गांधीजींच्या या शब्दांनी पाकिस्तानी गांधींना रडू कोसळलं होतं….!!!

‘फाळणी’ ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या इतिहासातील सर्वात कटू आठवणीपैकी एक असणारी घटना. बॅरीस्टर मोहम्मद अली जिन्ना ज्यावेळी मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत होते, त्याचवेळी एक मुस्लीम नेता ठामपणे फाळणीच्या विरोधात उभा होता. हा नेता म्हणजे महात्मा गांधींचे अनुयायी खान अब्दुल गफार खान होय. ते ‘सरहद गांधी’ या नावाने देखील ओळखले जात असत.

कोण होते सरहद गांधी..? 

‘सरहद गांधी’ हे कट्टर गांधीवादी नेते होते आणि हिंदू-मुस्लीम एकतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी कायमच मुस्लीम लीग आणि जिन्नांच्या स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राच्या मागणीचा प्रखर विरोध केला पण शेवटी जेव्हा देशाची फाळणी होणार हे निश्चित झालं त्यावेळी त्यांना नाईलाजाने फाळणीचा स्वीकार करावा लागला.

खान अब्दुल गफार खान हे पख्तून प्रांतातील पठाणांचे नेते होते. फाळणीनंतर ते पाकिस्तानात राहायला जाऊ इच्छित नव्हते. त्यांच्यासह पठाणांना भारतातच राहायचं होतं. आपली ही मागणी घेऊन सरहद गांधी आपले नेते महात्मा गांधी यांना भेटायला गेले. पख्तून प्रांतातील पठानांसह भारतातच राहण्याची आपली इच्छा त्यांनी गांधीजींकडे बोलून दाखवली. परंतु त्यावर गांधीजी त्यांना म्हणाले की,

“बादशाह खान, आता भारतभूमीचा मोह सोडा आणि आपला देश पाकिस्तानची सेवा करा.”

गांधीजींच्या या शब्दांनी खान अब्दुल गफार खान यांना धक्काच बसला. प्रचंड नैराश्य आलं. डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या. शेवटी नाईलाजानेच गांधीजींचा सल्ला मानत ते पाकिस्तानात परतले.

सरहद गांधी आणि महात्मा गांधी

सरहद गांधी पाकिस्तानात परतले पण पाकिस्तानमधील त्याचं आयुष्य फार क्लेशदायक राहिलं. पाकिस्तानमध्ये कायमच त्यांच्याकडे शंकेने बघितलं गेलं. अनेक वर्षे तर त्यांना तुरुंगवासात घालवावी लागली. १९६९ साली महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून सरहद गांधी आपल्या इलाजासाठी भारतात आले. स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण या महान नेत्याला घेण्यासाठी विमानतळावर गेले.

खरं तर त्यावेळी फाळणी होऊन जवळपास २ दशकांचा कालावधी लोटला होता. पण तरी देखील फाळणीने सरहद गांधींच्या मनावर झालेला घाव भरून निघाला नव्हता, याची प्रचीती याचवेळी इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण या दोघांनाही आली.

प्रसंग असा की, खान साहेबांच्या हातात कायम एक पिशवी असायची. या पिशवीत फक्त त्यांचा पठाणी कुर्ता आणि काही अत्यावश्यक वस्तू असायच्या. इंदिरा गांधी ज्यावेळी खान साहेबांना घ्यायला आल्या त्यावेळी विमानतळावर उतरल्यावर इंदिरा गांधींनी खान साहेबांच्या सन्मानार्थ ती पिशवी घेण्यासाठी हात पुढे केला आणि पिशवी आपल्याकडे देण्याची विनंती त्यांना केली. त्यावर खान साहेबांनी उत्तर दिलं,

“एवढी पिशवीच तर उरली आहे, ती पण घेणार का..?”

खान साहेबांच्या या उत्तरावर इंदिरा गांधी निशब्द झाल्या. सोबतच्या जयप्रकाश नारायण यांना तर रडूच कोसळलं. या शब्दातून खान साहेबांनी आपली वेदना बोलून दाखवली होती. पण इंदिरा गांधी काय किंवा जयप्रकाश नारायण काय दोघेही हतबल होते. परिस्थितीसमोर कुणाचाच काही इलाज नव्हता.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.