मुख्यमंत्रीपद भूषविलेले राजकारणी, जे कधीकाळी इंजिनिअर होते !
भारतीय इंजिनिअर्स हे एक अद्भुत रसायन असतं.
इंजिनियरिंगच्या चार वर्षात (काही काही वेळा हा आकडा ८ पर्यंत ही जातो) माणूस भूतलावरचे जेवढे आगाध ज्ञान गोळा करतो त्याची तुलना कशाशीच होऊ शकणार नाही. या ज्ञानाचा कुठे प्रॅक्टिकल उपयोग करो अथवा न करो मात्र भाऊचं नॉलेज नो चँलेन्ज अशी कंडीशन असते. तर असं हा इंजिनियर शिक्षण संपवून जगाच्या मार्केटमध्ये उतरतो तेव्हा मात्र त्याला ‘दाल आटे का असली मोल’ समजायला लागतो.
अनेक ठिकाणी हात पाय मारून अनेक खस्ता खाऊन जेव्हा नोकरी मिळते तेव्हा सगळ्यांना वाटतं की भावाची गाडी रुळावर आली, पण भाऊ की लीला आगाध. एवढी घासून मिळवलेली डिग्री, त्याच्याहून जास्त घासून मिळवलेली नोकरी सोडून याला नाही नाही ते धंधे सुचू लागतात. नोकरी त्याला बोअरिंग वाटू लागते. पिक्चर बघून तो वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्यासाठी प्रेरणा घेतो.
‘रॉकेटसिंग’सारखं स्टार्टअप असो नाही तर ‘थ्री इडीयट्स’च्या माधवन सारखं वाईल्ड लाईफ फोटोग्राफी असो. नाही झालं तर गेला बाजार चेतन भगतच्या पायावर पाय ठेवून काही जन पुस्तक तरी लिहितातच. मोजके इंजिनियर क्रिकेट आणि फिल्म्समध्ये सुद्धा यशस्वी होतात.
मात्र यामध्ये खरं मानलं पाहिजे ते इंजिनियरिंग सोडून राजकारणात जाणाऱ्या महानुभावांना. इंजिनियर होताना राजकारण रक्तात शिरलेलं असतंच. मग अशा या ब्राईटेस्ट माइंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंजिनियर राजकारण्यांच्या वाट्याला सहसा कोणी जात नाही.
तर आजच्या ‘इंजिनीअर्स डे’च्या निमित्ताने जाणून घेऊयात अशाच काही बेरकी इंजिनीअर्सबद्दल जे फक्त राजकाणातच उतरले नाही तर इथेही आपलं कर्तृत्व गाजवत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत जाऊन पोहोचले.
१.मनोहर पर्रीकर
मनोहर पर्रीकर यांनी १९७८ साली भारतातल्या सर्वोत्तम म्हणून गणल्या जाणाऱ्या आयआयटी बॉम्बेमधून ‘मेटलर्जी’ या विषयातून इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देखील सक्रीय होते. पुढे संघाच्याच आदेशावरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पोर्तुगिजांचा वारसा लाभलेल्या गोव्यात त्यांनी भाजपला फक्त रुजवलेच नाही तर २००० ते २००५ आणि २०१२ ते २०१४ या काळात दोन वेळा ते गोव्याचे मुख्यमंत्री बनले.
२.नितीशकुमार
बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्यासमोर पट्टीच्या राजकारण्याला पुरून उरणारा गडी म्हणून नितिश कुमार यांना ओळखलं जातं. ते १९७२ सालचे ‘बिहार कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’चे इलेक्ट्रीकल इंजिनियर आहेत. शिक्षणानंतर त्यांनी ‘बिहार स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड’मध्ये नोकरी मिळवली मात्र आणीबाणीच्या वेळी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने त्यांना राजकारणाकडे आकर्षित केले.
समाजवादी राजकारणाचा धडा गिरवता गिरवता त्यांनी भल्या भल्यांना धूळ चारली आणि २००५ साली ते बिहारचा मुख्यमंत्री बनले. तेव्हा पासून बिहारमध्ये त्यांचंच राज्य आहे. अनेकदा आपला गट बदलून तर कधी आपल्याच माणसाला मुख्यमंत्री बनवून त्यांनी सत्ता टिकवून ठेवली आहे. आजही पंतप्रधानपदाच्या उमेदवारांचा संभाव्य उमेदवार म्हणून त्यांना पाहिलं जातं.
