सांगलीत पोरं भाड्यानं मिळत्यात हि झलक, खरं कांड माहित झालं तर बत्यागुल होतील.

आवों कभीं हवेलीपैं !!! याच चालीत वाचा आवों कभीं सांगलीमैं !!!!

तुम्ही सांगलीच हाय काय. असाल तर है आर्टीकल तुमच्या भावनांची संतुष्टी करणार हाय. आणि नसलात तर तुम्हाला कसतर वाटल.

कसतर म्हणजे कस ? 

तर चौदाच्या अगोदर जस महाराष्ट्राला गुजरातकडं बघून वाटायचं अगदी तसच. हे वाचताना आधनं मधनं वाटल की आपण सांगलीत पाहीजे होतो. पण त्याचं कसय आण्णाचा कोंबडा जसा लाखात असतो तस आमचा जिल्हा लाखात आहे. प्रत्येक महिन्यात सरासरी एक कांड करुन चर्चेत येणं हा सांगलीचा गुणधर्म. आत्ता तर इलेक्शन लागलय. म्हणजे बोलायलाच नको. ब्रेकिंग न्यूज म्हणू नका, अग्रलेख म्हणू नका वाटलं तर ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी म्हणू नका पत्रकारतेत जे काय काय प्रकार राहिलेत ते सगळे हितं पुर्ण होतेत.

लेटेस्टमध्ये सांगली चर्चेत आलय ते हरिपुर रस्त्याच्या बोर्डमुळं. बोर्डवर प्रचारासाठी पोरं भाड्यानं मिळतील म्हणून लिहलय. सगळ्या महाराष्ट्राला ती बातमी वाटली. पण आमच्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे ती.

तर असो ते एक छोटसं कांड खरच आहे अफवा नाय पण त्याहून बत्यागुल करणारी माहिती इथे आहे.

 

किस्सा क्रमांक एक –

मायबाप रसिकहों सांगलीत आत्ता इच्छुकांच्या मुलाखती चालूयत. ज्याला नगरसेवक व्हायचं आहे. तो शक्तीप्रदर्शन करतं येतो आणि मुलाखती देवून जातो. जाहिर मांडवाखाली मुलाखती असतात. हातात माईक आणि पुढं आमदार खासदार मंडळी. सांगलीच आमदार सुधीर गाडगीळ. तेच ते गाडगीळ सराफ वाले. तर परवा काय झालं गाडगीळ साहेब मुलाखती घेत होते. एक इच्छुक बाई उभा राहिल्या आणि बोलाय सुरवात केली,

साहेब मी अस्सल सोनं आहे सोनं. मला उमेदवारी दिलीत तरच तुम्हाला खरी सोन्याची पारखं आहे म्हणायची. तुम्ही खऱ्या सोन्याला पसंती दिलीत तर तुम्हाला सोन्यासारखं काम करुन दाखवेल.

आत्ता हाय का ? थेट गाडगीळांना सराफांना सोनं पारखायचं चॅलेंज.

 

किस्सा क्रमांक दोन –

नगरसेवक आणि नागरिक असा सुगम संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नागरिकांनी कस आदर्श नागरिक असावं. नगरसेवकांनी कशी लोकशाहीची मुल्य जपावीत अस काय काय लेक्चर चालू होतं. लोक ऐकून शांत बसतील कनाय. तर एकानं लगेच ठराव मांडला. या वर्षी मटण आणि दारू घेवून मत द्यायचं नाय.लोकशाहीच्या तत्वाच्या विरोधात आहे ते. ठराव पास होणार तोच दूसऱ्यानं ठराव मांडला एखाद्याला मटण आणि दारू पाहिजे असली तर त्याच्यावर मुलभूत हक्कांवर तुम्ही गदा आणताय. अस होता कामा नये. लोकशाहीत प्रत्येकाच्या मताला किंमताय. पुढं काय होणार दारू आणि मटण घेवून मत करण्याचा हक्क अबाधित राहिला.

 

किस्सा क्रमांक तीन –  

इच्छुकांच्या मांदियाळीत पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट आणि पांढरा बुट त्यात पांढरे सॉक्स असा अवतार करु एक पांढरपेशी व्यक्ती आले. शक्तीप्रदर्शन जावूद्या वो साधा एक माणूस नव्हता बरोबर. अवतार बघून माणसं लागली हसायला.तो उभा राहिला आणि ओळख करुन दिली. नमस्कार मी रमेश वाघमारे आपल्या महानगरपालिकेत सह आयुक्त होतो. खुद्द माजी सहाय्यक आयुक्तच आत्ता नगरसेवक पदाच्या फाईटला उतरलेले पाहून अनेकांना वेगळाच आनंद झाला.

 

किस्सा क्रमांक चार – 

निवडणुकीत पैशाशिवाय काय चालत नाही. सगळ्यांनाच माहिताय विशेष काहीच नाही. पण तीस लाखाचा चेक नाचवणारा इच्छुक कधी बघितलाय का ? तर याच झालं अस की खासदार संजयकाका पाटलांच्या समोर इच्छुकांच्या मुलाखती चालू होत्या. खासदार साहेब क्लिष्ट प्रश्न काढून आल्ते. तर समोरच्या इच्छुकांन बोलायला सुरवात केली. हे बघा साहेब पैशाशिवाय काय चालत नाय. पैसा महत्वाचाय. आत्ता येताना तीस लाखाचा चेक आणलाय अजून पाहीजे असतील तर सांगा.संकोच नको पण किती पण खर्च करतो. शीट येणार !!!

 

किस्सा क्रमांक पाच – 

प्रभाग क्रमांक ११ च्या मुलाखती चालू होत्या. आपल्या नावाबरोबर इतरांच नाव रेटून सेफ वॉर्ड खेळायचा प्रकार नविन नाही. तर इच्छुक मॅडम मुलाखत देताना म्हणल्या पालिकेवर भगवा फडकला पाहीजे. त्यासाठी सेना आणि भाजपचा झेंडा लागला पाहीजे. त्यासाठी युतीचा प्रस्ताव आहे. त्यांना उमेदवारी देवून आपण भगवा फडकवा. थोडक्यात सांगायचं झालं तर सेने आणि युतीचा प्रस्ताव याच निवडणुकीत इच्छुकाकडून पुढं आलाय.

आत्ता सांगा भाड्यानं पोरं मिळतील हे जितकं भारी वाटतय तितकच हे किस्से पण भारी आहेत कनाय ? बोर्ड तर फक्त एक झलक हाय वो.

Leave A Reply

Your email address will not be published.