म्हणून एकनाथ खडसेंच्या डाव्या हातावर हिटलरच्या उलट्या स्वस्तिकचा टॅटू आहे..

नाथाभाऊ खडसे यांच्या मागचं दुष्टचक्र अजूनही संपलेलं नाही. एका मागून एक संकटाच आभाळ त्यांच्यावर कोसळत राहिलंय. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी एक काळ गाजवला होता. भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांना ओळखलं जायचं. पण दुर्दैवाने त्यांची संधी हुकली आणि देवेंद्र फडणवीस खुर्चीवर बसले. मुख्यमंत्री जरी नसले तरी सरकारमध्ये दोन नंबरचं स्थान नाथ भाऊंचं होतं.  

पण पुढे त्यांचं भाजपमध्ये काय तर बिनसतं गेलं. त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले, मंत्रिपद गेलं. एकेकाळी जगाला तिकीट वाटणाऱ्या एकनाथराव खडसेंना स्वतःलाच आमदारकीचं तिकीट मिळालं नाही. अनेक अपमान पचवून शांत राहिलेल्या नाथाभाऊंनी नाही होय म्हणत अखेर भाजपला शेवटचा जय श्रीराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले.

आज राष्ट्रवादीमध्ये देखील त्यांना कोणते पद मिळालेले नाही. विधानपरिषदेची आमदारकी राज्यपालांच्या टेबलावर अडकून पडली आहे. त्यांच्या जावयाला अटक झाली, ईडी त्यांची चौकशी करत आहे.

नाथाभाऊंच्या मागे कसला तरी साडेसातीचा फेरा लागला आहे असंच खानदेशात म्हटलं जातंय.  

मुळगाव जळगाव जिल्ह्यातील कोथळी. एका शेतकरी वारकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना राजकारणात रस निर्माण झाला. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे, वेळप्रसंगी आंदोलन करणे यात ते हिरीरीने पुढे असायचे. तेव्हाच त्यांची मित्रमंडळींमध्ये लोकप्रियता वाढली. पहिल्यांदा कॉलेजचे जीएस झाले. पुढे विद्यापीठाचे सीआर म्हणून निवडले गेले.

नाथाभाऊंनी तेव्हाच ठरवलं कि राजकारणातच करियर करायचं.

शिक्षण सुरु असतानाच त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. पहिल्याच फटक्यात त्यांचा एका मताने पराभव झाला. कॉलेजमधलं राजकारण आणि गावाकडचं राजकारण दोन्ही वेगळं असतं याचा त्यांना अंदाज आला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर गावी परत आले, तळागाळात काम सुरु केलं.

धडाडीने काम करायची शैली, ग्रामस्थांबरोबरच थेट संपर्क, कामाचा झपाटा यामुळे तालुका स्तराबरोबरच जिल्हा पातळीला त्यांचं नाव पोहचलं होतं. पण अजून कुठल्या पक्षाचा शिक्का त्यांच्यावर बसला नव्हता.

नाथाभाऊंच्या कोथळी गावात गणपती विसर्जनाच्या दिवशी एक दुर्घटना घडली. मिरवणुकीत हनुमानाची भूमिका करणाऱ्या एकनाथराव खडसेंच्या मित्राचे निधन झाले. गावकऱ्यांनी तेव्हापासून आपल्या गावावर काहीतरी कोप आलेला आहे असं समजून सार्वजनिक गणेश मूर्ती स्थापन करायचं बंद केलं.

पण एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून एक गाव एक गणपती ही संकल्पना अंमलात आणली आणि तेव्हापासून अनेक वर्षे ही परंपरा कायम राहिली. एकनाथभाऊ खडसे यांच्या कर्तृत्वाचा ठसा याच प्रसंगानंतर उमटायला सुरवात झाली.

साधारण सत्तरच्या दशकातला काळ. बेरोजगारीमुळे भारतीय  तरुणांच्यात मोठा असंतोष पसरला होता. सिनेमामध्ये देखील अँग्री यंग मॅन बच्चनची हवा सुरु झाली होती. लोकशाहीचा ढिसाळ कारभारापेक्षा हुकूमशाहीचा तेजतर्रार जोश तरुणांना भावत होता. 

हीच अवस्था खानदेशातील अनेक तरुणांची होती. नाथाभाऊ खडसे याला अपवाद नव्हते. ते व त्यांचे मित्रमंडळ उजव्या विचारसरणीकडे झुकत होते. इतिहासातल्या जर्मन हुकूमशहा हिटलरबद्दल त्यांच्या व त्यांच्या युवा सहकाऱ्यामध्ये उत्सुकता होती. हिटलरचा आक्रमक स्वभाव, धाडसी वृत्ती याकडे हे सर्व युवक आकर्षित झाले होते.

कोथळी परिसरात त्याकाळी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या जोशात साजरा केला जात असे.  तिथली यात्रा मोठी सुप्रसिद्ध होती. अशा यात्रेच्या निमित्त अनेक फेरीवाले गावाच्या ठिकाणी येत असत. त्यात गोंदवणारे देखील असत.

१९७३-७४ च्या जत्रेत नाथाभाऊंसह दोनशे- सव्वादोनशे युवक सहकाऱ्यांनी असा निर्णय घेतला की,

 हिटलरच्या झेंड्यावर उलटा स्वस्तिक असलेली जी निशाणी आहे, ती आपण आपल्या हातावर गोंदवून घेऊया.

त्याप्रमाणे आजही नाथाभाऊच्या डाव्या हातावर उलटी स्वस्तिक असलेले चिन्ह गोंदवल्याचे दिसून येते. फक्त एकनाथ खडसे नाही तर कोथळी परिसरातील तीस ते पस्तीस युवकांच्या हातावर हे चिन्ह गोंदवल्याचे दिसून येते.

पुढे एकनाथ खडसे राजकारणात सक्रिय झाले. निवडणूक लढवल्या, जिंकल्या, भाजपमध्ये प्रवेश केला. वय व अनुभव वाढेल तसा त्यांच्या वरील हिटलरचा प्रभाव कमी होत गेला असावा. आज ते हुकूमशाहीच्या नाही तर लोकशाहीचे क्ततर समर्थक झालेले पाहायला मिळतात. विचारसरणी बदलली मात्र तरीही हिटलरच्या उलट्या स्वस्तिकचा शिक्का त्यांच्या हातावर बसलाय तो कायमचा.

संदर्भ- जनसेवेचे मानबिंदू एकनाथराव खडसे 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.