- भावी मुख्यमंत्री आमदारकीला एका मताने पडले, आणि हो त्यांच्या बायकोनं मतदान केलं नव्हतं !
- कोण होते एका दिवसाचे मुख्यमंत्री ?
- अमित शहांनी १५ वेळा फोन केला, त्यांनी उचलला नाही. नंतर माहिती झालं, उपमुख्यमंत्री करण्यासाठी फोन करत होते.
३.दिग्विजय सिंग
मध्यप्रदेशमध्ये ‘धूर्त दिग्गी राजा’ म्हणून ओळखले जाणारे दिग्विजय सिंग हे राजघराण्यातून येतात. इंदोरच्या ‘गोविंदराम सेकसारिया कॉलेज’मधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेले आहे.
नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदापासून त्यांनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला. वडिलांची जनसंघाची पार्श्वभूमी असूनही त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे १९९३ ते २००३ असे तब्बल १० वर्षे ते मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदीपदावर राहिले.
कायमच वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे दिग्गी राजा सध्या पक्ष श्रेष्टींच्या नाराजीमुळे राजकारणापासून दूर फेकले गेले आहेत. मात्र नर्मदा परीक्रमनेसारख्या अवघड तीर्थटनावरून परत आलेल्या दिग्विजयसिंग यांना येत्या मध्यप्रदेशच्या निवडणुकीत कमी लेखून चालणार नाही.
४.पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण यांचे आईवडील दोघेही खासदार आणि मंत्री असे मोठे पद भूषवलेले गांधी घराण्याच्या खास मर्जीतले राजकारणी. तरीही पृथ्वीराज चव्हाण यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषदेच्या मराठी शाळेत झालं.
१९६७ साली त्यांनी सुप्रसिद्ध ‘बिट्स पिलानी’मधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी पूर्ण केली. फक्त एवढेच नाही तर त्यांना युनेस्कोची स्कॉलरशिप मिळवून अमेरिकेतील कॅलीफोर्निया विद्यापीठातून एम.एस. पूर्ण केले. तिथे त्यांनी कॉम्प्युटर सायन्सवर रिसर्च पेपर प्रसिद्ध केला. अमेरिकेतच त्यांनी डिझाईन इंजीनीयर म्हणून नोकरी धरली. सबमरीनला लागणाऱ्या कॉम्प्युटर सिस्टीमवर त्यांनी काम केले.
राजकारणापासून अलिप्त असलेले पृथ्वीराज चव्हान पुढे राजीव गांधींच्या आग्रहाखातर राजकारणात आले. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात जबाबदारीची पदं सांभाळून त्यांनी पक्ष श्रेष्ठींचा विश्वास संपादन केला आणि २०१० साली त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाठविण्यात आले.
५. अरविंद केजरीवाल
आयआयटी खरगपूरमधून १९८९ साली मेकॅनिकल इंजिनियरिंग केले. पासआऊट झाल्या झाल्या ‘टाटा स्टील’मध्ये नोकरी पकडली. १९९२ साली नोकरीचा राजीनामा दिला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. सोबतच मदर तेरेसा यांचा मिशनरीज ऑफ चॅरीटी, रामकृष्ण मिशन अशा संघटनामधून समाजकार्य सुरु केले.
१९९५ साली अत्यंत अवघड अशी युपीएससीची परीक्षा पास होऊन आयआरएस पद मिळवले. मात्र चळवळ्या स्वभावामुळे तिथेही शांत न बसता अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात उडी घेतली. लोकपाल आंदोलनात प्रसिद्धीच्या झोतात आल्यावर २०१२ साली ‘आम आदमी पार्टी’ची स्थापना केली.
आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. या निवडणुकीत केजरीवाल यांनी १५ वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान असलेल्या शीला दीक्षित यांचा पराभव केला. आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या समर्थनाने दिल्लीत सरकार स्थापन केलं आणि केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.
हे ही वाच भिडू
- अब्दुल रहेमान अंतुले ठरले होते भारतातील शोध पत्रकारितेचे पहिले शिकार !
- पृथ्वीराज चव्हाणांची ती लकी रात्र !
- विलासराव देशमुख मुख्यमंत्री होण्याची भविष्यवाणी भैय्यु महाराजांनीच केली होती