सम्राट समुद्रगुप्ताने सोन्याची नाणी पाडली अन् भारतात सुवर्णयुगाची सुरुवात झाली

भारताला सोने की चिडिया म्हटलं जात होतं हे सगळ्यांना माहित आहे. एकेकाळी भारतातील लोक जगात सगळ्यात संपन्न होते. भारतातील लोकांकडे संपन्नता होती, पण ही सोनेरी संपन्नता एका सम्राटाने खऱ्या अर्थाने सोन्याच्या नाण्यांमधून प्रचलनात आणली होती.

भारतात हे सुवर्णयुग आणणाऱ्या राजाचं नाव होतं सम्राट समुद्रगुप्त…. 

गुप्ता साम्राज्यातले दुसरे सम्राट समुद्रगुप्त केवळ इतर राजांचा पाडाव करून स्वतःच्या राज्याचा विस्तार करण्याइतकेच मर्यादित राहिले नाहीत. तर त्यांनी स्वतःच्या साम्राज्यातील लोकांची संपन्नता वाढवण्यासाठी प्रयत्न केले. याचाच परिणाम त्यांच्या नाण्यांवर सुद्धा झाला. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या सोन्याच्या नाण्यांचं चलन सुरु केलं आणि भारतात खऱ्या अर्थाने सोन्याचा धूर निघायला लागला होता.

समुद्रगुप्तांनी स्वतःच्या काळात एकूण ७ प्रकारचे सोन्याचे नाणे चलनात आणले होते.

समुद्रगुप्तांना भारतात चलन व्यवस्थेत मोठे बदल घडवणारा राजा असे संबोधले जाते. त्यांनि तांब, चांदी आणि सोन्याचे नाणे प्रचालनात आणले होते. त्यात आर्चर, अश्वमेघ, राजा-राणी, बॅकल एक्स, टायगर स्लेयर आणि लायरिस्ट या सुवर्ण नाण्यांचा समावेश होता. 

एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी प्रचालनात आणणाऱ्या समुद्रगुप्ताने एकही युद्ध हरलं नव्हतं. त्यामुळे ब्रिटिश  इतिहासतज्ज्ञ वि. ए. स्मिथ यांनी समुद्रगुप्तांची तुलना युरोपमधील नेपोलियन बोनापार्ट याच्याशी केली होती.

कारण समुद्रगुप्ताने बिहारच्या पाटलीपुत्र शहरापासून पासून सुरु झालेलं त्याचं राज्य पूर्व, मध्य, उत्तर आणि दक्षिण भारतापर्यंत वाढवलेलं होतं.

भारतात इसवी सन पूर्व ३२२ मध्ये उदयाला आलेल्या मौर्य साम्राज्याचं इसवी सन पूर्व १८४ च्या आसपास पतन झालं. मौर्यांच्या पतनानंतर लहानमोठ्या राज्यांचा भारत उदय झाला. पण मौर्यांच्या साम्राज्याइतका विस्तार करू शकेल अशी ताकद कोणत्याच राज्यात नव्हती. तेव्हा इसवी सन चौथ्या शतकात चंद्रगुप्त प्रथम यांनी गुप्त साम्राज्याची पायाभरणी केली.

जाणकार सांगतात की, “गुप्त घराणे हे पूर्वी बिहारमधील मोठे जमीनदार होते. हळूहळू त्यांनी मौर्य साम्राज्याची जुनी राजधानी मगधवर वर्चस्व वाढवायला सुरुवात केली. त्यातच चंद्रगुप्त प्रथम यांनी इसवी सन ३१९-२० मध्ये गुप्त घराण्याची सत्ता स्थापन केली.”

स्वतःचं वर्चस्व वाढवण्यासाठी चंद्रगुप्ताने लिच्छवी साम्राज्याची राजकुमारी कुमारदेवी बरोबर विवाह केला. लिच्छवी साम्राज्याचा जावई असल्यामुळे चंद्रगुप्ताची सत्ता आणखी प्रबळ झाली होती.

चंद्रगुप्त प्रथम यांनी साम्राज्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्याचं हे स्वप्न सत्यात उतरवलं ते त्याचा मुलगा समुद्रगुप्ताने.

युद्ध, अर्थ, प्रशासन या सर्व गोष्टींचं ज्ञान असलेल्या समुद्रगुप्ताला त्याच्या वडिलाने इसवी सन ३३५ मध्ये गुप्त साम्राज्याचा सम्राट घोषित केलं. वडिलांचा हा निर्णय समुद्रगुप्ताच्या भावांना पटलेला नव्हता. त्यामुले सगळ्यांनी मिळून समुद्रगुप्तविरुद्ध युद्ध सुरु केलं. पण समुद्रगुप्ताने स्वतःच्या भावांना पराभूत केलं आणि पाटलीपुत्र राज्याच्या राजा झाला.

