चिडल्यानंतर आई-बहिण काढतात पण पुण्यात इंग्लडच्या राजपुत्राची तोंडावर आज्जी काढण्यात आली

इंग्लंडच्या राणीच्या पोराचा साखरपुडा बघायला टीव्हीसमोर बसणारी जनता भाबडी म्हणता येणार नाही. इतक्या वर्ष जगावर ज्यांची सतत होती त्यांचं कौतुक असलंच पाहिजे. पण सत्यशोधक समाजातील मंडळी याला दांडगा अपवाद होती.

त्यामुळंच भारतभेटीवर आलेला व्हिक्टोरिया राणीचा लाडका नातू १८८९ ला पुण्यात आला होता. तेव्हा जगभर त्याचं कौतुक होत होतं.

पण त्याच्या समोर त्याची आजी काढून त्याला बहुजनांच्या गुलामीची जाणीव करून दिली ती फक्त सत्यशोधक माणसांनी.

यातलं प्रमुख नाव होतं ते म्हणजे, कृष्णराव भालेकर.

भालेकर म्हणजे महात्मा फुल्यांच्या पहिल्या बिनीचे शिलेदार होते. दीनबंधू काढण्याची संकल्पना त्यांचीच. सत्यशोधकांनी महाराष्ट्रभर उभारलेल्या लढ्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. जिथं बहुजनांच्या हिताच्या गोष्टी नसतील तिथं ते थांबत नसत.

गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी २ एप्रिल १८७० रोजी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली होती. भारतातील पहिली सनदशीर मार्गाने चळवळ करणारी राजकीय संस्था. औंध संस्थानचे श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे संस्थेचे अध्यक्ष. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, ल. ब. भोपटकर, कृष्णाजी लक्ष्मण नूलकर अशी कित्येक मोठी मंडळी यात होती. कृष्णराव सुद्धा काही काळ या संस्थेचे घटक होते.

संतोष कदम यांनी आपल्या संशोधनात मांडल्याप्रमाणे या सभेचे नेते ब्राह्मण होते. मुंबई प्रांताचे सरकारी अधिकारी ली-वॉर्नर यांनी ही फक्त ‘जातीची सभा’ असल्याचं म्हटलं होतं. ब्राह्मणांनी सभा काबीज केल्याचा आरोप योग्य होता असं ते सांगतात. फक्त ‘कर कमी करा’ आणि सवलती द्या अशी मोठ्या वर्गाच्या मागण्या ही संघटना पुढे रेटत असे. या संस्थेच्या अध्यक्षपदी एका महिलेची नियुक्ती होण्यास १४६ वर्षे लागली.

या कारणामुळं कृष्णराव भालेकर या सभेतून बाहेर पडले. अनेक ब्राह्मणेतर नेते त्यांच्यासोबत बाहेर पडले. त्यांनी दीनबंधु सार्वजनिक सभा या स्वतंत्र संघटनेची स्थापना केली. त्यामार्फत भालेकर अनेक कार्ये करत असत.

या काळात प्रिन्स अल्बर्ट व्हिक्टर म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्स हा पुण्यात येणार होता. राजेपदाच्या जवळ जाऊन पोचलेला हा प्रिन्स पुढल्या काळात आपल्या बापाप्रमाणे भारताचा सम्राट होणार होता. पुण्यात ज्याच्या नावे KEM  दवाखाना आहे त्या सातव्या एडवर्डचा हा मुलगा.

त्यामुळे भारतात त्याचं जोरदार स्वागत झालं होतं. मजल दरमजल करत अनेक संस्थाने फिरत तो नोव्हेबरच्या १८८९ साली पुण्यात दाखल झाला.

या काळात जोतिबा फुले अंथरुणाला खिळले होते.

त्यावेळी सत्यशोधक समाजाकडून कुणीतरी राजपुत्राला भेटणे आणि आपल्या कार्याचा संदेश देणे गरजेचे होते. ही जबाबदारी कृष्णराव भालेकरांकडे आपोआपच चालून आली.

पुण्यात भरणाऱ्या मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये गरीब बहुजनांच्या मुद्द्याचं प्रमोशन करण्यात भालेकर पारंगत होते. कुठेही वरच्या वर्गाचा टुमटुमीत भपकेबाज कार्यक्रम असला की आपल्या मॅनेजमेंट स्किल्स वापरून भालेकर तो सगळं इव्हेंटच हायजॅक करत. तरतूदच अशी करून ठेवत की त्या जागी आपोआपच दीनदुबळ्या जनतेची दखल घेणे लोकांना भाग पडे.

ते आपले विचार सभेत आणि बंद खोलीत मांडायचे नाहीत. जुन्या काळात शनिवारवाड्यापुढे मोठा बाजार भरत असे. पुणे जिल्ह्यातून अनेक शेतकरी आणि गरीब जनता इथं येत असे. आपण आज ज्याला जुना बाजार म्हणतो तो हाच. नंतर तो मंगळवार पेठेत आला.

