एलॉन मस्कचं एक ट्विट आणि भारतातल्या राज्यांमध्ये आमंत्रणाची रेस सुरु झालीये

मी बिझनेसमॅनपेक्षा इन्फ्लुएन्सर होणं जास्त पसंद करीन असं एकदा एलॉन मस्कनं म्हटलं होतं. क्रिप्टोकरन्सीचं मार्केट असू दे की शेअर बाजार मस्क आपल्या चार-पाच शब्दांच्या ट्विटनं हालवून सोडतो.

लोकांना इन्फ्लुएन्स करणारा मस्क आता मंत्र्यांना पण आपल्या मागे येण्यास भाग पाडत आहे.

तर त्याची स्टोरी अशी आहे कीटेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यानं प्रणय पाथोले यांच्या ट्विटला उत्तर दिले होते. प्रणय यांनी भारतात टेस्लाच्या लॉन्चशी संबंधित प्रश्न पोस्ट केला होता.“त्यानं इलॉन मस्कला विचारले होते की टेस्ला भारतात कधी लॉन्च होईल याबद्दल आणखी काही अपडेट? एवढी झकास गाडी जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात असायला पाहिजे!”

यावर उत्तर देताना एलोन मस्कनं “अजूनही सरकारसोबत अनेक आव्हानांमधून काम करत आहे.” असं म्हटलं होतं.

त्याचं हे ट्विट सोशल मीडियावर विशेषतः भारतात जोरदार व्हायरल झालं. भारताच्या टेकसॅव्ही मंत्र्यांनी पण हे पाहिलं आणि इलॉन मस्कच्या कंपनीला आमंत्रण देण्यास सुरवात केली.

एलॉन मस्कच्या ट्विटला रिप्लाय देणारे पहिले मंत्री होते तेलंगणाचे  उद्योग आणि वाणिज्य मंत्री के.टी. आर. राव “ मी भारतातील तेलंगणा राज्याचा उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहे. टेस्लासोबत भारत/तेलंगणामध्ये दुकान सुरू करण्याच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भागीदारी करण्यात आनंद होईल. आमचे राज्य शाश्वत उपक्रमांमध्ये चॅम्पियन आहे आणि भारतातील उच्च दर्जाचे व्यावसायिक डेस्टिनेशन आहे.”असं ट्विट त्यांनी केले होते.

त्यानंतर मग महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांनी पण ट्विट केलं होतं.

“महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. तुमची भारतात स्थापना होण्यासाठी आम्ही तुम्हाला महाराष्ट्राकडून सर्व आवश्यक ती मदत देऊ. आम्‍ही तुम्‍हाला तुमचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट महाराष्ट्रात स्‍थापित करण्‍यासाठी निमंत्रित करतो.” असं जयंत पाटलांनी म्हटलं होतं.

 

आणि आत यात उडी घेतली आहे पंजाबमधून काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी.

मस्कने यापूर्वी केलेल्या ट्विटचा हवाला देत सिद्धू म्हणाले, “मी @elonmusk यांना आमंत्रित करतो, पंजाब मॉडेल हे लुधियानाला इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी उद्योगाचे केंद्र म्हणून गुंतवणुकीसाठी सिंगल विंडो क्लीयरन्ससह तयार करेल ज्यामुळे पंजाबमध्ये नवीन तंत्रज्ञान येईल, हरित रोजगार निर्माण होईल. आणि पंजाब पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा वाटचाल करेल .”

यापूर्वी, मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कंपनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी ईव्हीवरील आयात कर कमी करण्याची विनंती केली होती. 

खरं तर, भारतात आयात केलेल्या कारवर 60 टक्के ते 100 टक्के सीमाशुल्क आहे.

मस्क म्हणत होता की भारतातील कर हे जगातील सर्वाधिक आहेत आणि त्यामुळे भारतीय ईव्ही मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते कमी करावेत अशी त्यांची इच्छा होती. पण असेल केलं तर भारतातली स्थानिक गुंतवणूक कमी होईल असं म्हणत भारताच्या लोकल ऑटोमोबाईल कंपन्यांच्या मालकांनी मस्कच्या या मागणीला विरोध केला होता.

त्यामुळं राज्यांच्या स्पर्धेतून मस्क भारतात येणार की याचं फक्त राजकरण होणार हे येणाऱ्या काही दिवसांतच कळेल.

हे ही वाच भिडू :

web title : Elon Musk tweet: Elon Musk tweet started a competition between Indian states

 

Leave A Reply

Your email address will not be published.