म्हणून रोहित शर्माची मुंबई धोनी अण्णाच्या चेन्नईवर कायम भारी पडते
आयपीएल सुरू होऊन महिना होत आला, तरी रस्त्याच्या कडेला गर्दी करुन मॅच बघणारी पोरं, कायतर भंगार कारण देऊन ऑफिसमधून कल्टी मारणारे भिडू आपल्याला दिसले नाहीत. मात्र आजच्या दिवशी हे सगळं चित्र बदलणार. सोशल मीडियापासून चौकातल्या टीव्हीच्या दुकानापुढं गर्दी होणार, बसमध्ये शेजारी बसलेला माणूस तुमच्या मोबाईलमध्ये डोकं खुपसणार.. कारण आजचा दिवस आहे, आयपीएलच्या एल क्लासिकोचा. आजचा दिवस आहे…
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मॅचचा.
एकाबाजूला रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड… तर दुसऱ्या बाजूला रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, ऋतुराज गायकवाड. मैदानावरची लढाई घासून होणार हे फिक्स. पण त्यापेक्षा खुंखार लढाई मैदानाच्या बाहेर होते. पोरं स्टेटस टाकतात, त्या स्टेटसवरुन राडे होतात. आता राडे फक्त सोशल मीडियावरच होत नाहीत… तर उसात नेऊन हाणामारी होती. फ्लेक्स लागतात… थोडक्यात काय तर डीप विषय असतोय.
मुंबई विरुद्ध चेन्नई मॅच असली की आयपीएलचा टीआरपी बूस्ट होतो. फॅन्स तिकडं भांडत बसतात आणि बीसीसीआय खोऱ्यानं पैशे ओढते.
विजेत्या संघाचे फॅन्स, ‘कळलं का पप्पा कोणाय?’ असले स्टेटस टाकतात, तर हारलेला संघ ‘एका जत्रेनं देव म्हातारा होत नाय’ असलं लिहून मनाचं समाधान करत असतोय.
आता आयपीएलला पंधरा वर्ष पूर्ण झाली, त्यातली २ वर्ष सीएसके आयपीएलमधून बाद होती. ते सोडलं, तर मुंबई विरुद्ध सीएसके आतापर्यंत ३२ वेळा समोरासमोर आले. त्यातल्या १९ वेळा मुंबईनं बाजी मारली, तर १३ वेळा चेन्नई सुपर किंग ठरली. या दोन टीम्स फक्त लीग मॅचेसमध्येच नाही, तर फायनल्समध्येही भिडल्या.
कितीवेळा? तर चार वेळा!
या चारपैकी २०१० ला चेन्नईनं कप मारला, पण २०१३, २०१५ आणि २०१९ ला मुंबईच बादशहा ठरली.
आकड्यांचा विचार केला, तर मुंबई इंडियन्स चेन्नईपेक्षा पद्धतशीर सरस ठरते.
पण मुंबई इंडियन्सच्या या यशामागची कारणं नेमकी काय आहेत? विषय लय डीप आहे.
कारण क्रमांक एक – ‘पोलार्ड तात्या’
मुंबई विरुद्ध चेन्नई मॅचमध्ये हमखास यशस्वी होणारा प्लेअर म्हणजे कायरन पोलार्ड. २०१९ च्या फायनलला चेन्नईनं मुंबईचा कार्यक्रम केलाच होता, पण तेवढ्यात पोलार्डनं २५ बॉल्समध्ये ४१ रन्स ठोकले. त्यापेक्षा खतरनाक बांधकाम झालं होतं, ते २०२१ च्या आयपीएलमध्ये. २१८ रन्स चेस करणाऱ्या मुंबईची अवस्था ३ आऊट ८१ होती. हातात फक्त ६० बॉल्स होते.