सत्ता हातात आल्यानंतर समुद्रगुप्ताने स्वतःचं राज्य मौर्यांप्रमाणेच भारतभर पसरवण्यास सुरुवात केली. त्याने उत्तरेला अगदी हिमालयापर्यंत असलेल्या राज्यांना जिंकून घेतलं. उत्तरेला जिंकल्यानंतर त्याने दक्षिणेकडे मोर्चा वळवला. दक्षिणेतील नागवंशीय सरदार तसेच पश्चिमेकडचे राज्य असा सर्व प्रदेश एकतर त्याने जिंकून घेतला होता किंवा तिथले राजे त्याचे मांडलीक झाले होते.

समुद्रगुप्ताने भारतातील राज्यांसोबतच कुषाण, शक तसेच श्रीलंकेच्या राजांना सुद्धा कर देण्यास भाग पाडलं होतं. आजचे बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान या भागावर त्याच्या साम्राज्याचा विस्तार होता.  

समुद्रगुप्ताने मौर्यांप्रमाणे भारतातील मोठ्या भूभागावर सत्ता स्थापन करतांनाच राज्यात लोकांची आर्थिक समृद्धी वाढवण्यावर सुद्धा भर दिला होता.

समुद्रगुप्ताने सैन्याच्या मदतीने भारतभर रस्त्यांचे जाळे विणले. रस्त्यांवर सुरक्षेसाठी बंदोबस्त केले त्यामुळे भारताच्या एका भागातील माळ दुसऱ्या भागात सहजतेने पाठवला जाऊ शकत होता. त्यामुळे व्यापाराला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आणि लोकांच्या राहणीमानामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडून आली होती.

त्यांच्या जवळ चांगलं जेवण, चांगले कपडे, दागदागिने अशा चैनीच्या वस्तू तर होत्याच. सोबतच समाजातील तळागाळातील लोकांकडे सुद्धा चांगल्या वस्तू उपलब्ध होत्या. संशोधनात सापडलेली मातीची भांडी, तांबा आणि लोखंडी वस्तूंवरून असं कळतं की समाजातील गरीब वर्ग सुद्धा तुलनेने बराच संपन्न होता. 

लोकांच्या आर्थिक संपन्नतेसोबतच समुद्रगुप्ताने संगीत, नृत्य, कला यांना सुद्धा राजाश्रय दिला होता.

समुद्रगुप्ताचं संगीतावर विशेष प्रेम होतं. त्याने प्रचालनात आणलेल्या सोन्याच्या नाण्यांवर स्वतः समुद्रगुप्त वीणा वादन करत असल्याचं दाखवलंय. महान संस्कृत कवी आणि प्रयाग प्रशस्ती या लेखाचे लेखक हरिषेण हे सुद्धा समुद्राच्या दरबारात महत्वाचे मंत्री म्हणून काम करत होते.

गुप्त साम्राज्याच्या काळात हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मांच्या वस्तूंचे बांधकाम करण्यात आले होते. महाराष्ट्रातील अजिंठा, एलिफंटा या लेण्या, बिहारमधील नालंदा विद्यापीठ, सारनाथ, काशीमधील मुर्त्या, उत्तर भारतातील हिंदू मंदिरं ही गुप्त साम्राज्याच्या काळात बांधण्यात आली होती.

श्रीलंकेचा राजा मेघवर्मन या बौद्ध राजाला बोधगयामध्ये बुद्ध मंदिर बांधायचं होतं, त्यासाठी मेघवर्मनने समुद्रगुप्ताकडे विनंती केली होती. तेव्हा समुद्रगुप्ताने मेघवर्मनची मागणी मान्य केली आणि बौद्ध मंदिर बांधण्यात आलं. या गोष्टीला इतिहासात एक उत्तम उदाहरण म्हणून पाहिलं जातं.  

पण या सगळ्या संपन्नतेमध्ये समुद्रगुप्ताच्या त्याच्या सोन्याच्या नाण्यांमुळे सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळाली. कारण समुद्रगुप्तापूर्वी आणि त्याच्यानंतर इतर कोणत्या राजाने वेगवेगळ्या पद्धतीचे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याचे नाणे काढले नाहीत. असं इतिहासकार सांगतात.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.