Coca-Cola त पुन्हा कोकेन टाकणार ; मस्क हे सारकास्टिकली म्हणतोय की खरंच कोकेन होतं..?

गेले काही दिवस बघा सोशल मीडियावर नुसते इलॉन मस्क भाऊच फिरताना दिसतायेत. जणू काय राजधानी एक्सप्रेसचं ड्रायव्हर सीटच त्यांनी हासील केलंय आणि सुसाट सगळ्या स्टेशन्सला गाडी पळवतायेत. सगळ्या सोशल प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्याच चर्चा आणि त्याही एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनच.

ते म्हणजे ट्विटर.

इलॉन मस्क ट्विटर घेणार का? इथून चर्चा सुरु झाल्या ते… या खरेदीमध्ये आलेले सगळे अडथळे, त्यावरचे वाद-प्रतिवाद ते… फायनली ट्विटर खरेदी करण्यापर्यंत!

आता वाटलं एकदाचं मस्क भाऊंनं ट्विटर घेतलं आहे तेव्हा जरा त्यांचं वारं शांत होईल. मात्र चर्चांतून उतरायचं नाव घेतील ते मस्क भाऊ कसले. आता नवीनच स्फोट त्यांनी केलाय.

“आता मी कोका-कोला कंपनी विकत घेणार”, असं त्यांनी जाहीर केलंय. 

हे वाचून तर अनेकांची पहिली प्रतिक्रिया अशीच असणार की, मस्क भाऊ कंपन्या विकत घेताय की चॉकलेट? 

असो, आता किती कंपन्या घ्यायचा हा त्यांचा प्रश्न. पण आता कोका-कोला कंपनी ते घेतायेत यापेक्षा जास्त चर्चा ‘ते का घेतायेत’ या कारणावरून होतेय. अहो, असं डेन्जर कारणंच दिलंय त्यांनी. 

ही त्यांची सवय आहे. कोणतीही कंपनी खरेदी करताना ते त्याचं कारण सांगतात. ट्विटर खरेदी करताना ते म्हणाले होते की, “मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ट्वीटरला खरेदी करतोय.” आता त्यानंतर ते कोका-कोलाकडे जेव्हा वळले आहेत तेव्हा देखील त्यांनी कारण दिलंय. म्हणालेत…

“मी कोका-कोलामध्ये पुन्हा एकदा कोकेनचा वापर करता यावा यासाठी कंपनी खरेदी करतोय.”

तुम्हीच बघा…

त्यांच्या या ट्विटनंतर नेटकाऱ्यांनी अनेक मजेदार प्रतिक्रिया देणं सुरु केलंय. मात्र यातून मुख्य प्रश्न हा निर्माण होतोय की, 

खरंच कोका-कोलामध्ये कोकेन होतं का?

शिवाय हे काही पहिल्यांदाच नाहीये. याआधी देखील या मुद्या प्रकाशझोतात आलेला होता. मात्र तेव्हा कोका-कोला कंपनीने नकार दिला होता.

तेवढ्यात दिसलं मस्कच्या ट्विटला एका व्यक्तीने केलेलं रिट्विट जे असं दर्शवतंय की, कोका-कोलामध्ये कोकेन होतं. तुम्ही पण बघा…

मग तर विषय अजूनच पेचाचा झाला. म्हणून म्हटलं आपणंच आता खरं काय ते शोधू आणि सुरुवात केली. 

तेव्हा सापडलं… हो, कोका-कोलामध्ये कोकेन होतं. 

कसं? बघूया… 

कोका-कोलाचा शोध १८८५ साली जॉर्जियातील अटलांटा इथे लागला. तिथले औषधविक्रेता जॉन पेम्बर्टन हे त्याचे शोधकर्ता. त्यांनी तत्कालीन लोकप्रिय फ्रेंच रिफ्रेशमेंट कोका वाईन नंतर हे मॉडेल विकसित केलं होतं. पेम्बर्टनच्या रेसिपीमध्ये बोर्डो वाइनमध्ये (Bordeaux wine) कोका-लीफचा अर्क मिसळून पेय तयार करण्याचं नियोजित होतं. 

मात्र या मिश्रणामुळे दारू तयार होऊ शकत होती. म्हणून पेम्बर्टनने आपल्या कोका-लीफचा (coca leaf) अर्क वाइनऐवजी साखर सिरपमध्ये मिसळणे पसंत केले. शिवाय त्यात कोला-नट (kola nut) अर्क जोडला. (कोला नट आणखी एक उत्तेजक आहे ज्यामध्ये कॅफिन असतं)

अशा या मिश्रणातून तयार झालं पेम्बर्टन शीतपेय. शिवाय ते बनवण्यास वापरण्यात आलेल्या सामग्रीतून त्याला नाव देखील मिळालं. 

