‘एक दुजे के लिए’ चा क्लायमॅक्स पाहून त्याकाळी अनेक प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केली होती.

आम्हाला कोणत्या सिनेमाची कोणाबरोबर तुलना करायची नाही. कारण प्रत्येक सिनेमा त्याच्याजागी ग्रेट असतोच. मुद्दा असा आहे की, काही सिनेमांचा समाजामध्ये एक वेगळाच परिणाम घडतो. तो परिणाम सुद्धा नाकारून चालणार नाही. तुम्हा सर्वांच्या आठवणीतून गेलं असेल म्हणून तुम्हाला ४ वर्ष मागे नेतो.

२०१६ साली नागराज मंजुळेचा ‘सैराट’ प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा पाहून अनेक जोडपी घरातून पळून गेली. आता आठवलं असेल.. कारण ‘सैराट’ प्रदर्शित झाल्यानंतर अशा बातम्या दर आठवड्याला कुठे ना कुठेतरी वाचायला मिळायच्या.

या पळून गेलेल्या जोडप्यांचं पुढे काय झालं, हे ठाऊक नाही. पण खूप दिवसांनी एखादा सिनेमा पाहिल्यानंतर घडलेला असा परिणाम दिसून आला. ‘सैराट’ ग्रेट आहेच. पण भारतीय सिनेसृष्टीत एक असा सिनेमा होऊन गेला, जो पाहून प्रेमी जोडप्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं.

हा सिनेमा म्हणजे ‘एक दुजे के लिये’.

५ जून १९८१ रोजी प्रदर्शित झालेला ‘एक दुजे के लिये’ हा कमल हसनचा पहिला हिंदी सिनेमा. साऊथ मध्ये असंख्य सिनेमे केल्यानंतर कमल हसनला बॉलीवुड खुणावू लागलं. बॉलिवुडमध्ये येण्यासाठी कमल हसनला त्याचाच एक सिनेमा मदतीला आला.

के. बालाचंदर यांनी तेलगू मध्ये १९७८ साली ‘मारो चरित्र’ हा सिनेमा केला होता.

या सिनेमात कमल हसन हिरो होता. हा सिनेमा सुपरहिट झाला. यानंतर के. बालाचंदर यांनी हाच सिनेमा कमल हसनला घेऊन हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेतला.

हिंदी इंडस्ट्रीमध्ये त्या काळी रोमँटिक सिनेमांची चलती होती. सिनेमाचा शेवट सुखद होणारे सिनेमे लोकांना आवडतात, असा समज निर्मात्यांनी करून घेतला होता. त्यामुळे ‘एक दुजे के लिये’ सिनेमाचं वितरण करायला कोणी पुढे आलं नाही.यामुळे हताश झालेले निर्माते लक्ष्मण प्रसाद यांनी स्वतःच सिनेमाचं वितरण करायला सुरुवात केली.

यापुढे काय घडलं ते सांगतोच, पण एक दुजे के लिये बनवताना घडलेले काही रंजक किस्से सुद्धा जाणून घेऊ…

के. बालाचंदर यांनी मूळ सिनेमाचं हिंदी रुपांतर करायचं ठरवलं तेव्हा हीरोइन सरिताला सोडून कमल हसन बरोबर मूळ सिनेमाचे सर्व कलाकार तसेच ठेवण्यात आले. सरिताच्या भूमिकेसाठी रती अग्निहोत्रीची निवड करण्यात आली. रती अग्निहोत्रीचा सुद्धा हा पहिलाच हिंदी सिनेमा. अशाप्रकारे ‘एक दुजे के लिये’ साठी कलाकारांची निवड झाली.

हिंदी प्रेक्षकांना सिनेमात गाणी असणं म्हणजे प्रचंड जवळचा विषय. लोकप्रिय संगीतकार जोडी लक्ष्मीकांत – प्यारेलाल या दोघांकडे सिनेमाच्या गाण्यांची आणि संगीताची जबाबदारी देण्यात आली.

एका गोष्टीवरून लक्ष्मीकांत – प्यारेलाल आणि बालाचंदर यांच्यात थोडे मतभेद झाले.

झालं असं की, बालाचंदर यांची इच्छा होती की, सिनेमात कमल हसनला एस. पी. बालासुब्रमण्यम आवाज देतील.

