अनुराग कश्यपला सांगितलं, “रहमानला खरी फाईट देणारा संगीतकार बॉलिवूडला मिळालाय..”

सध्याच्या एखाद्या तरुणाला जर विचारलं कि भावा तुला आवडणारा म्युझिक डिरेक्टर कोणता ? तर तो सहज सांगतो. ए आर रेहमान, अजय अतुल, प्रीतम,अमित त्रिवेदी, विशाल शेखर यांपैकी दोन तीन नाव तर त्याच्या लिस्ट मध्ये फिक्स असतात.

गाणी लिहिण्यात आणि गाण्यात अमीत त्रिवेदी हे नाव सध्याच्या तरुणाईला परिचित आहे. मागच्या दशकभरात त्याने तरुणाईच्या मनावर राज्य केलंय. त्याची गाणी नाचायला लावतात, कधी काळजाला भिडतात. प्रत्येक चित्रपटातील त्याचं वैविध्यपूर्ण संगीत हि त्याची खासियत. केदारनाथ, काय पो चे, लुटेरा, देव डी, उडता पंजाब, डिअर जिंदगी,क्वीन अशा अनेक म्युझिकल  चित्रपटांचा म्युझिक दिग्दर्शक अमित त्रिवेदी.

मुंबईत जन्मलेला अमित त्रिवेदी एका गुजराती कुटुंबातुन येतो. लहानपणापासून संगीताचं भयानक वेड होत. गुजराती भक्तिगीते,भजन तो मन लावून ऐकायचा. पुढे कॉलेज काळात तो स्वतःच गाणी बनवू लागला. पुढे त्याने ओम नावाचा बँड जॉईन केला आणि या बँड बरोबर तो लोकल शो करू लागला.

हळूहळू तो गुजराती नाटकांना सुद्धा संगीत देऊ लागला. मराठी टेलिव्हिजन सिरियलला, लाईव्ह इव्हेन्टला तो बॅकग्राउंड म्युझिक देऊ लागला. मराठी गायक अभिजित सावंत सोबत त्याने जुनून नावाचा अल्बम केला. त्याचा हा सांगीतिक प्रवास चालूच होता.

त्याचा चित्रपट क्षेत्रात येण्याचा किस्सा भारीये.

गायिका शिल्पा राव अमित त्रिवेदी आणि अनुराग कश्यप या दोघांनाही ओळखत होती. एकदा एका मुंबईच्या फिल्म फेस्टिव्हल मध्ये अनुराग कश्यप शिल्पा रावला भेटला आणि तिला सांगितलं कि माझ्या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शकाची गरज आहे, तेव्हा तिने अनुराग कश्यप पुढे चटकन अमित त्रिवेदीचं नाव सुचवलं. तिने दोघांची गाठ घालून दिली.

अमित त्रिवेदी हा ए आर रहमानला फाईट देण्याची क्षमता असणारा संगीतकार आहे असं तिनं अनुरागला सांगितलं.

अनुराग कश्यप आणि अमित त्रिवेदी पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हा अनुराग कश्यप हे देव डी या चित्रपटावर काम करत होते. त्यांनी अमित त्रिवेदीला सांगितलं कि,काहीतरी हटके म्युझिक बनव , तुझ्या जॉनरचं काहीतरी भारी बनव. अमितने होकार दिला आणि कामी सुरु केलं.

तब्बल सहा महिने अमित त्रिवेदी देव डी चित्रपटाच्या गाण्यांवर काम करत होता. या दरम्यान त्याने अनुराग कश्यपला एकदाही फोन केला नाही. ज्यावेळी काम झालं त्यावेळी त्याने अनुराग कश्यप याना बोलवून घेतलं. सहा गाणी त्याने बनवून ठेवली होती तीही वेगवेगळ्या ढंगाची. अनुराग कश्यपला गाणी ऐकवण्यासाठी तो नर्व्हस होता, पहिलं गाणं लावलं आणि अनुराग कश्यप खुश झाले तेव्हा त्याने सगळी गाणी ऐकवली आणि अनुरागने हि सगळी गाणी चित्रपटात वापरण्याचा निर्णय घेतला.

