ही फक्त आजारपणातली भेट नसून शिंदेंचा राष्ट्रीय कार्यकारिणीबाबतचा ‘मोठा’ प्लॅन आहे

शिवसेनेत बंड झालं, आमदार-खासदार, पदाधिकारी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. तर ठाकरे गटात बोटावर मोजण्याइतकेच नेते बाकी उरले आहेत.   

अलीकडेच उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली त्यात शिवसेनेतील बडे नेते म्हणले जाणारे खासदार गजानन कीर्तिकर नव्हते, तर दुसरीकडे नाराज खासदारांनी बंड करत शिंदे गटात एंट्री केली त्यातही कीर्तिकर कुठं दिसत नव्हते. 

मग कीर्तिकर आहेत तरी कुठे असा प्रश्न समोर आला. त्यावर स्वत: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किर्तीकर आजारी असल्याची माहिती माध्यमांना दिली होती. याच आजारपणामुळे कीर्तीकरांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानासाठी जात आलं नव्हतं.  

तर आता गजानन कीर्तिकर चर्चेत येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच गजानन किर्तीकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि “लवकर बरे होऊन राजकीय जीवनात सक्रिय व्हावे” अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. 

मुख्यमंत्री शिंदे हे आजारपणात असलेल्या कीर्तिकरांची विचारपूस करायला गेले होते की शिंदे गटात सामील होण्याची ऑफर द्यायला गेले होते असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय.  

त्यावर शिंदे यांनी कीर्तिकर आजारी आहेत म्हणून भेट घेतल्याचं सांगितलं असलं तरीही शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेल्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर या भेटीला ‘राजकीय’ महत्व प्राप्त झालेलं आहे. 

ही भेट वाटतेय तितकी साधी नाहीये तर, गजानन कीर्तिकर शिंदे गटासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. 

ते महत्वाचे कसे आहेत हेच मुद्देसूद जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. 

पहिला मुद्दा म्हणजे, कीर्तिकर बाळासाहेबांसोबत काम केलेले नेते आहेत.

गजानन कीर्तिकर म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले नेते. आजही शिवसेनेत असणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते. 

सलग ४ वेळेस आमदारकी, मंत्रिपदे मिळवत त्यांनी लोकसभेत एंट्री मारली. २०१४ ला काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांचा पराभव करुन वायव्य मुंबई मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.   तर २०१९ मध्ये ५ लाख ७० हजार ६३ मतं घेत कॉंग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा पराभव केलेला. संजय निरुपम यांना ३ लाख ९७ हजार ७३५ मतं मिळालेली.

दुसरा मुद्दा म्हणजे, महाविकास आघाडीत अस्वस्थ नेत्यांपैकी एक गजानन कीर्तिकर देखील होते.  

गेल्या जून महिन्यातली गोष्ट आहे, गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत नगरमध्ये शिवसंपर्क अभियान राबविण्यात आलेले. नेमकं हेच शिवसंपर्क अभियान महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचा कसा कोंडमारा होतो आहे सांगण्यासाठीच होता असं स्वरूप त्याला आलेलं. नगरमधल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कीर्तिकरांच्या समोर तक्रारी वाचून दाखवल्या होत्या.

तसेच इथे शिवसेनेचा महापौर असुनही त्यांच्याकडून राष्ट्रवादीला प्राधान्य मिळते आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना निधी वितरणात डावलले जाते अशा तक्रारी देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या.

त्यानंतर,कीर्तिकरांनी महाविकास आघाडीचा भाग असलेल्या राष्ट्रवादीवर उघड उघड टीका केलेली.  

“नगरमध्ये शिवसेना मजबूत करून इतर राजकीय पक्षांना तडाखे देण्यासाठी सज्ज व्हा, निर्भय नगर-स्वबळ नगरची खूणगाठ बांधा, पालकमंत्री शिवसेनेच्या कामांना निधी देत नसतील, शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या समित्यांवर अद्याप नियुक्त्या केल्या नसतील तर लेखी अहवाल द्या, पक्षप्रमुखांपुढे मांडू” अशी सूचना त्यांनी दिलेली तसेच 

महाविकास आघाडीच्या काळात आमदारांच्या निधी वाटपाच्या मुद्दयावरून त्यांनी, “राज्यात ठाकरे सरकार आहे, असं आम्ही म्हणतोय मात्र प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं. थोडक्यात महाविकास आघाडीत कीर्तिकारांचं राष्ट्रवादीवाल्यांशी कधीच पटलं नाही. 

तिसरा मुद्दा म्हणजे, गजानन कीर्तिकर राष्ट्रीय कार्यकारणीचा भाग आहेत.

शिंदे गटाला शिवसेना ताब्यात घ्यायची आहे आणि यात गजानन कीर्तिकर महत्वाचे आहेत. कारण कीर्तिकर हे राष्ट्रीय कार्यकारणीत आहेत. 

