उद्धव यांनी बाळासाहेबांना वचन दिलेलं, एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेल मग आता?

एकनाथ शिंदेचं हे ट्विट बरंच काही सांगून जातं…त्याचबद्दल बोलूया..

एकनाथ शिंदे विधानपरिषदेच्या निकालानंतर नॉट रिचेबल झाले. त्यानंतर शिंदेच्या नाराजीची अनेक कारणं समोर येतायेत त्यातलंच एक कारण म्हणजे डावलेलं मुख्यमंत्री पद. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होणार ? यासाठी चर्चेत असणारं नाव होतं एकनाथ शिंदे.

२०१९ च्या निवडणूकीनंतर अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युलावर भाजप व सेनेचं एकमत झालं असतं तर अडीच वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा मान देखील एकनाथ शिंदेकडे आला असता. मात्र युती फिस्कटली अन त्यांचं संभाव्य मुख्यमंत्रीपद देखील गेलं.

त्यानंतर, महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी देखील मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच नाव चर्चेत आलं होतं. परंतु शरद पवारांनी सूत्रं हलवली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद घेण्याचं सुचवलं असं राजकीय वर्तुळात बोललं गेलं. त्याकाळात संजय राऊत आणि शरद पवार यांच्या सतत होणाऱ्या भेटीगाठींनंतर अखेर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद हुकलं.

आता मात्र शिंदेच्या बंडाळी नंतर काय होणार ???

शिंदे आत्ता मुख्यमंत्री होऊ शकतात का ?

सेनेच्या ते नाराज आमदार पक्ष नेतृत्वासमोर काय पर्याय ठेवतील ?

एक तर शिवसेनेच्या काही आमदारांचं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत पटत नाही. आमदार निधी असो किंव्हा इतर काही गोष्टींच्याबाबत आघाडीत धुसफूस सुरूच आहे.  तर हेच नाराज आमदार सेनेसमोर अशी अट ठेवू शकतात ते म्हणजे, शिवसेनेने भाजपसोबत जाऊन  सत्ता स्थापन करावी. मुख्यमंत्री फडणवीस असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील.

किंव्हा आघडीची सत्ता कायम ठेवायची असेल, सरकार वाचवायचं असेल तर, महाविकास आघाडीकडून एकमताने एक प्रस्ताव येऊ शकतो…तो म्हणजे,

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून महाविकास आघाडीचे सरकार वाचवावं. मात्र हा प्रस्ताव सद्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे मान्य करतील का ?? 

याचं उत्तर सांगणं अवघड असलं तरी मागे एकदा उद्धव ठाकरे म्हणालेले, “एक ना एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार”,

जवळपास ३ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे,

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रंगशारदा भवनात शिवसेनेने राज्यातील २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि जिल्हाप्रमुखांचा मेळावा भरवण्यात आलेला. या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना उद्धव ठाकरेंनी विधान केलेलं कि, 

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाताना मी एक वचन दिले आहे. एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवणार. हे  वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतली आहे. यासाठी मला तुमची साथ हवी. म्हणूनच गाव तेथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसेना पोहोचवायचे काम करायचे आहे’ असं आवाहन त्यांनी केलेलं.

खुद्द उद्धव ठाकरेंनीच भर मेळाव्यात विधान केलेलं कि, बाळासाहेबांना दिलेल्या वचनानुसार, एक दिवस ते शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवतील. मग आत्ता ती वेळ आली आहे का ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील? बाळासाहेबांना दिलेल्या वचनानुसार ते एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवतील का ? एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतील का ? याकडे सर्वच नेत्यांचं लक्ष लागलंय.

मुख्यमंत्री पदावर जर एकनाथ शिंदे यांनी दावा ठोकला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशिवाय  आघाडीतील राजकीय पक्षातील नेत्यांची भूमिका काय राहील हे देखील निर्णायक ठरणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि एकनाथ शिंदेंशी संपर्क झाला नसल्याचे स्पष्ट केलेय. “मात्र मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आहे, त्यांचे आमदार नाराज आहेत त्यामुळे शिवसेनेच्याच नेतृत्वाने याबाबत निर्णय घ्यावा असं म्हणत पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील ? एकनाथ शिंदेचं बंड थंड करतील का ? हे आजच्या घडामोडींद्वारे कळलेच.

 

Leave A Reply

Your email address will not be published.