2014 साली एकनाथ शिंदे बंड करणार होते, पण शरद पवारांच्या खेळीने कार्यक्रम गंडला.. 

25 सप्टेंबर 2014 चा दिवस. या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात एक भूकंप झालेला. म्हणजे आज ज्या रिश्टर स्केलचे भूकंप राज्यात होत आहेत, त्यापेक्षा याची तिव्रता खूपच कमी होती. पण तेव्हा सवय नसणाऱ्या या महाराष्ट्राच्या राजकारणाला हा भूकंप देखील खूप महत्वाचा ठरला होता.

कारण या एकाच दिवशी सर्वात पहिला बातमी आली शिवसेना आणि भाजपची युती तुटली. दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार.. तर काहीच तासाच दूसरी बातमी आली की राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची देखील आघाडी तुटली ते दोन्ही पक्ष देखील स्वतंत्र लढणार.. 

2014 च्या मे महिन्यात मोदी लाट आली होती. लोकसभेत प्रचंड बहुमतात मोदी सरकार विराजमान झालं होतं. तेव्हा भाजपला आत्ता विधानसभा आपलीच असण्याचा फुल्ल कॉन्फिडन्स आला होता. त्यामुळेच जागावाटपाचा तिठा वाढला होता.. 

कारण आजवर लहान भावाच्या भूमिकेत असणारा भाजप अचानक मोठ्ठा भाऊ झाला होता.

2009 च्या निवडणूकीत भाजपचे फक्त 46 आमदार होते. भाजपला 50-50 टक्के स्थान जागावाटपात हवं होतं. तर सेना भाजपसाठी फक्त 119 जागा सोडायला तयार होतं. युतीची बोलणी चालू होती पण मार्ग निघत नव्हता. अशातच युती तुटली आणि दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचं जाहीर केलं.. 

दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत हे समजताच पवारांनी आपला पहिला डाव टाकला. पवारांनी देखील आपण कॉंग्रेसपासून फारकत घेतली असून आपला पक्ष विधानसभा स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली. 

चारही पक्ष स्वतंत्र लढले. निवडणूकांचे निकाल लागले तेव्हा 122 जागांसह भाजप सर्वात मोठ्ठा पक्ष झाला होता. दोन नंबरला शिवसेना होती. सेनेचा 63 जागांवर विजय झाला होता. राष्ट्रवादी पक्षाला 41 तर कॉंग्रेसला 42 जागा मिळाल्या होत्या.. 

भाजप तेव्हा देखील बहुमतात नव्हती. अशा वेळी स्थीर सरकारसाठी भाजपला शिवसेनेचा पाठींबा आवश्यक होता. त्यासाठी सर्वात पहिला पसंतीक्रमांक होता तो शिवसेना..

असं सांगितलं जात की तेव्हाच उद्धव ठाकरेंना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं होतं. जागावाटपाचं गणित बिघडण्याचं कारण देखील तेच होतं. भाजपला कमी जागा देवून जास्तीत जास्त सत्तावाटपात फायदा करुन घेण्याचं गणित उद्धव ठाकरेंच होतं. 

भाजपचा विजयी रथ 122 पर्यन्त रोखला गेला होता. आत्ता सरकार स्थापनेसाठी खलबत सुरू झाली. याच काळात मुख्यमंत्री होण्याचा चान्स ओळखून ठाकरेंनी अडीच-अडीच वर्षांची मुख्यमंत्रीपदाची ऑफर भाजपला दिली असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या.. 

पण तडजोडीची भूमिका घेवून पटकन सत्तेत जावं आणि उपमुख्यमंत्री म्हणून नेमणूक करून घ्यावी अशी भूमिका होती ती एकनाथ शिंदे यांची. 

अडीच वर्षांच मुख्यमंत्रीपद, नितीन गडकरी हे भाजपकडून मुख्यमंत्री अशा काही प्रमुख मागण्या उद्धव ठाकरेंनी केल्या होत्या. पण या मागण्या मागे ठेवून पटकन सत्तास्थापन करावी अस सेनेतल्या 25 आमदारांच मत होतं. या आमदारांचा गटाचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत होते. भाजपसोबत सामोपचाराने सत्तेत जावून सरकारचा घटक म्हणून कार्यरत रहावं अस शिंदेंच मत होतं तर वेळ घेवून भाजपला अडचणीत आणता येईल अशी उद्धव ठाकरेंची भूमिका होती.. 

निर्णय घ्यायला वेळ लागत होता. अशा वेळी उद्धव ठाकरेंच्या विरोधातच बंड करून भाजपसोबत जाता येईल का? अशी पडताळणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत होती..

हा घटनाक्रम चालूच होतो तोच पवारांनी भाजपला सत्तेत सामील न होता बाहेरून पाठींबा देत असल्याचा बॉम्ब टाकला. यामुळे उद्धव ठाकरेंचा सत्तावाटपात मनासारख्या गोष्टी करून घ्यायचा प्लॅन फेल झाला. तर दूसरीकडे राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याने एकनाथ शिंदे गटाच्या भूमिकेचं मुल्य देखील भाजपला गरजेचं वाटलं नाही.

पवारांच्या बाहेरून पाठींबा देण्याच्या या भूमिकेमुळे एका दगडात दोन पक्षी मारले गेले. एक होते उद्धव ठाकरे ज्यांना फरफट सहन करत का होईना भाजपसोबत जाणं भाग पडलं, आणि दूसरे एकनाथ शिंदे ज्यांच्या गटाची किंमतच भाजपला उरली नाही कारण राष्ट्रवादीने बाहेरून पाठींबा जाहीर करून टाकलेला.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.