धर्माला डूबवायलाच असली थेर आणली आहेत. प्राण जाये पर धर्म ना जाये..

भारतामध्ये हा अपप्रचार कमी करणे आणि लशीला राजमान्यता देण्याचे श्रेय म्हैसूरच्या वडियार घराण्याला जाते.

टिपू सुलतानला बाजूला सारून वाडियार घराणे सत्तेवर आणण्यात ब्रिटिशांचा १०० टक्के वाटा होता. तसेच राजाची आजी स्वतः देवीने मेली होती. या दोन्ही कारणामुळे असेल, इंग्रजांनी या लशीचा प्रचार करण्याची विनंती वडीयार राणी नाकारू शकली नाही. तिने स्वतः लस टोचून घेतली तसेच लसचा हातावर आलेला फोड दाखवणारे चित्रदेखील रंगवून घेतले.
136366298 429097988137019 7577798175104383275 n
आता राजघराण्याला बाट होत नाही म्हणाल्यावर जनतेने भ्यायची काय गरज. लस घ्यायला लोक पुढे येऊ लागले. बऱ्याच वेळा डॉक्टर कडून लस टोचून घेउन देवीचे दर्शन देखील घेतल जायचे.
आपल्या पळपुट्या दुसऱ्या बाजीरावने देखील सहकुटुंब ही लस टोचून घेतली होती बर का?किमान एक काम तरी त्याने केले डेरिंगचे 

भारत ही ब्रिटिशांची सर्वात मोठी वसाहत त्यामुळे भारतात लस लवकर आली.

अर्थात भारतात लस आणणे सोपे नव्हते. यासाठी मानवी साखळीने योगदान दिले आहे. इंग्लंड मधून लस येणार.. एका माणसाला लस देणार.. त्याला सात दिवसांनी फोड येणार.. त्यातील लस काढून दुसऱ्याला. दुसऱ्याची तिसऱ्याला. तिसऱ्याची चवथ्याला..
अशी मानवी साखळी करत १४ जुन १८०२ रोजी ॲना डस्थॅल ही तीन वर्षांची मुलगी देवीची लस घेणारी भारतातली पहिली व्यक्ती ठरली. १९६५ मध्ये शम्मी कपूर यांची पहिली बायको, प्रसिद्ध कलाकार गीता बाली हीचा ऐन पस्तीशित असताना देवीने बळी घेतला होता. १९६७ साली मोठी साथ येऊन गेल्यावर जगातून देवीचे समूळ उच्चाटन करण्याची मोहीम सुरू झाली. ‘देवीचा रोगी कळवा आणि १०० रुपये मिळवा’ असे इनाम ठेवले गेले. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी अगदी हत्तींचा वापर देखील करण्यात आला.

१९७७ मध्ये सोमालिया मध्ये देवीचा शेवटचा रुग्ण आढळून आला..

त्यानंतर तीन वर्ष वाट पाहून १९८० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगातून देवीचे उच्चाटन झाले असल्याचे जाहीर केले. दोनशे वर्षांचा लढा यशस्वी झाला. १८४० मध्ये व्हेरिओलेशनची पद्धत पूर्ण बंद होऊन जेन्नरची व्हॅक्सिनेशनची पद्धत रूढ झाली. १८५३ मध्ये ब्रिटिश साम्राज्यात देवीची लस घेणे सक्तीचे केले.
आपल्या पूर्वजांमुळे अमेरिकेत देवीचा आजार गेला आहे याची जाणीव ठेवून स्पेनचा राजा चौथा कार्लोस याने तिकडे लस पोचेल यासाठी प्रोत्साहन दिले. वैद्यक शास्त्रामध्ये व्हॅक्सिनेशन ही संज्ञा जेन्नरकडून भेट मिळाली आहे.

लॅटिन भाषेत व्हॅक्का/ व्हॅक्सा म्हणजे गाय. व्हॅक्सिनेशन शब्द असा जन्माला आला. (शकीराचे वाका वाका काय होते हे पण पाहायला पाहिजे राव)

देवीची लस शोधल्यावर जेन्नर प्रसिद्धीच्या शिखरावर होता..

मात्र त्याने पुढील जीवन लसीकरण कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात व्यतीत केले. बासरी आणि व्हायलिन वाजवायचा छंद त्याचे आयुष्य सुरेल करत होताच. An Inquiry into the Causes and Effects of the Variolae Vaccinae या नावाने एक खाजगी पुस्तिका डॉ. एडवर्डने छापली होती. हे पुस्तक अनेक डॉक्टरांसाठी दिशादर्शक ठरले होते. जेन्नरला त्याच्या गावचा मेयर देखील बनवण्यात आले. लवकरच ब्रिटनच्या चौथ्या किंग जॉर्जचा विशेष वैद्यकीय अधिकारी म्हणून जेन्नरची नेमणूक करण्यात आली होती.
भाऊची प्रसिध्दी एवढी की,

फ्रान्स इंग्लंड युद्ध सुरू असताना नेपोलियनने इंग्लंडचे काही सैनिक पकडले होते. मात्र जेन्नरने या युद्धकैद्यांना सोडून द्यावे असे पत्र नेपोलियनला लिहिले. तो जेन्नरला नकार देऊ शकला नाही. जेन्नरच्या कामाला सलामी म्हणून त्याने ब्रिटिश युद्धकैदी त्वरित सोडून दिले.

(मोठ्यांचे मोठेपण यातच असते… बाकी छोट्यांचे छोटेपण आपण रोज पाहत आहोतच.. कृषी कायदे मागे घ्यायला विलंब करताना) जेन्नरने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत संशोधनाचा वसा सोडला नाही.
२५ जानेवारी १८२३ रोजी जेन्नरला अर्धांगवायुचा जोरदार झटका आला. आणि दुसऱ्याच दिवशी त्याची प्राणज्योत मालवली.
प्रतिकारशक्तीशास्त्र या शाखेचा जनक, अशी सार्थ पदवी डॉ. एडवर्ड जेन्नरला प्राप्त झाली आहे. त्या काळात सूक्ष्मजीव, विषाणू विषयी अतिशय मर्यादित ज्ञान व अप्रगत तंत्रज्ञान. मदतीला ना अद्ययावत प्रयोगशाळा, ना सुसज्ज यंत्रणा. केवळ निरीक्षण, हिंमत व प्रचंड मेहनत या जोरावर जेन्नरने ही लस शोधली, आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवली.
जेन्नरने शोधून काढलेली देवीची लस अमेरिकेत पोचली. त्याने लाखो लोकांचे प्राण वाचले. अमेरिकेचे तिसरे अध्यक्ष आणि फौंडिंग फादर पैकी एक असलेले थॉमस जेफेरसन हे जेन्नरला पत्रात कौतुकाने बोलले होते,

“देवी नावाचा अतिशय गंभीर असा आजार अस्तित्वात होता पण तुझ्या लसीमुळे त्याचे जगातून निर्मूलन झाले. यासाठी भविष्यातील अनेक देश व त्यांच्या पिढ्या तुला मोठ्या आदराने लक्षात ठेवतील”

आज त्याच्या नावाने असलेल्या शेकडो संस्था सोबत जगभरातील पाठ्यपुस्तकातून देखील एडवर्ड जेन्नर हे नाव अजरामर झाले आहेच.. मानवतेवर उपकार करणाऱ्या या देवमाणसाला सलाम..

जय विज्ञान जय मानवता 

लेखक : डावकिनाचा रिच्या 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.