पोलार्डनं मैदानावर अक्षरश: राडा घालत फक्त ३४ बॉल्समध्ये ८७ रन्स मारले आणि चेन्नईच्या घशातला विजयाचा घास काढून घेतला. मुंबई विरुद्ध चेन्नई मॅचमध्ये हमखास चालणारा एक्का म्हणजे.. पोलार्ड.
कारण क्रमांक दोन – रोहित शर्माचं नेतृत्व
आता रोहित आणि धोनी यांच्यात बेस्ट कॅप्टन कोण? हा म्हणलं तर न संपणारा वाद आहे. मुंबई विरुद्ध चेन्नईमध्ये मात्र रोहित उजवा ठरतो. धोनी नेतृत्व करत असताना प्रयोग करत असतो, पण रोहित आपले नेहमीचे प्लॅन्स कायम ठेवण्यावर भर देतो. त्याचंच फळ महत्त्वाच्या क्षणी मिळतं.
कारण क्रमांक तीन – चेन्नईची अतिघाई
लई डीप जाऊन बघितलं, तर चेन्नई सुपर किंग्सनं अनेक मॅचेस शेवटच्या क्षणी गमावल्यात. म्हणजे शेवटच्या काही ओव्हर्समध्ये, तर अगदी शेवटच्या बॉललाही. सगळी मॅच चांगलं खेळून चेन्नईचे भिडू शेवटाला गंडतात आणि इथंच मुंबई धोबीपछाड टाकते.
कारण क्रमांक चार – मुंबईच्या संघातली डेप्थ
यंदाचा सिझन सोडा, पण मुंबईची टीम खऱ्या अर्थानं तगडी राहिलीये. किमान आठ नंबरपर्यंत त्यांच्याकडे बॅटर्स होते. हा नाही खेळला, तर तो खेळेल, कुणीच नाय खेळलं तर पोलार्ड खेळेल असा त्यांचा विषय होता. दुसऱ्या बाजूला चेन्नईची बॅटिंग शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस, धोनी आणि रैना या चार खांबांवर टिकलेली. वरती विषय गंडला, तरी शेवटपर्यंत लाऊन धरायला काही प्लेअर्सलाच जमायचं. तिकडं मुंबईची गँग मात्र टिच्चून खेळायची.
कारण क्रमांक पाच – लॉजिक नाय मॅजिक आहे
खरं सांगायचं तर, पाच आकड्याची जुळणी करण्यासाठी आम्ही हे कारण टाकलंय. पण आम्हाला माहितीये की, निम्म्या जनतेचा यावर विश्वास बसणार. मुंबई आणि चेन्नईची मॅच घासून होत असली की कॅमेरा प्रेक्षकांकडे वळतो.
इथं दोन जणी दिसतात, एक म्हणजे नीता अंबानी आणि दुसऱ्या म्हणजे मुंबईच्या आज्जी. या दोघीही जणी संघ जिंकावा म्हणून देवाचा धावा करत असतात… मग लोकं म्हणतात मुंबई जिंकली कारण ‘जपाची कृपा.’
यावर्षी चेन्नईनं सहापैकी फक्त एक मॅच जिंकलीये, तर मुंबईची पाटी अजूनही कोरीच आहे. टीममधले बरेच खेळाडू बदललेत, चेन्नईचा तर कॅप्टनही बदललाय…
त्यामुळं हा जिंकण्याचा इतिहास बदलतोय का हे पाहायला सगळी जनता स्क्रीनकडे डोळे लावून बसणार हे फिक्स.
हे ही वाच भिडू:
- जडेजानं चेन्नईची कॅप्टन्सी वशिल्यानं नाय मेहनतीनं कमावलीये…
- धोनीनं चेन्नईची कॅप्टन्सी सोडण्याची कारणं वाचून, त्याच्याबद्दलचा रिस्पेक्ट अजून वाढतोय….
- दोन पर्याय होते. गुंडगिरी करायची की क्रिकेट ? तो क्रिकेटचा गुंडा बनला…