इजिप्त अन् ब्रिटनमध्ये एका दगडावरून भांडणं सुरुयेत….

भिडूंनो तुम्ही सोशल मीडियावर इजिप्तचे दामले मास्तर नावाचा मिम बघितलाय का? अगदी जसे आपले मास्तर शुद्धलेखनातल्या चुका काढतात, ऱ्हस्व, दीर्घ, उकार, वेलांट्याकडे लक्ष द्यायला सांगतात. अगदी त्याचप्रमाणे मिममधील दामले मास्तर इजिप्तच्या पिरॅमिडवर चित्र काढणाऱ्या कारागिराला सूचना देत असतात.

“अरे व्याकरणाकडे लक्ष दे..!! तिथे सापाची शेपटी दीर्घ आहे….”

आता हा झाला विनोदाचा भाग. पण इजिप्त पिरॅमिडच्या भाषेचे ऱ्हस्व, दीर्घ समजायला असे मास्तर नसले तरी एक दगड आहे. योगायोगाने माणसाला गुरु लाभावा तसा तो दगड सापडला आणि इजिप्तच्या चित्रलिपीतलं व्याकरण कसं वाचायचं हे त्या दगडाने जगाला शिकवलं. 

पण जगातील इतर मौल्यवान वस्तूंप्रमाणे हा दगड सुद्धा पूर्वीच्या ब्रिटिश राणीच्या आणि आता राजाच्या संग्रहालयात, म्हणजेच ब्रिटिश म्युजिअममध्ये ठेवलेला आहे. भक्तांनी देवळात जाऊन देवाचं दर्शन घ्यावं अगदी त्याचप्रमाणे या संग्रहालयात जाणारी माणसं वैज्ञानिक दृष्टीने या दगडाचं दर्शन घेतात. 

पण आज अचानक हा मुद्दा आपण का घेतोय. तर गेल्या दोन आठवड्यांपासून इजिप्तमध्ये एक स्वाक्षरी अभियान राबवण्यात येत आहे. हा दगड ब्रिटिश संग्रहालयातून परत इजिप्तमध्ये आणण्यात यावा या एकमेव मागणीसाठी हे अभियान राबवले जात आहे. 

Everything you ever wanted to know about the Rosetta Stone | British Museum

ईजिप्तमधील पुरातत्वशास्त्रज्ञ आणि माजी पुरातत्व मंत्री डॉ. झाही अब्बास हवास यांनी ही मोहीम सुरु केलीय. 

आतापर्यंत ईजिप्शीयन नागरिकांपुरतं मर्यादित असलेल्या या स्वाक्षरी मोहिमेत ब्रिटनमधील शिक्षणतज्ज्ञांनी सुद्धा सह्या केल्यात. त्यांनी ही मागणी उचलून धरली आहे. त्यामुळे गेल्या २०० वर्षांपासून जगाच्या इतिहासात सगळ्यात महत्वाचा पुरावा असलेला हा दगड पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पण भिडूंनो डोन्ट वरी आपण निव्वळ बातमी नाही तर या दगडाची पूर्ण डिटेल माहिती बघुयात.    

हा दगड नेमका का महत्वाचा आणि तो कशा पद्धतीने ब्रिटनच्या म्युजिअममध्ये गेला त्याचा इतिहास आधी जाणून घ्या.

तर निम्म्या युरोपला जिंकणारा फ्रान्सचा राजा नेपोलियन धडाधड युरोपमध्ये युद्ध करत होता. त्याच्याप्रमाणेच त्याचे सैनिक सुद्धा वेगवेगळ्या सीमांच्या भागात घुसून युद्ध करत होते. 

युरोपचा भाग जिंकल्यानंतर मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून इस्लामी प्रदेशातील ऑटोमन साम्राज्य त्याच्या सीमेला लागलं होतं. या ऑटोमन साम्राज्याबरोबर युद्ध करण्यासाठी नेपोलियनच्या सैनिकांची एक तुकडी इजिप्तच्या रोसेटा शहरात पोहोचली. युद्ध सुरु असतांना शहरातील एका इमारतीची भिंत कोसळली. जेव्हा या भिंतीचे दगड खाली कोसळले तेव्हा त्यात एक तोडफोड झालेलं आयताकृती आकाराचं दगड सैनिकांच्या हाती घावलं. 

