एकनाथ खडसे आपल्या कट्टर विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघाले होते

जळगाव खानदेश म्हणजे काळ्या मातीचा प्रदेश. काहीही पेरलं तरी तरारून उगवतं. इथली माणसं देखील रांगडी. स्वभावाने रोखठोक भाषा देखील रोखठोक. पण माणुसकी आणि आपलेपण जपण्यात एक नंबर.

हीच कथा नाथाभाऊंची म्हणजेच एकनाथ खडसेंची.

मुंडे महाजन जोडगोळीने भाजपच्या प्रसारासाठी अख्खा महाराष्ट्र पालथा घातला. शेटजी व भटजींचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला तळागाळात बहुजन समाजात पोहचवलं.

याच कानाकोपऱ्यात काही हिरे बाहेर आले त्यात होते नाथाभाऊ.

एकनाथ खडसे म्हणजे सरपंचपदापासून राजकारणाची सुरवात करणारा नेता. जळगावच्या राजकारणावर त्यांची पकड तर होतीच पण मुंडे महाजन राष्ट्रीय पातळीवर गेल्यावर महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व केले.

रामजन्मभूमीवेळी कारावास देखील सहन केलेल्या नाथाभाऊंनी कितीही संकटे आली, अन्याय झाला तरी आपला पक्ष सोडला नाही.

याच्या बरोबर उलट होते सुरेशदादा जैन. व्यापारी समाजातून आलेल्या सुरेशदादांनी राजकीय तडजोडी करताना कधी मागे पुढे पाहिले नाही. वेळप्रसंगी पक्ष बदलले. सुरवात इंदिरा काँग्रेस पासून करणारे दादा सोशालिस्ट काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी परत शिवसेना असे अनेक पक्ष बदलले. पण जळगावच्या राजकारणावरची पकड कधी ढिली होऊ दिली नाही.

सलग ७ वेळा वेगवेगळ्या पक्षाच्या तिकीटवरून आमदारकी जिंकली.

जळगाववर राज्य करणारे हे दोन विरुद्ध व्यक्तिमत्वाचे नेते. त्यांच्यात काट्याची टक्कर असणे साहजिक आहे.

प्रचंड जनसंपर्क असल्यामुळे अगदी सुरवातीच्या काळापासून दोन्ही नेत्यांत सत्तासंघर्ष पहावयास मिळाला.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका असोत किंवा बाजारसमितीची निवडणूक, दोन्ही नेत्यांचे कार्यकर्त्यांच्यात चुरशीची लढाई आजही पहावयास मिळते.

मात्र एकवेळ अशी आली होती की सुरेशदादा जैन मुख्यमंत्री व्हावेत म्हणून खुद्द नाथाभाऊंनी प्रयत्न केले होते.

ही गोष्ट एकनाथ खडसे यांनीच एकेठिकाणी सांगितली आहे.

१९९९ च्या निवडणुकीचा निकाल लागला होता. शिवसेना भाजप युतीला धक्का बसला होता, त्यांचे आमदार कमी झाले होते. शिवसेनेचे नारायण राणे तेव्हा मुख्यमंत्री होते. मात्र यावेळी भाजपला मुख्यमंत्री पद हवे होते. त्या दोघांच्यामध्ये चुरस सुरू झाली होती.

विरोधात होते काँग्रेस व नव्याने स्थापन झालेले राष्ट्रवादी काँग्रेस.

शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी जन्माचा मुद्दा काढून काँग्रेस फोडली व नवा पक्ष काढला. यावरून दोन्ही पक्षात बरीच खुन्नस होती व ते एकत्र येणे अवघड वाटत होते.

महाराष्ट्रात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती.

सेना- भाजप युतीला फक्त १० आमदार कमी पडत होते. नारायण राणे जर मुख्यमंत्री होणार नसतील तर दुसरा मुख्यमंत्री कोण याची शिवसेनेत चर्चा सुरू होती. विरोधी पक्षातील आमदार फोडू शकणारा खमक्या नेता पाहिजे म्हणून शोध सुरू होता.

अशातच अचानक नाव पुढे आले सुरेशदादा जैन यांचं.

ते तेव्हा शिवसेनेत होते. मागच्या युती शासनात त्यांनी गृहनिर्माणाचे खाते सांभाळले होते. अनेक पक्ष फिरून त्यांचा अनुभव दांडगा झाला होता. त्यांनी १० आमदार फोडून सरकार स्थापन करता येईल याची जुळणी केली होती.

फक्त यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा होकार आवश्यक होता.

अखेर मदतीला आले नाथाभाऊ. कितीही टोकाचे वैर असले तरी पक्षासाठी कोणताही त्याग करायची एकनाथराव खडसे यांची तयारी होती. साधा सरळमार्गी स्वभावामुळे विरोधकांवर देखील विश्वास ठेवायचे धाडस करताना ते मागे पुढे पाहत नव्हते.

सुरेशदादांनी सरकार स्थापनेची आपली योजना त्यांना व भाजपचे दुसरे मोठे मंत्री नितीन गडकरी यांना सांगितली.

सुरेशदादा जैन यांची शिफारस घेऊन गडकरी व खडसे मातोश्रीवर आले. बाळासाहेबांशी चर्चा झाली. शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता असतानाही बाळासाहेबांनी या योजनेला नकार दिला.

खडसे सांगतात, सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करण्यास नकार देताना बाळासाहेब म्हणाले की

राज्याची सत्ता व्यापारी प्रवृत्तीच्या हाती सोपवायची नाही.

बाळासाहेब ठाकरे आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले आणि युतीचे सरकार येऊ शकले नाही.

रोखठोकपणा व दिलदार स्वभाव हे नाथाभाऊंचे वैशिष्ट्य राहिले आहे. पक्ष मोठा व्हावा म्हणून विरोधकाला मुख्यमंत्री करायला निघालेल्या नाथाभाऊंना मात्र आपल्या या स्वभावाचा अनेकदा फटकाच सहन करावा लागला आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Rajat Bhole says

    भन्नाट माहिती भिडू…

Leave A Reply

Your email address will not be published.