आणीबाणीला विरोध करणाऱ्या दुर्गाबाईंना इंदिरा गांधींनी पद्मश्री देऊ केला होता…

२६ जून १९७५. भारतीय लोकशाहीचा काळा दिवस. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करून संपुर्ण सत्ता आपल्या हातात घेतली. भारतात पहिल्यांदाच व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही सुरु होत होती. पण अजूनही याचा धोका कोणाला कळाला नव्हता.

खुद्द आचार्य विनोबा भावेंच्या सारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्व देखील अनुशासन पर्व म्हणत या आणीबाणीचा पुरस्कार करत होते.

विरोधकांना देखील नेमका विरोध कसा करावा याचा अंदाज आलेला नव्हता. अशा वेळी सर्व प्रथम आवाज उठवला तो मराठी साहित्यिकांनी. त्यावर्षी कराड येथे मराठी साहित्य संमेलन होणार होते. पण त्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक झालीच नाही. पहिल्यांदाच सगळे साहित्यिक एकत्र येऊन त्यांनी आपला अध्यक्ष एक मताने निवडला होता.

त्या होत्या जेष्ठ लेखिका दुर्गाबाई भागवत.

वडिल वनस्पती तेलाचा शोध लावणारे जेष्ठ संशोधक नारायण भागवत, काका म्हणजे राजाराम शास्त्री भागवत, बहिण म्हणजे थेट सीव्ही रमण यांच्या बरोबर भांडून प्रवेश मिळवणारी कमला सोहनी भागवत असा मोठा वारसा. दुर्गाबाई यांचं व्यक्तिमत्व यांच्या मुशीत घडलं. त्यांचा लढाऊपणा आणि परखड वृत्ती  पुस्तकातून व्यक्त होत राहिली.

इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीचे हळूहळू रंग दिसू लागले. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लागू केली. सरकारची परवानगी मिळवल्याशिवाय लेखन प्रसिद्ध करण्यावर बंदी घातली. सरकारी धोरणांवर टीका करणाऱ्या वृत्तपत्रांच्या कचेऱ्यांना कुलपे घातली गेली. त्या वृत्तपत्रांच्या संपादकांनादेखील बंदी बनवले. लाखो लोक तुरुंगात गेले.

सगळे वातावरण भयग्रस्त झाले. परंतु आणीबाणीला जाहीरपणे विरोध करण्याचे धारिष्टय कोणाकडेच नव्हतेच.

अनेकांच्या मनात होत असलेली घुसमट जाहीरपणाने व्यक्त करत आणीबाणीला विरोध करणाऱ्या दुर्गाबाई एकटय़ाच निघाल्या. त्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आणीबाणीविरोधात बोलतील, ठराव मांडतील याची धास्तीच नव्हे तर खात्रीच सरकारधार्जिण्या लोकांना वाटत होती. 

विशेष म्हणजे हे साहित्य संमेलन कराड येथे म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या गावात होत होते. ते खुद्द या संमेलनाचे यजमान होते. ते साहित्याचे रसिक मानले  जायचे.अनेक लेखक कवींशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र त्यांच्याच गावात होणारे साहित्य संमेलन दुर्गा भागवत यांच्यामुळे वादग्रस्त होणार याची चिन्हे दिसत होती.

कारण यशवंतराव तेव्हा इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री होते. आणीबाणीचे त्यांनी समर्थनच केलं होतं. काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणीबाणीच्या बाजूने आक्रमक होते.

असं म्हणतात की भागवत यांना कराड मध्ये काही कार्यकर्त्यांनी धमकी देखील दिली होती. एकजण त्यांना येऊन म्हणाला की,

‘सिंहाच्या गुहेत शिरून तुम्ही त्याच्या आयाळीला हात घातलायत. हे खपवून घेतलं जाणार नाही. तुम्ही समजलात काय, साहित्य संमेलनाचा मांडव आम्ही जाळून टाकू!’

यावर दुर्गाताई कडाडल्या.

‘खुश्शाल जाळून टाका! नाहीतरी इथे मांडवाखेरीज बाकी आहेच काय तुमचं!’

अशी वादग्रस्त पार्श्वभूमी असतानाही, दोन्ही बाजू प्रचंड आक्रमक झाल्या असतानाही दुर्गाबाई भागवत यांनी कराडचे साहित्य संमेलन अतिशय ठामपणे आणि यशस्वीपणे पार पाडलं. व्यासपीठाची परंपरा न मोडता, इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकलेल्या जयप्रकाशांसारख्या नेत्याच्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी सर्वाकडून प्रार्थना करवून बाईंनी आपला आणीबाणीचा विरोध सौम्यप्रकारे जाहीर केला.

