घराणेशाही अशी गोष्ट आहे ज्याला एकनाथ शिंदे देखील डावलू शकलेले नाहीत..

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचं प्रमुख कारणे काय होती. हिंदूत्व, बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेली शिवसेना, उद्धव ठाकरेंच आमदारांना वेळ न देणं, कॉंग्रेस -राष्ट्रवादीची सोबत. पण अशाच कारणांमध्ये अजून एक कारण होतं जे एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला नैतिक अधिष्ठान मिळवून देत होतं अन् ते म्हणजे घराणेशाही..

आदित्य ठाकरेंमुळे पक्षात, राजकारणात हस्तक्षेप होत गेला अस बऱ्याच बंडखोर आमदारांच म्हणणं होतं. या टिकेला प्रतिउत्तर देताना उद्धव ठाकरेंनी तुमच्या मुलाचं काय असा प्रतिप्रश्न देखील एकनाथ शिंदेंना विचारला होता..

अस म्हणतात की, हिस्टरी रिपीट इटसेल्फ. बाकी कुठे असो नसो पण राजकारणाच्या घराणेशाहीत मात्र हे वाक्य तंतोतंत खरं होतं. म्हणजे बाळासाहेबांनी गांधी घराण्याच्या घराणेशाहीला विरोध केला पण त्यांची दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंना लॉन्च केलं.

पवारांनी देखील सोनिया गांधींना विरोध करताना घराणेशाहीचा मुद्दा अधोरेखित केला होता. पण पुढे त्यांनी देखील सुप्रिया सुळेंना लॉन्च केलं. अर्थात एकनाथ शिंदे देखील या सर्व राजकारणापासून वेगळे कसे असतील.

आत्ता शिंदे गटाच्या घराणेशाहीबद्दल चर्चा सुरू आहेत. युवासेनेची नवी कार्यकारणी शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदेवर देखील घराणेशाहीचे आरोप होवू लागेलत.

वास्तविक श्रीकांत शिंदे, विलास भुमरे, योगेश कदम, अभिजीत अडसूळ असे अनेक आमदारपुत्र पुर्वीपासूनच राजकारणात ॲक्टिव होते. कोणी थेट खासदार होतं, आहे तर कोणी आमदार होतं. तर काही आमदारपुत्र हे शिवसेनेच्या युवासेनेमार्फत राजकारणाच मैदान काबीज करत होते.

पुर्वीपासून राजकारणात असणारे, आत्ता नव्याने युवासेनेत कार्यरत झालेले अशा सर्व आमदारपुत्र, शिंदे गट समर्थक पुत्रांची यादी आपण पाहणार आहोत आणि समजून घेणार आहोत की घराणेशाहीला विरोध करणारे एकनाथ शिंदे देखील यापासून कसे दूर नाहीत..

सुरवात करूया एकनाथ शिंदें यांच्यापासूनच..

एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवली मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार आहेत. एकाच घरात मुख्यमंत्री (आमदार)-खासदार ही पदं आहेत. २०१४ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंद परांजपे राष्ट्रवादीत गेल्यामुळे शिवसेनेचा हा लोकसभा मतदारसंघ राखण्यासाठी शिंदेंनी श्रीकांत शिंदेंना उतरवलं.

श्रीकांत शिंदे हे २०१४ पासून सक्रीय राजकारणामध्ये आहेत. आणि पहिल्याच प्रयत्नात ते खासदार झाले. २०१९ मध्ये ही ते निवडून आले. २०२४ मध्ये देखील श्रीकांत शिंदे निवडून यावेत आणि देशात भाजपची सत्ता येईल तेंव्हा केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी शिंदेंचे प्रयत्न चालू असल्याचं म्हणलं जातं…

खासदारकी, मंत्रिपदाशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिंदे गटाचं राजकीय अस्तित्व दीर्घकाळ टिकलंच तर शिंदे गटाचं नेतृत्व एकनाथ शिंदेंच्या नंतर श्रीकांत शिंदेंच्या हातात जाईल अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात.

दूसरं नाव येतं ते संदीपान भुमरे यांच.

शिंदे गटातील संदीपान भुमरे हे पैठण विधानसभा मतदार संघातुन आमदार असून शिंदे सरकारमध्ये ते राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री आहेत व त्यांचे चिरंजीव विलास भुमरे हे औरंगाबादचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. म्हणजे आतापर्यंत तरी विलास भुमरे हे जिल्हा परिषदेच्या राजकारणापुरते मर्यादित होते पण राजकीय वर्तुळात असं सांगितलं जातंय कि, संदीपान भुमरे यांनी सत्तांतरात जी महत्वाची भूमिका बजावलीय त्यामागे त्यांनी शिंदेंना एक अट घातलेली की, मुलगा विलासला पैठण तालुक्याच्या आमदारकीसाठी लॉन्च करावं.

तिसऱ्या क्रमांकावर आहेत प्रताप सरनाईक.

प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांच्याकडे पुर्वीपासूनच युवासेनेच्या सचिवपदाची जबाबदारी होती. युवासेनेच्या प्रचारात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सद्या शिंदे गटाची ताकद वाढविण्याची मदार युवासेना म्हणून पूर्वेश सरनाईक यांच्या खांद्यावर येणार असल्याचं सांगितलं जातंय. तर प्रताप सरनाईकांचे दुसरे पुत्र विहंग सरनाईक यांचीही लवकरच राजकारणात एंट्री होण्याचे चान्सेस असल्याचे चित्र स्थानिक राजकारणात दिसून येतेय.