पण या चित्रपटाचं काम काही कारणाने अडकून पडलं. पण अनुरागने त्याला निराश न करता त्याचा दिग्दर्शक मित्र राजकुमार गुप्ताला अमितच नाव म्युझिक दिग्दर्शक म्हणून सुचवलं, हा मुलगा हुशार आहे , संगीताची जाण आहे . आमिर नावाचा चित्रपट अमित त्रिवेदीचा पदार्पण म्हणून ठरला. चित्रपट चालला नाही पण यातल्या संगीताचं समीक्षकांनी फार कौतुक केलं.

यानिमित्ताने अमित त्रिवेदीची गाडी बॉलिवूडमध्ये सुसाट सुटली. यावेळी त्याच्या कॉलेजच्या बँडमध्ये तो म्युझिक अरेंजर म्हणून होता , आणि याच ग्रुपमध्ये अमिताभ भट्टाचार्यदेखील होता. तो या बँडमध्ये गीतकार होता पण त्याला गायक व्हायचं होतं. अमितची आणि त्याची ओळख जुनी होती.

देव डी चित्रपट करत असताना त्यांना गीतकारांचे गरज होती तेव्हा अमित त्रिवेदीने अमिताभ भट्टाचार्यला गाणी लिहिण्याची विनंती केली. गायक बनण्याच्या हेतूने अमिताभ भट्टाचार्य गाणी लिहायचा मात्र त्याच क्रेडिट तो घ्यायचा नाही. गाणी त्याने लिहून दिली.

देव डी या चित्रपटात एकूण १५ गाणी होती आणि तीही वेगवेगळ्या प्रकारची. आणि या चित्रपटासाठी अमित त्रिवेदीला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा नॅशनल अवॉर्ड मिळाला.

अमित त्रिवेदीचं इमोशनल अत्याचार हे गाणं मात्र प्रचंड लोकप्रिय झालं. अनुराग कश्यपला यातली गाणी इतकी आवडली होती कि तो गाण्यांनुसार चित्रपटाची स्क्रिप्ट बदलायचा, त्यामुळे देव डी एक उत्कृष्ट म्युझिक अल्बम म्हणून ओळखला जाऊ लागला.

परदेसी हे गाणं अनुराग कश्यपला प्रचंड आवडलं होत मात्र एक ओळ त्याला खटकत होती ती ओळ होती इब के होवेगा अत्याचार, त्याने विचार केला कि अमिताभ भट्टाचार्यला सांगून हि ओळ बदलून घेऊ पण इतक्यात त्याच्या मनात ओम दर ब दर चं एक गाणं आलं आणि त्यातला इमोशनल शब्द त्यांनी वापरला. मग त्याने अमित त्रिवेदीला इमोशनल आणि अत्याचार या दोन शब्दांवरून गाणं बनवायला सांगितलं.

अमित त्रिवेदी संभ्रमात होता कि अनुरागला कस गाणं हवंय , अमिताभ भट्टाचार्याने गाणं लिहिलं आणि दोघांनीच ते रफ गायलं. अनुराग कश्यपला ऐकवलं, अनुरागला गाणं आवडलं तो खुश झाला. तेव्हा अमितने विचारलं हे गाणं कोणाकडून गाऊन घ्यावं असं तुम्हाला वाटतं, त्यावर अनुराग म्हणाला हेच गाणं असच्या असं मी चित्रपटात घेतोय. आता जरी सध्या आपल्याला या गाण्याचे गायक रंगीला आणि रसिला म्हणून दिसत असले तरी ते दोघे हेच आहेत.

अमित त्रिवेदीची जमेची बाजू हीच आहे कि त्याची गाणी आपल्या कानावर अत्याचार करत नाही तर ती हवीहवीशी वाटतात.

खुद्द रहमानने देखील त्याची पाठ थोपटली आहे आणि हिंदी सिनेमामध्ये मला अमितची गाणी ऐकायला आवडतात असं तो आवर्जून सांगत असतो. आज रहमान एक लिजण्ड बनला आहे, तर अमित त्रिवेदी अजून आपले स्थान पक्के करतोय पण रहमानचा वारसदार ही मिळालेली उपाधी त्याच्यासाठी एखाद्या ऑस्कर अवॉर्डपेक्षा कमी नाही.

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.