गडकरी स्वीडन प्रमाणे भारतात सुद्धा इलेक्ट्रिक हायवे बनवणार आहेत..

मोदी सरकारच्या काळात एका मंत्रालयाचा बोलबाला आहे. ते म्हणजे नितीन गडकरी यांच्या अखत्यारीतीत येणारे रस्ते मंत्रालय. गेल्या काही वर्षात देशातील बहुतेक राज्यातील रस्त्यांचा कायापालट झाल्याचे पाहायला मिळते. त्यात नितीन गडकरी यांच्या मोठा वाटा आहे. आता नितीन गडकरी यांनी अजून एक नवीन संकल्पना मांडली आहे. त्यामुळे वेळ, पैसे याची मोठी बचत होऊ शकते.

केंद्र सरकार इ-वाहना नंतर इलेक्ट्रिक हायवेला प्राधान्य देत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत अनेकांकडून विचारणा करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक हायवे संदर्भांत काम सुरु आहे. दिल्ली-मुंबई दरम्यान सुरू असलेल्या एक्सप्रेस वे च्या कामाची पाहणी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुग्राममधील सोहना येथे जाऊन केली. त्यावेळी ते बोलत होते. 

अगोदर इलेक्ट्रिक हायवे हि संकल्पना काय आहे ते समजून घेऊयात 

इलेक्ट्रिक हायवेला ग्रीन हायवे सुद्धा म्हटले जाते. जर्मनी, स्वीडन आणि कोरिया या देशात इलेक्ट्रिक हायवे आहेत. याच धर्तीवर भारतातील महामार्ग इलेक्ट्रिक हायवेमध्ये बदलण्यात येणार आहे. यामुळे बस आणि ट्रक हे विजेवर चालतील. महत्वाचे म्हणजे वाहतुकीचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.

इलेक्ट्रिक हायवेवर ट्रक आणि बस मेट्रो प्रमाणे वर इलेक्ट्रिक केबलच्या आधारे जोडण्यात येईल.

इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन प्रमाणे बस आणि ट्र्क विजेवर चालविण्यात येणार आहे .देशभरातील महामार्गावर दोन्ही बाजूनी विजेच्या केबल टाकण्यात येणार आहेत. त्यात ८० टन वजन वाहून नेण्याची क्षमता असणार आहे. तसेच १०० ते १२० किमी वेगाने ट्रक, बस धावू शकतील. यामुळे प्रदूषण सुद्धा घटणार आहे आणि कमी वेळात सामान आपल्या हातात पोचणार आहे. तसेच सुद्धा बस अर्ध्यावेळात इच्छित स्थळी पोहचणार आहे.

याबाबत नितीन गडकरी यांनी सांगितले की, अनेक वाहन निर्मती कंपन्या इलेक्ट्रिक हायवेवर चालतील अशा बस आणि ट्रक बनवत आहेत. तसेच त्यांनी यावेळी दावा केला आहे की, २०२१ च्या शेवट पर्यंत अशा १० हजार बस आणि ट्रक भारतात येतील. या बस आणि ट्रक वीज आणि बॅटरी यादोन्हींवर धावतील.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे म्हणणे आहे की, देशात वहानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच ८५ टक्के वाहने हि रस्त्यावर येत असल्याने अनेक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोपवे, इलेक्ट्रिक हायवे, मेट्रो आणि मोनो रेल वाढविण्यासंदर्भात सांगितले आहे. त्यावर जोर देऊन देशभरात कामे सुरु आहेत. 

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवर देशातील पहिला इलेक्ट्रिक हायवे दिल्ली ते जयपूर दरम्यान होणार आहे.  त्यानंतर देशातील इतर महामार्गावर हे काम करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती जाऊन घेण्यासंदर्भात स्वतः नितीन गडकरी हे स्वीडन ला जाणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा वापर थांबावा म्ह्णून इलेक्ट्रिक हायवे सारखी संकल्पना मांडण्यात येत आहे. सध्या डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या किंमती  गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सामान्य व्यक्तीचे आर्थिक गणित सगळे बिघडले आहेत. जर इलेक्ट्रिक हायवेमुळे वाहतुकीचा खर्च वाचला तर त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.