चौथ नाव येतं ते रामदास कदम यांच.

रामदास कदम सध्या आमदार नाहीत. पण त्यांच्या जागेचा विधानसभेचा अनुशेष भरून काढला तो त्यांचे पुत्र योगेश कदम यांनी. रामदास कदम हे सध्या शिंदे गटासाठी सभा गाजवणारे ठरत आहेत. योगेश कदम हे शिवसेनेच्या तिकीटावर 2019 साली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. रामदास कदम आत्ता आपली राजकारणात अधिक अपेक्षा नाही अस सांगत असतात पण एकनाथ शिंदेकडून योगेश कदमांना ताकद दिली जाईल, कदाचित राज्यमंत्री देखील केलं जाईल अस बोललं जातं.

पाचवं नाव येतं ते आनंदराव अडसूळ यांच.

शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव म्हणजे माजी आमदार अभिजीत अडसूळ. अभिजित अडसूळ २००९ च्या विधानसभा विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते.

त्यांचे वडील आनंदराव अडसूळ हे कॉ-ऑपरेटीव्ह क्षेत्रातलं मोठं प्रस्थ आहे. ते सिटी कॉ-ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष होते. एक हजार कोटींचा टर्नओव्हर असलेल्या याच सिटी बँकेचे अभिजित अडसूळ यांची २०१५ मध्ये संचालकपदी निवड झाली. थोडक्यात या सगळ्याच्या जोरावर अभिजित अडसूळ हे येत्या निवडणुकीची तयारी करत असल्याची चर्चा आहे.

सहाव नाव येत ते अनिल बाबर यांच.

अनिल बाबर हे युतीच्या काळात अपक्ष आमदार होते. गेल्या दोन टर्ममध्ये ते शिवसेनेकडून आमदार झाले. अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर हे देखील राजकारणात ॲक्टिव आहेत. सुहास बाबर हे सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. पुढच्या निवडणूकीत अनिल बाबर यांची जागा सुहास बाबर घेतील अशा शक्यता स्थानिक पत्रकार व्यक्त करतात.

सातवं नाव येतं ते अर्जून खोतकर यांचं.

मराठवाड्यातील नावाजलेले नेते. माजी आमदारकी, माजी मंत्री आणि अब्दुल सत्तार यांच्यासोबत असणारा वाद यामुळे अर्जून खोतकर चर्चेत असतात. नाही हो करत त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. अर्जुन खोतकर यांचे सुपुत्र आहेत अभिमन्यू खोतकर. अभिमन्यू हे आधी युवासेनेत विभागीय सचिव, राज्य विस्तारक म्हणून काम बघायचे. शिंदे गटाने जाहीर केलेल्या नव्या कार्यकारणीमध्ये त्यांची मराठवाडा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

आठवं नाव येत ते दादा भुसे यांच..

माजी कृषी मंत्री आणि सध्याचे बंदरे व खजिनकर्म खातं सांभाळणारे नाशिकचे मंत्री म्हणजे दादा भुसे. दादा भुसेंचे दोन्ही चिरंजीव अजिंक्य आणि अविष्कार हे दोन्ही युवासेनेत सक्रिय आहेत. अविष्कार भुसे हे आदित्य ठाकरेंसोबत असताना युवा सेनेचे राज्य संघटक होते. नव्या कार्यकारणीत त्यांना उत्तर महाराष्ट्राचे प्रभारीपद शिंदे गटाकडून देण्यात आलं आहे.

नववा नंबर लागतो तो दिलीप लांडे यांचा.

शिवसेनेचे चांदवली मतदारसंघांचे आमदार म्हणजे दिलीप लांडे. त्यांचे पुत्र प्रयाग लांडे पूर्वीपासून युवासेनेत सक्रिय होते. नव्या कार्यकारणीत प्रयाग लांडे यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे.

दहावा क्रमांक लागतो तो सदा सरवणकर यांचा.

आमदार सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर हे माजी नगरसेवक आहेत. आदित्य ठाकरेंच्या युवसेनात ते राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते मात्र शिंदे गटाच्या बंडावेळेस पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली. शिंदे गटाच्या कार्यकारणीत त्यांना मुंबईचे प्रभारी बनवण्यात आले आहे.

अकरावा नंबर आहे तो शिंदे गटाचे विधीमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद आणि आमदार भरत गोगावले यांचा.

त्यांचे सुपुत्र विकास गोगावले हे आधीच आदित्य ठाकरेंसोबत युवासेनेत कार्यरत होते. शिंदे गटाच्या नव्या कार्यकारणीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बाराव्या क्रमांकावर आहेत आमदार प्रकाश सुर्वे.

प्रकाश सुर्वे हे बोरिवलीच्या मागाठाणे मतदारसंघाचे आमदार. त्यांचे चिरंजीव आहेत राज सुर्वे. राज सुर्वेंचा शिंदें गटाने जाहीर केलेल्या युवासेनेच्या कार्यकारिणीत समावेश आहे. आधी ते आदित्य ठाकरेंच्या युवासेनेच्या पदाधिकारी होते.

ही झाली प्रमुख नावं. पण यासोबतच नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंचे पुत्र मानित चौगुले, कल्याणचे शिवसेना जिल्हाध्यक्ष गोपाल लांडगे यांचे पुत्र नितीन लांडगे अशी यादी देखील आहे.

थोडक्यात काय घराणेशाहीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या पुत्रांना टाळून राजकारण करणं, एकनाथ शिंदेना देखी अवघड आहे हेच या यादीतून दिसून येतय.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.