कोका-लीफ पासून ‘कोका’ आणि कोला नट पासून ‘कोला’ = कोका-कोला 

जेव्हा कोका-कोलाचा शोध लागला, तेव्हा कोकेनचा वापर कायदेशीर होता. १९१४ पर्यंत अमेरिकेत कोकेन बेकायदेशीर ठरवण्यात आलं नव्हतं. ते कमी प्रमाणात वापरणं सुरक्षित आहे, असं लोकांना वाटायचं. तसंच औषधांमध्ये एक सामान्य घटक म्हणून त्याचा वापर असायचा. 

पेम्बर्टनंही औषध म्हणूनच कोका-कोलाला लॉन्च केलं होतं.

पेम्बर्टननं या पेयाचं वर्णन ‘ब्रेन टॉनिक आणि बौद्धिक पेय’ असं केलं होतं आणि ‘पेटंट औषध’ म्हणून त्याची जाहिरात केली होती. यामुळे डोकेदुखी, पोट बिघडणं आणि थकवा दूर होतो, असा दावा त्याने केला होता.

मात्र जरी हे पेय असे आजार नीट करत असलं तरी बऱ्याचदा पेयातील घटक व्यसनाधीन असू शकतात, याकडे त्यांचं लक्ष गेलं नाही. 

१९ व्या शतकात पेटंट औषधांचे नियमन आजच्या औषधांप्रमाणे केलं जात नव्हतं. कोणीही असा दावा करू शकत होता की त्यांचं उत्पादन आरोग्यास फायदेशीर आहे. अगदी उत्पादनाची कोणतीही परिणामकारकता सिद्ध न कर किंवा त्याचे धोके प्रकट न करता.

मात्र १८९१ च्या सुरुवातीला काही अमेरिकन लोकांनी पेटंट औषधांमध्ये व्यसनाधीन घटकांचा समावेश करण्याच्या विरोधात आवाज उठवला. १९०३ सालापर्यंत तर मोठ्या प्रमाणावर जनतेच्या मताचा प्रवाह  अंमली पदार्थांचा वापर करण्याच्या विरोधात वळला होता. 

परिणामी सगळ्या औषध निर्मात्यांनी औषधांची सूत्रे आणि त्यांच्या आरोग्याच्या दाव्यांमध्ये सुधारणा केली. याचा परिणाम कोका-कोलावर देखील झाला. 

कोका-कोला कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापक आसा ग्रिग्स कँडलर (Asa Griggs Candler) यांनी कंपनीच्या पेयांमधून कोकेनचं प्रमाण कमी करण्यास सुरुवात केली आणि शेवटी १९२९ पर्यंत ते पेयातून काढून टाकण्यात आलं. 

हा तो काळ होता जेव्हा अमेरिकेत दारूबंदीचे वारे वाहत होते, जेव्हा दारू बेकायदेशीर होती. म्हणून  कोका-कोला लवकरच ‘सॉफ्ट’ ड्रिंक म्हणून आणि हार्ड अल्कोहोलचा पर्याय म्हणून लोकप्रिय झाला. 

काहीसा असा होता या कोका-कोलाचा प्रवास. 

सध्याच्या घडीला जवळपास २०० देशांमध्ये कोका-कोला कंपनीचा व्यवसाय आहे. तर एक आघाडीची बहुराष्ट्रीय शीतपेय कंपनी म्हणून कोका-कोलाने स्वतःला इस्टॅब्लिश केलं आहे. या कंपनीत ७ लाखांहून अधिकजण काम करत आहेत. इतकंच काय तर भारतासह काही देशांमधील स्थानिक बाजारातील कोल्डड्रिंक कंपन्यांना ताब्यात घेत कोका-कोलाने त्या देशातील बाजारपेठांवर वर्चस्व निर्माण केलं आहे.

याच कोका-कोलाचे जुने दिवस परत आणण्याचं स्वप्न कदाचित इलॉन मस्क बघतायेत. म्हणून तर त्यात परत कोकेन आणण्याचं त्यांनी ट्विट केलंय. 

मात्र एक सत्य हे आहेच की, कोकेन बेकायदेशीरच आहे.

तेव्हा इलॉन मस्कच्या या वक्तव्याला सध्या तरी सारकास्टिकली घेतलं जातंय. एक मात्र नक्की… एवढी विस्तारलेली आणि बलाढ्य कंपनी जर मस्क यांनी खरंच घेतली तर मोठा कल्ला होणारेय. 

तेव्हा खरंच इलॉन मस्क कंपनी विकत घेणार का? आणि काही शक्कल लढवून इलॉन खरंच कोकेन परत आणणार? हे तर येणारा काळंच सांगेल. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.