भावानं चि. सौ. कां. शोधायला पार इंग्लंडमध्ये फ्लेक्स लावलेत

सध्या माहोल लग्नाचा आहे. कुठल्याही कट्ट्यावर बसा तुम्हाला तीन प्रकारचे कार्यकर्ते फिक्स सापडतात, एक- लग्न झालंय म्हणून टेन्शनमध्ये असणारे, दोन- आपल्या मोहब्बतचं लग्न झालंय म्हणून टेन्शनमध्ये असणारे आणि तीन- लग्न करायचंय पण पोरगा-पोरगी घावंना म्हणून टेन्शनमध्ये असलेले. हे तीन नंबरचे भिडू सगळ्यात जास्त सापडणार हे ही तितकंच खरं.

आमच्या भिडूत पण एक असलंच कार्यकर्ता आहे. भावाला पगारपाणी निवांत, घरची कंडिशन पण एकदम निवांत, जुनं लफडंही नाही… टेन्शन फक्त एकच लग्न होईना कारण पोरगी मिळत नाय. भावाची इंस्टाग्राम, फेसबुक, टिंडर सगळीकडे अकाऊंट्स आहेत. गडी दिवसातनं जितक्या वेळा व्हॉट्सअप बघत नाय, तितक्या वेळा शादी डॉट कॉम, मराठी मॅट्रिमोनी असल्या वेबसाईट्स उघडून बघतोय. विराट कोहली जसं टॉस जिंकत नाय, तसं या गड्याचा टाका ऑफिशिअली कुठंच भिडना झालाय.

त्याची अवस्था बघून आमच्याच एका कार्यकर्त्यानी त्याला सल्ला दिला, तू स्वतःच वेबसाईट का नाय खोलत? मग म्हणलं, असलं कांड कुणी केलंय का बघावं, तेवढाच भावाला रेफरन्स.

आम्ही अस्मिता बनून शोधायला लागलो आणि आम्हाला विषय सापडलाच. एक कार्यकर्ता आहे ज्यानं मला बायको शोधा म्हणणारी वेबसाईटच काढलीये. बरं, भाऊ एवढं करुन थांबला नाही, तर भावानं बर्मिंगहॅममध्ये फ्लेक्स पण लावलेत. त्या फ्लेक्सवर त्याचा पाय पसरुन बसलेला फोटो आहे, आणि बाजूला लिहिलंय…

Save me from an arranged marriage

findMALIKawife.com

या गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या भावाचं नाव आहे, मोहम्मद मलिक. गडी असतो लंडनमध्ये. त्याच्या जीवनात पोरी आल्या की नाही, हे आम्हाला माहीत नाही, पण मलिक शेठ लग्नाला लई उतावीळ आहेत हे नक्की.

त्याचे फ्लेक्स बघून आम्हाला वाटलं, शिवडे आय ॲम सॉरी, सहावीला पिंपरीत आलो असला काय तर स्टंट असेल. पण खाली वेबसाईट आहे म्हणल्यावर आम्ही तिकडं मोर्चा नेला.

वेबसाईटवर गेल्या गेल्या मलिकचा मोठा फोटो दिसतो. ज्यावर तो म्हणतो, की मला बायको शोधण्यात मदत करा आणि हा विनोद नाहीये. स्वतःचा बायोडाटा सांगणारा एक व्हिडीओही मलिकनं युट्युबला टाकलाय. खोटं वाटतंय? थांबा प्रूफ बघा.

 

 

मलिक सांगतोय की, माझं वय २९ आहे, मी लंडनला राहतो. मी आंत्रप्रेन्युअर आहे (बिझनेसमॅन शब्दाचं मार्केट कमी झालंय राव), मी फुडी आहे (खादाड म्हणायचं की बाबा) आणि मी धार्मिकही आहे. मला अशी मुलगी हवी आहे, जी तिच्या धार्मिक श्रद्धांवर काम करत असेल, तिचा वंश कुठलाही असला तरी चालेल.

मलिकला धार्मिक मुस्लिम मुलीशी लग्न करायचं आहे. हा भाऊ पंजाबी कुटुंबातला असल्यानं तिनं बडबड सहन करावी. माझ्या आई-वडिलांना मी एकुलता एक असल्यानं त्यांची काळजी मी घेईल, तुमचा यावर आक्षेप असेल तर आपलं काय जमू शकत नसतंय.

एवढं लिहून पण भाऊ थांबला नाही, त्यानं एक गुगल फॉर्म पण टाकलाय. ज्यात इच्छुक पोरी आपली माहिती भरु शकतील. थोडक्यात काय तयार भावानं फुल फिल्डिंग लावलीये, एवढं करुन त्याचं लग्न जमलं नाय, तर मात्र अवघड आहे.

तुमच्या ओळखीत कोण असलं इच्छुक भिडू असलं, तर त्याला ही आयडिया द्यायला विसरु नका. समजा ओळखीत कोण अटीत बसणारी पोरगी असली, तर तिला मलिकच्या वेबसाईटचा पत्ता द्या…

एकमेका सहाय्य करु, अवघे धरू सुपंथ

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.