रेकॉर्डिंग आत्ता होतय ; पण एकनाथ शिंदे पहिल्यापासूनच मदतीला धावून जातात हे सत्यय..

नमस्कार,

एकनाथ शिंदे बोलतोय, आसना नदीला पूर आला आहे का ? कुरुंदा गावात पाणी कमी झालं का ? अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू करत आहात ना ? त्या लोकांच्या राहण्याची पिण्याच्या पाण्याची सगळी व्यवस्था करा आणि जीवितहानी होणार नाही हे पहा. लोकांची गैरसोय होऊ देऊ नका,

अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना फोन वरून दिल्या. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. 

तसेच दोन दिवसापूर्वी सांगली येथे वारकऱ्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. त्यात जखमी झालेल्या वारकऱ्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सूचना देतानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर सोशल मीडियावर शिंदे यांना ट्रोल करण्यात येत आहे. जाणून बुजून मदतीचे व्हिडीओ व्हायरल करण्यात येत असल्याची टिकाही काही जण करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मदतीचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. मात्र, अपघात, पूर सारख्या बचाव कार्यात ते आणि त्यांची टिम नेहमीच पुढे राहिली आहे. राज्यातच नाही तर परराज्यात जाऊन त्यांच्या टिमने नागरिकांची मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

१) महालक्ष्मी एक्सप्रेस -२०१९

ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीला पूर आल्याने २६ जुलै २०१९ रोजी बदलापूर- वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली होती. या रेल्वेत २ हजार पेक्षा जास्त प्रवासी होते. रेल्वे रुळावर पुराचे पाणी आल्याने मदतीसाठी रेल्वेपर्यंत पोहचणे अवघड झाले होते.

तसेच रेंज नसल्याने प्रवाशांशी कुठलाही संवाद साधता येत नव्हता. ही गोष्ट जेव्हा ठाण्याचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना समजली तेव्हा ते बोटीने तिथे पोहचले होते. एनडीआरएफच्या मदतीने सगळ्या प्रवाशांना त्यांनी बाहेर काढले होते.   

१७ तास रेल्वेत अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांची घरी जाण्याची, जेवणाची अशी सगळी व्यवस्था एकनाथ शिंदे यांच्या टिमने केली होती.   

२) चिपळूण महाड महापूर -२०२१

गेल्यावर्षी खेड, चिपळूण, महाड शहरात २२-२३ जुलै दरम्यान महापूर आला होता. शहरातील दुकानांमध्ये, घरांमध्ये १५ फुटांपर्यंत पाणी घुसले होते. तर महाड तालुक्यातील तळिये गावात दरड कोसळून ८५ जणांचा मृत्यू झाला होता. एकनाथ शिंदे हे तळिये गावात गेले होते. यानंतर महाड, पोलादपूर, चिपळूण, खेड येथे गेले. 

या शहरातील बाजारपेठा, घरात चिखल झाला होता. यानंतर शिंदे हे परत मुंबईला आले आणि  या गावांना लागणाऱ्या वस्तू कपडे, अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू पाठविल्या होत्या. महत्वाचं म्हणजे ठाणे, नवी मुंबई, पनवेल या महानगरपालिकांमधले कर्मचारी घेऊन महाड, चिपळूणमध्ये परत आले. 

स्वतः एकनाथ शिंदे हे महाड शहराच्या स्वछता मोहिमेत उतरले होते.  

तसेच शिवसेना वैद्यकिय कक्षाच्या मदतीने आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली होती. पूरग्रस्तांना मोफत आरोग्य सुविधा दिल्या. त्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या. १५ दिवस या रुग्णवाहिका अविरतपणे लोकांच्या मदतीला होत्या.

 ३) कोल्हापूर सांगली महापूर -२०१९

ऑगस्ट २०१९ मध्ये कृष्णा, वारणा नदीला आलेल्या पुरामुळे सांगली, कोल्हापूरमध्ये अनेक भागात पाणी घुसले होते. या शहरात जाणारे सगळे रस्ते बंद असल्याने बोटींशिवाय तिथे पोहचणे शक्य नव्हते. यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम ठाण्यावरून बोटी घेऊन कोल्हापूरला पोहचले होत्या. 

शहरातील सगळ्या भागात पाण्याची पातळी १० फुटांपेक्षा जास्त होती. लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षितस्थळी पोहचविले जात होते. स्वतः एकनाथ शिंदे हे बोटीतून रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी झाले होते. शिंदे आणि त्यांच्या माध्यमातून  हजारो कुटुंबांना जीवनावश्यक आणि गरजेच्या वस्तूंचे वाटप केले होत्या.

एकनाथ शिंदे यांची टिम  कोल्हापूर-सांगली भागात पुरग्रस्तांची मदत करत होती. याच बरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांची टिमने आरोग्य शिबीर सुरु करून लोकांची मदत केली होती. १०० डॉक्टर यात सहभागी झाले होते. 

४) केरळमधील जलप्रलय -२०१८

एकाचवेळी राज्यातील ३५ धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने सप्टेंबर २०१८ मध्ये केरळ मध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता. केरळ मधील अनेक गावे पाण्याखाली गेले होते. यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. 

त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी केरळ मध्ये जाऊन पूरग्रस्तांना अन्न, धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केले. डॉक्टरांची टीम नेऊन तिथे अनेक गावांमध्ये आरोग्य शिबिर घेतले. पुरामुळे नुकसान झालेल्या अनेक गावांना मदत केली. देशातील इतर नेत्यांनी केरळला आर्थिक मदत केली होती. मात्र प्रत्यक्ष जाऊन एकनाथ शिंदे यांनी मदत केली होती.   

मुंबईहून  एवढ्या वस्तू, माणसं, डॉक्टर्स, वैद्यकीय स्टाफ घेऊन केरळला आल्याने तिथल्या लोकांबरोबर माध्यमांनी सुद्धा शिंदे यांचे आभार मानले होते.  

५) आसाम मधील पूरग्रस्तांना ५१ लाखाची मदत  

अगदी ताजी गोष्ट आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड पुकारला तेव्हाची. २१ जून रोजी हे आमदार अगोदर सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी गेले हे आपल्याला माहीतच आहे. त्याचवेळी आसाम राज्यात पूर आला होता. तेव्हा राज्यात पूर आला आहे आणि राज्य सरकार महाराष्ट्राच्या आमदारांच्या सोयीसुविधेसाठी पैसे वाया घालवत आहे, असं म्हणत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. 

त्यावेळी एकनाथ शिंदे काही बोलले नाही मात्र जेव्हा गुवाहाटी सोडायची वेळ आली तेव्हा २९ जुलैला एकनाथ शिंदे यांनी मदतीची घोषणा केली होती.

शिंदे गटातील सर्व आमदार मिळून आसामच्या पूरग्रस्तांना ५१ लाख रुपयांची मदत करणार आहेत, असं शिंदे यांनी माध्यमांसमोर सांगितलं होतं. आसाम मुख्यमंत्री निधी मार्फत ही मदत केली जाईल, असं ते म्हणाले होते.

  हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.