शिवसेनेत उभी फूट पाडण्यात शिंदे यशस्वी झालेत मात्र आता शिवसेना ताब्यात घेण्याच्या उद्देशाने शिंदेंचे प्रयत्न सुरु आहेत. शिंदे गटाला ‘शिवसेना’ म्हणून मान्यता मिळावी, शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हही आम्हला मिळावं यासाठी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्रही पाठवलं आहे. 

पक्षांतरबंदी कायद्यानुसार केवळ आमदार, खासदारांचं संख्याबळ पुरेसं नाहीये तर संघटनेतही फूट असणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनंतर शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेतील सदस्य कसे फोडता येतील, याकडे शिंदे यांनी लक्ष वळवलं आहे.

शिवसेनेवर दावा सांगायचा असेल तर शिवसेनेतील राष्ट्रीय कार्यकारिणीतील निम्याहून अधिक लोक शिंदेंना त्यांच्या बाजूने असल्याचं दाखवावं लागणार आहेत.

त्याचसाठी एकनाथ शिंदेंनी आपले लक्ष शिवसेनेतल्या प्रतिनिधी सभेकडे वळवलं आहे. त्याच राजकीय खेळीचा एक भाग म्हणजे कीर्तिकरांची भेट. किर्तीकर जर शिंदे गटात आले तर शिंदे गट अधिक बळकट होईल. तसेच कीर्तिकरांचा वापर करत कार्यकारिणीत आणखी फूट पाडण्याचं कामही होईल. 

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी काय आहे ?

अलीकडेच शिंदे गटाने नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे. मात्र शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारणीबाबत काय सांगितलं आहे ते बघूया. 

शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारणीत १९ सदस्य असतात. त्यातील १४ जणांची निवड प्रतिनिधी सभेद्वारे केली जाऊ शकते तर ५ जणांची नियुक्ती शिवसेना प्रमुखच करत असतात. राष्ट्रीय कार्यकारणीला सोबत घेऊन शिवसेना प्रमुख काम करतात. या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांना पक्ष नेते असं म्हटलं जातं.

२०१८ साली प्रतिनिधी सभेने ९ जणांना पक्ष नेते म्हणून निवडून दिलेलं…हे ९ पक्षनेते म्हणजे आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधार डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे. या पक्षनेत्यांचा कार्यकाळ हा ५ वर्षांचा असतो. थोडक्यात २०२३ पर्यंत हे ९ नेते या पक्षनेते पदावर राहणार होते. पण यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या निवडून आलेल्या पक्षनेत्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचं नावच नाहीये.

शिवसेनेच्या या घटनेनुसार, शिवसेना प्रमुखांना काही जणांना पक्षनेते म्हणून निवडण्याचा अधिकार असतो त्या अधिकारानुसार उद्धव ठाकरे यांनी अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे या ४ जणांची निवड केली होती.

शिवसेनाप्रमुखांना जसा या ४ जणांच्या निवडीचा अधिकार आहे तसाच त्यांना त्यांचे पदं रद्द करण्याचा देखील अधिकार आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरे या अधिकाराचा वापर करून ते ह्या ४ निवडी कधीही रद्द करू शकतात पण त्या आधीच प्रतिनिधी सभेने निवडून दिलेले पक्षनेते रामदास कदम आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडून दिलेले पक्षनेते आनंदराव अडसूळ यांनी अलीकडेच आपल्या पदांचा राजीनामा दिला. 

त्यानंतर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेऊन उद्धव ठाकरे यांनी या दोघा नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. मात्र अलीकडेच शिंदे गटाच्या नव्या कार्यकारणीत रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी नियुक्ती केलीय..

संपूर्ण शिवसेना पक्षच जर शिंदेंना आपल्या ताब्यात घ्यायचा असेल तर फक्त आमदारांचं संख्याबळ असून चालणार नाही. 

तर त्यांना शिवसेनेच्या घटनेनुसार, २५० सदस्यांना सोबत घेऊन प्रतीनिधी सभेतून निवडून यावं लागेल, तरच त्यांना निवडणूक आयोग मान्यता देईल आणि मग ते शिवसेनेवर दावा करू शकतील.

किंव्हा मग २८२ जणांच्या प्रतिनिधी सभेच्या सदस्यांपैकी किमान दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा शिंदे गटाला मिळाला तर शिंदे गट संघटनेवर दावा कर शकतो.

दोन तृतीयांश सदस्य म्हणजे २८२ सदस्यसंख्येपैकी १८८ सदस्य फोडण्याच्या तयारीला शिंदे लागलेत. याच कार्यकारणीचे महत्वाचा भाग असलेले कीर्तिकर जर शिंदे गटात गेले तर शिंदे गट कार्यकारिणीतील इतर नेत्यांना देखील फोडण्याचा प्रयत्न करेल. त्यात शिंदे गट यशस्वी झालाच तर ठाकरे कुटुंबीयांच्या हातातून शिवसेना निसटण्याची शक्यता आहे.

 हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.