११२ सेंटीमीटर उंच आणि ७५.७ सेंटीमीटर रुंद असलेला हा दगड काही सामान्य दगड नाही हे सैनिकांच्या लक्षात आलं होतं. कारण त्या दगडावर तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये लेख लिहिलेले होते

ही गोष्ट जेव्हा त्या तुकडीच्या लेफ्टनंट कमांडरला कळली तेव्हा तो जाम खुश झाला.

या दगडावरचे लेख बघून सेनेचा लेफ्टनंट कमांडर पियरे फ्रॅन्कयोस बुचार्ड याच्या मनात हे तीनही लेख वाचून काढण्याची जिज्ञासा निर्माण झाली. त्याने सेनेसोबत असणाऱ्या पुरातवशास्त्रज्ञांना बोलावलं आणि यावर काय लिहिलंय ते वाचायला सांगितलं. पण फ्रान्सच्या तज्ज्ञांना इजिप्तची भाषा आणि लिपी याबद्दल काहीच माहित नव्हतं त्यामुळे ते नुसतं टकटक बघतच राहिले.

पण त्यांनी या दगडावर संशोधन करण्यासाठी दगडाला फ्रान्समध्ये नेण्यात यावं असा दिला.  सल्ला ऐकून १८०१ सालात हा दगड फ्रान्सला नेण्याची तयारी सुरु झाली पण युद्धामुळे हा दगड फ्रान्सला गेला नाही. 

त्याच काळात इजिप्तवर ताबा मिळवण्यासाठी फ्रान्सच्या सैनिकांबरोबर ब्रिटिश सैनिक युद्ध करत होते. 

इजिप्तसाठी दोन सैन्यात झालेल्या युद्धात ब्रिटिश सैनिकांचा विजय झाला. मग हरलेल्या फ्रान्सच्या सैनिकांना हातात घावलेले सगळे प्राचीन सामान आणि ऐतिहासिक गोष्टी ब्रिटिशांना द्याव्या लागल्या. मग काय ब्रिटिशांनी दगडाचा जयजयकार करत, जगभरातील मौल्यवान वस्तूंप्रमाणे हा दगड सुद्धा उचलला आणि लंडनला पाठवून दिला.

दगड इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर, रोसेटा शहरात सापडलेल्या या दगडाची अधिकृत नोंद ‘रोसेटा स्टोन’ म्हणून करण्यात आली. आजही या दगडाला याच नावानं ओळखलं जातं.

ईजिप्तमधील दगड म्युजिअममध्ये पोहोचला तेव्हा या दगडावर नक्की काय बरं लिहिलंय हे वाचण्यासाठी संशोधकांनी स्वतःचे चष्मे व्यवस्थित पुसून घेतले. कारण इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये चित्रांच्या स्वरूपात काय लिहिलंय हे काही संशोधकांना कळत नव्हतं. त्यामुळे या दगडावर काय लिहिलंय हे वाचण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. 

फ्रान्समधील सिलेव्हेस्टर डे सेसी, स्वीडनमधील योहान डेव्हिड आकरब्लाड, ब्रिटनमधील थॉमस यंग या सगळ्यांनी डोकं खाजवलं मात्र त्यांना काही हे काम जमलं नाही.  

सगळे रथी महारथी थकल्यानंतर फ्रान्समधील भाषातज्ज्ञ जीन फ्रॅन्कोईस चॅम्पोपोलिओन हा या लेखाला वाचायला पोहोचला.  

त्याला कॅस्पियन भाषा चांगल्या पद्धतीने कळत होती. तसेच इजिप्तच्या संस्कृतीबद्दल सुद्धा त्यांना माहिती होती. त्याने हा लेख वाचायला सुरुवात केली तेव्हा त्याला कळलं की, डेमोटीक भाषेतील सांकेतिक अक्षर हे उच्चारण करण्यासारखे आहेत, तर चित्रलिप्या या ध्वनिदर्शक आहेत. याच आधारावर चॅम्पोपोलिओननं स्पष्ट केलं की, इजिप्तच्या चित्रलिपीच्या मागे कॉप्टिक भाषा वापरण्यात आलेली आहे. 

