5 हजार वर्षांपूर्वी बनलेली वांग्याची भाजी भारतातील सर्वात जुनी डिश आहे.

वांग. एक सर्व मान्य भाजी. भरली वांगी करा, फोडीची वांगी करा, भरीत करा. वांगी भात पण असतो, वांग्याची आमटी असते बैंगन मसाला असे वांग्याचे खूप प्रकार असतात.

आता तुम्ही म्हणाल भिडू ला वांगी कस काय एकदम आठवलं? अहो क्वारंटाईन पिरियड मध्ये जेवणात खूपच लिमिटेड ऑप्शन आहेत. त्यात ही बहुगुणी वांगी बऱ्याचदा बनवली जातीय.

तर मग खाता खाता म्हंटल की वांग्याचा इतिहास काय ते तर शोधुया.

खूप आधी पासून आपल्याला गैरसमज होता की वांगी भारतात चीन मधून आली. होय चहा, फटाके, लायटिंग च्या माळा, कोरोना विषाणू या प्रमाणे वांगी पण चायना मेड आहेत असच वाटायचं. पण हे खोटं आहे.

काही वर्षांपूर्वी पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक वसंत शिंदे यांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी हरियाणाच्या फरमाना खास या गावात उत्खनन केले.

तेव्हा तिथे त्यांना हडप्पा कालीन संस्कृतीचे अवशेष सापडले.

हे अवशेष इसविसन पूर्व 2500 ते 2000 च्या दरम्यानचे असावेत. हडप्पा मोहेंजोदडो प्रमाणे इथे विटांची पक्की घरे, व्यवस्थित नव्वद अंशाच्या कोनात छेदणारे रस्ते होते. या घरांचे दरवाजे पूर्वाभिमुख होते.

त्याकाळची दफनभूमी देखील मिळाली. या दफनभूमीमध्ये पुरलेल्यांचे हाडांचे सापळे अजूनही शाबूत होते. त्यातील एका महिलेच्या हातात तांब्याच्या बांगड्या व कानात इयररिंग देखील आढळल्या. ही बाई खूप श्रीमंत असली पाहिजे असा अनुमान काढता येतो.

त्याकाळची आभूषणे, भांडी, नाणी अशा अनेक वस्तू सापडल्या.

त्या काळची वेशभूषा तेव्हाची संस्कृती भरभराटीला आली होती याचा अंदाज आला आहे.

तिथे एकूण 27 खोल्या सापडल्या त्यात 3-4 खोल्या स्वयंपाक घराच्या होत्या. या स्वयंपाकघरातील भांड्याचा व मृत सांगाड्याच्या डीएनएचा अभ्यास केला गेला. त्यावेळी संशोधकांपुढे माहितीचा खजिना उघडला गेला.

त्याकाळचे लोक काय जेवायचे याच उत्तर डॉ. शिंदेंच्या टीमला गवसले.

फरमानामधील 5000 वर्षांपूर्वीचे लोक वांगी शिजवून खात होते. त्या वांग्यामध्ये हळद, आलं, लसूण व काही मसाल्याचादेखील वापर केला होता.

या भांड्याचे अवशेष आणि मृतदेहाचे दात अमेरिकेतील लॅबमध्ये पाठवण्यात आले. वॉशिंग्टन विद्यापीठाचे पुरातत्वशास्त्रज्ञ अरुणीमा कश्यप व स्टीव्ह वेबर यांनी या यावर विशेष संशोधन केले.

अरुणीमा कश्यप यांनी त्याकाळची वांग्याची भाजी तेव्हाच्या पद्धतीने करून पाहिली. ही जगातली सर्वात पहिली ज्ञात भाजी मानली पाहिजे.

डॉक्टर वसंत शिंदे यांच्या अभ्यासामुळे साडेचार हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीवेळी भारतात हवामान कसे होते, काय पिकत होत, शेती कशी होती असे अनेक प्रश्न सोडवता आले.

सर्वात महत्वाचं म्हणजे भारतात पाच हजार वर्षांपासून मसाले वापरून वांग्याची भाजी बनवली जात होती हे कळाल.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.