‘बालासुब्रमण्यम हे मद्रासी गायक आहेत, त्यामुळे शुध्द हिंदीत ते गाणी गाऊ शकणार नाहीत’,

असं लक्ष्मीकांत – प्यारेलाल यांचं मत होतं. पुढे बालाचंदर यांनी लक्ष्मीकांत – प्यारेलाल यांना समजावलं की,

“कमल हसन सिनेमात साकारत असलेली भूमिका साऊथ इंडियन आहे त्यामुळे त्याच्या तोंडी शुद्ध हिंदी गाणी शोभून दिसणार नाहीत.”

बालाचंदर यांचं म्हणणं लक्ष्मीकांत – प्यारेलाल यांना पटलं. या सिनेमातील गाण्यांसाठी एस. पी. बालासुब्रमण्यम यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

या सिनेमात प्रेमासाठी नव्या पिढीत असलेल्या बंडखोरीचं दर्शन घडवणारे अनेक प्रसंग होते. एक प्रसंग असा होता की, सपनाची आई वासुचा फोटो जाळून टाकते. त्यामुळे रागात सपना त्या फोटोची राख चहामध्ये मिसळून त्या चहाचं सेवन करते.

‘त्या फोटोमध्ये अनेक अपायकारक केमिकल होते. त्यामुळे त्या फोटोची राख चहासोबत घेणं शरीरासाठी चांगलं नव्हतं. परंतु मी सीनसाठी ही गोष्ट करण्याची ठरवली. अडचण तेव्हा आली जेव्हा पहिला शॉट ओके झाला नाही. त्यामुळे राख मिसळलेली चहा मला पुन्हा घ्यावी लागणार होणार होती. परंतु मी हे करण्याचं ठरवलं. सर्वांना भीती होती की माझी तब्येत बिघडेल.

परंतु सुदैवाने असं काही झालं नाही.’, असं एका मुलाखतीमध्ये सपनाची भूमिका करणाऱ्या रती अग्निहोत्री यांनी सांगितलं.

आत्ता मगाशी राहिलेला अपूर्ण विषय पूर्ण करतो. सिनेमाचे निर्माते लक्ष्मण प्रसाद यांनी सावधानता बाळगून सिनेमाच्या काही प्रिंट्स प्रदर्शित केल्या. आठवड्याभरात सिनेमाची लोकप्रियता इतकी शिगेला पोहोचली की नवीन प्रिंट्स निर्माण करण्यात आल्या. १० लाख बजेट असलेल्या या सिनेमाने १० कोटींचा व्यवसाय केला.

‘एक दुजे के लिये’ सुपरहिट झाला.

सर्व काही सुरळीत चालू असताना सिनेमाला एका वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागला. सिनेमाच्या शेवटी वासू आणि सपना डोंगरावरून उडी मारून आत्महत्या करतात. याचा परिणाम असा झाला की, त्यावेळेस देशातल्या अनेक प्रेमी युगुलांनी सिनेमाचा क्लायमॅक्स बघून आत्महत्या केल्या.

हे प्रकार थांबवण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी सिनेमाच्या टीमशी बोलणी केली. अनेक बैठका पार पडल्या.

सिनेमाच्या प्रदर्शनावेळेस रती अग्निहोत्री फक्त सोळा वर्षांची होती. या प्रकरणाचा तिच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून तिला लांब ठेवण्यात आले.

सिनेमाचे दिग्दर्शक के. बालाचंदर राज कपूर यांना गुरु मानायचे. त्यांनी राज कपूर यांना सिनेमा दाखवला. राज कपूर यांनी सिनेमाचा शेवट दुःखद करण्याच्या ऐवजी हॅपी एंडिंग असावी, असं मत सुचवलं.

परंतु बालाचंदर यांना स्वतःच्या कलाकृतीवर खूप विश्वास होता. त्यांनी राज कपूर यांचं म्हणणं नाकारलं.

सामाजिक संस्थांच्या हस्तक्षेपामुळे सिनेमाचा शेवट आधीच बदलण्यात आला होता. नंतर प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळे सिनेमाचा मूळ शेवट तसाच ठेवण्यात आला.

सिनेमाचा शेवट जरी दुःखद असला तरी त्यात सच्चेपणा असेल तर लोकांना शेवट सुद्धा भावतो. ‘एक दुजे के लिये’ सिनेमाने हेच दाखवून दिलं. त्यामुळे ‘सैराट’ असो किंवा ‘एक दुजे के लिये’ दोन्ही सिनेमांच्या दिग्दर्शकांनी प्रेमातील शोकांतिका आणि वास्तव चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. R DKotwal says

    Really it is my very very fevourat film taday also i watch that movie with the same interest which i enjoyed at first experience.

    Watched the telugu version also

Leave A Reply

Your email address will not be published.