चॅम्पोपोलिओनला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तो मोठं मोठ्याने ओरडला

 “मला सापडलंय…”

१७९९ मध्ये या शिलालेखाचा शोध लागला, १८०२ सालात हा दगड इंग्लंडमध्ये पोहोचला तेव्हा याची फारशी माहिती जगात कुणाला नव्हती. मात्र चॅम्पोपोलिओनने हा शिलालेख वाचुन काढला तेव्हा याची जगभरात चर्चा सुरु झाली.

हा दगड साधारणपणे इसवी सन पूर्व १९६ सालातला असून तब्बल २,२०० वर्ष जुना आहे. यावर लिहिलेली भाषा इसवी सन पूर्व ३२३ ते इसवी सन पूर्व ३० या टोलेमीक काळातील आहे. या काळात इजिप्तचे फैरो चौथ्या टोलेमीच्या मृत्यूनंतर टोलेमीक राजघराण्यात सत्तेसाठी संघर्ष सुरु झाला. या संघर्षात इसवी सन पूर्व २०४ सालात इजिप्तमध्ये विद्रोहाला सुरुवात झाली. 

या विद्रोहाच्या वेळेस लोकांना फैरोशी एकनिष्ठ राहावं यासाठी इजिप्तच्या धर्मगुरूंनी एक मेम्फिस आज्ञापत्र दगडावर कोरलं होतं. तेच आज्ञापत्र म्हणजे ‘रोसेटा स्टोन’ होय. 

यात ईजिप्तमधील धर्मगुरू, अधिकारी आणि सामान्य नागरिकांना समजण्यासाठी एकच आज्ञापत्र ३ वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिण्यात आलेलं होतं. धर्मगुरूंची सर्वात वर चित्रलिपीत म्हणजेच सीटेला हायरोग्लीफिक्स भाषेत लिहिण्यात आलं. त्याखाली अधिकाऱ्यांसाठी डेमॉटिक भाषा वापरण्यात आली तर सर्वात खाली सामान्य नागरिकांसाठी ग्रीक भाषेत हे आज्ञापत्र कोरण्यात आलं होतं. 

Mystery of the Rosetta Stone

अशाप्रकारेच एकसारखे दिसणारे स्तंभ ईजिप्तमधील अनेक मंदिरांमध्ये कोरण्यात आलेले होते. मात्र रोसेटा स्टोनच्या माध्यमातून ही भाषा कळली. म्हणून या स्टोनच्या माध्यमातून इजिप्तच्या इतिहासाचे संशोधन करणाऱ्या इजिप्टॉलॉजीची सुरुवात करण्यात आली. 

इसवी सन पूर्व ३,२०० ते इसवी सन ४०० वर्ष या ३,६०० वर्षाच्या काळात प्रचलित असलेली भाषा पुन्हा वाचता येऊ लागली. यातून इजिप्तची हजारो वर्ष जुनी नाईल संस्कृती कशी होती, त्याचा इतिहास काय आहे, त्यात कोणत्या राजांनी काय केलं, शेती, समाजजीवन कसं होतं? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली. 

म्हणूनच इजिप्तच्या लोकांना त्यांचा इतिहास वाचायला मदत करणाऱ्या या शीलालेखाला ब्रिटिश म्युजिअममधून परत इजिप्तमध्ये आणण्यासाठी लोकांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या दगडाबरोबरच इजिप्तमधून ब्रिटनमध्ये नेण्यात आलेल्या वस्तूंना सुद्धा परत करण्याची मागणी केली जातेय. मात्र त्यात हा दगड सगळ्यात महत्वाचा आहे.

पण हा शिलालेख जगातील सगळ्यात महत्वाचा ऐतिहासिक पुरावा असल्यामुळे याला जगातील सर्व मानवजातीचा वारसा मानलं जातं. तसेच हा शिलालेख ब्रिटिश म्युजिअममधील सर्वात बहुमूल्य ठेवा आहे, त्यामुळे तो ब्रिटिश म्यूजियम इजिप्तला परत करेल का याकडे पुरातत्व संशोधकांचं लक्ष लागलंय.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.