निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला तडा जाण्यासाठी आसामची एक घटना पुरेशी आहे.

काल रात्री आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम सापडल्याची बातमी आली.  वातावरण कमालीचं तणावाचं झालं. त्यानंतर भाजप आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. मात्र इथं मुद्दा हा नाही की ते ईव्हीएम कोणत्या तरी पक्षाच्या उमेदवराच्या गाडीत सापडलं.

मुद्दा हा आहे की आता निवडणूक आयोगावर डोळे झाकून ठेवणाऱ्या माणसाचं काय? कारण हा प्रश्न आता सर्वच स्तरातून विचारला जात आहे. 

नक्की काय घडलं आसाममध्ये?

निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार,

काल आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यात पाथरकांडी विधानसभा क्षेत्रात देखील मतदान पार पडलं. यानंतर तिथल्या एका मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी या मशीन्स सील करून स्ट्राँग रूममध्ये हलवायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी आपल्या गाडीत आधी ही मशिन्स ठेवली.

पण वाटेत इथल्या अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगानं दिलेली गाडी बंद पडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एका गाडीला लिफ्ट मागितली. मात्र या अधिकाऱ्यांना माहित नव्हतं की संबंधित गाडी ही भाजपच्या उमेदवाराची आहे. 

पण जेव्हा एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरोमध्ये निवडणूक अधिकारी ईव्हीएम घेऊन जात असल्याचं स्थानिकांनी बघितलं त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी या घटनेचा व्हिडीओ देखील काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ती कार भाजप उमेदवार कृष्णेंदू पाल यांच्याशी संबंधित असल्याचं समोर आलं.

कृष्णेंदू पाल पाथरकांडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

जेव्हा स्थानिकांनी गोंधळ घातला तेव्हाच निवडणूक अधिकाऱ्यांना देखील हा प्रकार समजल्याच आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

या घटनेनंतर आयोगाकडून संबंधित पोलिंग ऑफिसर सह ४ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असून फेरमतदान जाहीर केलं आहे. तसचं गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

मात्र या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटरवरुन ईव्हीएम टॅम्परिंग हे भाजपचं महत्वाचं निवडणूक हत्यार असल्याची टीका केली आहे.

तर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्या म्हणतात, 

क्या स्क्रिप्ट है? निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाला. त्याचवेळी तिथे एक गाडी प्रकट झाली. ती गाडी भाजपा उमेदवाराची निघाली. निष्पाप निवडणूक आयोगानं त्यातूनच प्रवास केला. प्रिय निवडणूक आयोग, हे काय प्रकरण आहे? यावर तुम्ही देशाला स्पष्टीकरण देऊ शकता का? आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?”

तर जेष्ठ पत्रकार आणि लेखिका राणा आयुब यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणतात,

ईव्हीएम हॅकिंग हि एक हारणाऱ्या पक्षांकडून रचलेली थेअरी असल्याचं मी अनेकदा सांगितलं आहे. मात्र आसाममधील घटना खूपच गंभीर असून आपल्या देशात निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला या एका घटनेमुळे तडा गेला आहे.

तर भाजपकडून हा संपूर्णपणे काँग्रेसनं रचलेली कथा असल्याचा आरोप केला आहे. 

भाजपचे सिल्चरचे खासदार डॉ. राजदीप रॉय यांच्या म्हणण्यानुसार संबंधित आमदार आणि त्याचे इतर नातेवाईक हे सगळं भाजपकडून रचण्यात आलं आहे. यामागे कारण म्हणजे भाजपला निवडणूक काळात बदनाम करणं.

रॉय यांच्या मतानुसार संबंधित आमदारांचा नातेवाईक रातबरी मतदार संघात निवडणूक आयोगाला यापूर्वीपासूनच मदत करत होता.

मतदानानंतरची प्रक्रिया काय असते?  

शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतर मतदान केंद्राचे प्रमुख किंवा प्रिसायडिंग ऑफिसर तिथं CLOSE हे बटण दाबतात. त्यानंतर कोणतंही मत नोंदवलं जाऊ शकत नाही. मशीनमध्ये एकूण नोंदवलेल्या मतांचा आकडा तिथं उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सांगितला जातो.

मतदानानंतर EVM ला एका बॉक्समध्ये ठेवून त्यावर शिक्का मारला जातो. तसंच निवडणूक आयोगाने दिलेली विशेष सुरक्षा पट्टी लावली जाते. निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यावर स्वाक्षरी केली की ते बॉक्स स्ट्राँग रूममध्ये जमा केले जातात.

वाहतुकीचे देखील काही तरी नियम आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाने यासंबंधी एक नियमावली जारी केली आहे. याच्या प्रकरण ४ मध्ये ईव्हीएमच्या वाहतुकीचा उल्लेख आहे. याच्या अंतर्गत ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटची वाहतूक ईव्हीएम ट्रॅकिंग सॉफ्टवेअरमधूनच केली जावी. म्हणजे ईव्हीएम कुठे आहे याची लाइव्ह ट्रॅकिंग चालू राहील.

तसचं जीपीएस वाल्या वाहनांचा वापर केला जावा अशी देखील अट यामध्ये आहे. सोबतच जिल्हा निवडणूक अधिकारी ईव्हीएम ट्रान्सपोर्टेशनची पूर्ण व्हिडीओग्रापी करतील असं ही सांगितलं आहे.

त्यानंतर ज्यादिवशी मतमोजणी असेल त्यादिवशी हे मतदान जुळवून पाहिलं जातात. मात्र या दोन आकड्यांमध्ये काही फरक असल्यास मतमोजणी करणारे निवडणूक अधिकाऱ्यांच्या ते लक्षात आणून देऊ शकतात.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.