खुद्द यशवंतराव चव्हाण हे आपली राजकीय वस्त्रे गुंडाळून या साहित्य संमलेनात एका रसिकाप्रमाणे वावरले.

दुर्गाबाई भागवत व इतर साहित्यिकांच्या भाषण स्वातंत्र्यावर त्यांनी कोणताही दबाव येऊ दिला नाही. पण एकूणच आणीबाणीच्या भयाण वास्तवाला उघडे करणारे आणि त्याचा स्पष्ट विरोध करणारे हे साहित्य संमेलन संपूर्ण देशात गाजले. दुर्गाबाई भागवत यांच्या निडरतेचे सर्वत्र कौतुक झाले. अनेकांना आणीबाणीच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आत्मविश्वास मिळाला.

इंदिरा गांधींच्या हुकूमशाही विरुद्ध दुर्गाबाई भागवत या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रतीक बनल्या.

त्यांनी महाराष्ट्रात आणीबाणीविरोधात भाषणे देण्याचा सपाटाच लावला. पुण्या-मुंबईसारख्या शहरांतूनच नव्हे तर इतर गावांतून जिथून बोलावणी आली तिथे जाऊन त्यांनी आणीबाणीला कठोर शब्दांत विरोध केला. विचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्याचा पुरस्कार केला.

अशाच एका व्याख्यानाच्या निमित्ताने दुर्गाबाई भागवत बेळगावला आल्या होत्या. तिथे एका हॉटेल मध्ये त्या उतरल्या होत्या. अचानक त्यांना मुंबईहून फोन आला. दुर्गाबाई काळजीत धावत पळत हॉटेलच्या रिसेप्शनला आल्या. तेव्हा त्यांना कळलं कि महाराष्ट्राचे अतिरिक्त सचिव श्री.नूंजण्डय्या हे फोनवर होते.

दुर्गाबाईंना फोनवर कळालं की त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. आपल्या आयुष्यभराच्या साहित्यसेवेचा आपल्या देशाकडून सन्मान केला जातोय हि त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती. पण दुर्गाबाई म्हणाल्या,

“आणीबाणी आणणाऱ्या या सरकारला माझा विरोध आहे. त्यामुळे त्यांचा कुठलाही सन्मान मला घ्यायचा नाही.”

नूंजण्डय्या यांना धक्का बसला. त्याकाळी पद्मश्री सारखा पुरस्कार  करते हि मोठी गोष्ट होती. त्यांनी सॉरी म्हणत फोन ठेवला. दुर्गाबाई भागवत यांच्या शेजारी स्वामीकार रणजित देसाई बसले होते. त्यांचा चेहरा चिंताक्रांत झाला. भागवत यांना ते म्हणाले,

“बाई तुमच्यामुळे माझी पण पद्मश्री जाईल.”

तेव्हा दुर्गाबाईंनी सविस्तरपणे आपण पुरस्कार का नाकारतोय हे पत्र लिहून कळवलं. पुढेही त्या आणीबाणीचा विरोध करतच राहिल्या.  त्यासाठी त्यांना तुरुंगात टाकले गेले पण दुर्गाबाई कधीच मागे ह्टल्या नाहीत. मृणाल गोरे, प्रमिला दंडवतेंसारख्या राजकीय नेत्या, कार्यकर्त्यांप्रमाणेच चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या, खुनी गुन्हेगार बायका, वेश्या गुन्हेगार यांच्यामध्येदेखील बाई जेलमध्ये रमल्या.

आणीबाणी उठल्यावर त्यांची सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यावर  इंदिरा गांधींचे अन्यायी सरकार पडावे म्हणून जनता पक्षाच्या निवडणुकीतही प्रचारात भाग घेतला. त्यांनी व पुलं देशपांडे यांनी अनेक ठिकाणी प्रचार केला. कोल्हापूर सारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या प्रचारसभेला अफाट गर्दी झाली. जनता पक्षाचे कित्येक उमेदवार त्यांनी निवडून आणले.

दुर्गा म्हणवल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींचा १९७७ साली पराभव झाला याला महाराष्ट्राच्या या दुर्गा देखील काही अंशी कारणीभूत ठरल्या.

जनता सरकार आल्यावर मात्र कोणतेही पद स्वीकारले नाही. आणीबाणी ची इतिकर्तव्यता झाली असं म्हणत हळूहळू त्या राजकारणातून बाजूला झाल्या. दुर्गाबाई भागवत हे वादळ इंदिरा गांधींच्या काँग्रेसला महाराष्ट्रात झेपले नाही हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.