बिल माफ करायचं राहू दे : पण असलेली वीज तरी तोडू नका….

राज्यात सध्या वीज तोडणीचा कार्यक्रम जोरात सुरु आहे, बील न भरलेल्या थकबाकीदारांच्या कनेक्शनची महावितरणाकडून तोडणी करण्यात येतं आहे. अजूनही महावितरणाकडं तब्बल ७१ हजार ५०६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती, व्यावसायिक, कृषी, औद्योगिक अशा सगळ्या प्रकारांचा समावेश आहे.

मध्यंतरीच्या काळात ही वीज बिल माफ करावी म्हणून मागणीनं चांगला जोर धरला होता, विरोधी पक्षांकडून पण यात आंदोलनं झाली, पण सरकारकडून या मागणीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस बिल भरणं हा एकमेव पर्याय पाठीमागं राहीला.

मग सुरु झाला वसुलीचा कार्यक्रम. काही महिने हा कार्यक्रम चालला आणि त्यानंतर आता सध्या ज्यांनी बिलं भरली नाहीत, त्यांची वीज तोडायची हे धोरण महामंडाळनं स्विकारलं.

मात्र या वीज तोडणीच्या धोरणाचा सर्वात जास्त फटका कोणाला बसत असेल तर तो शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पिकांना.

जर आकडेवारीत बघायचं म्हंटलं तर नुसत्या कृषी पंपाच्या थकबाकीचा विचार केला तरी, आजच्या घडीला ४४ लाख ४४ हजार ग्राहकांकडे जवळपास ४५ हजार ७५० कोटींची थकबाकी आहे. तर ५ लाख ८२ हजार ११४ शेतकऱ्यांनी ही थकबाकी भरली आहे.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत, यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं आहे की,

शेतकऱ्यांनी वीज बिल थकवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करत वीज कनेक्शन खंडीत करण्यात येत आहे. 

पण या तोडणीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतयं. कनेक्शन तोडायला आलेल्या महावितरणाच्या आधिकाऱ्यांच्या हातापाया पडून देखील वीज तोडणी केली जात असल्याचं दिसून आलं आहे.

याच संदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ‘बोल भिडू’ने काही शेतकऱ्यांना संपर्क केला त्यावेळी, 

पारनेर तालुक्यातील शेतकरी बी. एन, फंड म्हणाले,

आम्हाला एवढी २ महिनेच लाईटची अत्यंत गरज असते. कारण फेब्रुवारी, मार्चमध्ये आमच्या विहिरींमधलं सगळं पाणी आटून जातं, आणि पिकाला शेवटचं एखादं-दुसरं पाणी द्यायचं बाकी असतं. पण नेमकं याच काळात महावितरणांन दोन वेळा लाईट तोडली. ४-५ जणांची थकबाकी असली तरी सगळ्यांची लाईट तोडली होती.

आता तर आम्हाला पुढचे १५ दिवस कांदा निघेपर्यंतच पाण्याची आणि लाईटची गरज आहे, जुलै-ऑगस्टमध्ये पुन्हा पेरणी होईल तेव्हा पाऊस असतो त्यामुळे लाईटची गरज नसते. म्हणून आता नाही मिळाली तर हाता-तोंडाला आलेलं पीक मार खाणार आहे.

कराड तालुक्यातील शेतकरी यदुनाथ सूर्यवंशी म्हणाले,

अजून माझं उसाचं बिल आलेलं नाही, घरात करता पुरुष म्हणालं तर मी एकटा आहे आणि पूर्ण शेतीवर अवलंबून आहे. पैसेच नसल्यामुळे किराणाचं बिल पण मागच्या २ महिन्यांपासून थकवलं आहे.

जेव्हा हे लाईट तोडायला आले तेव्हा त्यांना हात जोडून सांगितलेलं बिल माफ करायचं राहू देत पण आहे ती तरी लाइट तोडू नका. पण नाही ऐकलं.

५० टक्के सवलत दिलीय त्यात भरा म्हणालेत, पण जिथं ३ एचपीची मोटर आहेत त्यासाठी ५ एचपीची बिल दिलेत. ५ एचपीची आहे त्यात ७.५ एचपीची बिल लावलेत आणि जिथं ७.५ एचपीची आहे त्यासाठी १० एचपीची दिलेत. म्हणजे बिल वाढवून पण ह्यांनीच द्यायची आणि सवलत पण ह्यांनीच द्यायची.

शेतकरी योगेश गाडे म्हणाले,

मी ५ एपीचे इंजिन भाड्याने घेतलं. रोजचा खर्च हजार रुपये. सामुहिक कनेक्शन. त्यातल्या नऊ जणांनी वीजबील भरले, एक जण राहिला तरी डीपी बंद केला आहे. साहेबांना म्हणलो, माझे वीजबील रेग्युलर आहे लाईट बंद नका करू. साहेब म्हणाले तुझ्या एकट्यासाठी पाॅवर हाऊस चालू ठेवू का?

डीपी जळाली, ऑईल कमी आहे, फ्युज बदलणे, पोल सरळ करून तारा ओढणे अशी सगळी काम शेतकरी स्वतःच्या पैशातुन करत असतो. नियमित बिल भरायची आणि वरुन असली मनमानी पण शेतकऱ्यांनच सहन करायची. आम्ही वीजबील भरतोय. पण मीटरप्रमाणे आणि एचपीप्रमाणे बील द्या एवढीच आमची मागणी आहे. डीपीची देखभाल करा. आठ तास उच्चदाबाने वीज द्या.

शेतकरी संघटनानंची काय आहे भुमिका?

तिकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी वीज कनेक्शन्स तोडण्याच्या विरोधात १९ तारखेला पुणे- बेंगलोर महामार्गावर रस्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे, वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडू नका, तसचं सरकारनं दिलेलं आश्वासन पाळावं अशी त्यांची भूमिका आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.