ते बाजारच्या दिवशी सरळ शनिवारवाड्यापुढे जाऊन उभे राहत आणि भाषणाला सुरुवात करत . कोणताही मंच, मंडप नसे. फ्लॅश मॉबचा हा बहुजन अवतार म्हणावा लागेल.

त्यांचे भाचे गणपतराव पाटील आणि इतर काही मंडळी त्यांच्यासोबत असत. १८७७ सालच्या दुष्काळावरचा पोवाडा सादर करत आणि शेतकऱ्यांना उपदेश देत. 

“हिंदू धर्मगुरूंची आणि त्यांच्या ग्रंथांची थोतांडे स्पष्टपणे सांगत फिरण्यात आयुष्य घालवावे यापलीकडे मला दुसरा उद्योग प्रिय वाटत नाही”

अशी त्यांच्या मनाची तळमळ त्यांनी १९०२ साली नोंदवून ठेवली आहे.

सत्यशोधक समाजाची लोकांना माहिती व्हावी म्हणून त्यांनी उत्स्फूर्तपणे सत्यशोधक समाजाचे निशाण भर पुण्यात उंटावरून फिरवले होते. याची माहिती मिळताच डॉ. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे आपली कामे बाजूला टाकून त्यांच्या मागोमाग मिरवणुकीत सामील झाले होते. 

यापूर्वी २ मार्च १८८८ रोजी कॅनॉटचा ड्यूक आणि डचेस पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनी फुल्यांना मेजवानीसाठी बोलवलं होते. चिपळूणकर आणि इतर नेते उंची पोशाखात इंग्रजी थाटाने सामील झाले होते.

गरीब शेकऱ्याची व्यथा दाखवण्यासाठी महात्मा फुले ड्यूकला भेटायला पागोटे, पंचा, साधा अंगरखा, घोंगडी-काठी आणि फाटक्या वहाणा घालून गेले होते. प्रचारतंत्रात सत्यशोधक अगदी निष्णात झाले होते.

या मुद्द्यावरून प्रेरणा घेऊन प्रिन्स अल्बर्ट व्हिक्टर म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागतात आपला हेतू साध्य करायचं भालेकरांनी ठरवलं.

भाट्याच्या धर्मशाळेजवळ दीनबंधू सार्वजनिक सभेने एक स्वागत समारंभ ठेवला. नुकत्याच गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या शाळेतील दीडशे विद्यार्थी राजपुत्राच्या स्वागतासाठी उभे केले होते.

वरती सुमारे आठ खण लांब असा तांबडा पडदा लावला होता. त्यात सुबकदार इंग्रजी वळणात त्याचे स्वागत करणारा मजकूर छापला होता.

ही घटना १२ नोव्हेंबर १८८९ मध्ये घडली होती.

INDIAN SPECTATOR या इंग्रजी वर्तमानपत्रात याची सविस्तर हकीकत छापून आली होती. याला त्यांनी ‘इंटरेस्टिंग इन्सिडंट’ म्हणून आपल्या बातमीत नोंदवलं आहे. मागास वर्गातल्या लोकांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या एका ‘दीनबंधू सार्वजनिक सभे’ च्या विद्यार्थ्यांनी हा फलक लावला होता.

सगळ्यांचे स्वागत स्वीकारत जात असताना राजपुत्राच्या नजरेस हा फलक पडला. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं:

Tell Grand Ma, We are a happy nation

But 19 Crores are without education

तुझ्या आजीला (राणीला) म्हणावं आम्ही सुखी राष्ट्र आहोत

फक्त आमच्यातील १९ कोटी लोक अजून अशिक्षित आहेत.

असा शालजोडीतला टोला कुणालाच अपेक्षित नव्हता. राजपुत्रापुढे फक्त निजामाची श्रीमंती. शिकार करण्यासाठीचे चित्ते, हत्तीवरची मिरवणूक अशाच गोष्टी आल्या होत्या.

देशातील ९५% जनता निरक्षर आहे हे सांगण्याची कुणाचीही तयारी नव्हती. ते काम कृष्णराव भालेकरांनी मार्मिकपणे केलं. इंग्लंडच्या राणीला इथला राज्यकारभार आणि दुर्व्यवस्था कळण्यासाठी तिचा नातूच भालेकरांना योग्य माध्यम वाटले.

लॉर्ड डफरीन काही दिवसांपूर्वीच आपल्या कोलकात्याच्या सभेत यातली दुसरी ओळ म्हणाला होता. भारतात शिक्षण घेतलेले लोक म्हणजे ‘दुर्बिणीने बघ्याइतकी छोटी अल्पसंख्यांक जनता’ आहे असं त्यानं काबुल केलं होतं. त्याचाच संदर्भ या विधानाला होता. सरकारने शिक्षणावर अधिक पैसे खर्च करावा ही मागणी सत्यशोधक समाज पूर्वीपासून करत आला होता.

हा बोर्ड पाहून प्रिन्स जागेवर थबकला. त्याने हा फलक गव्हर्नरला दाखवला असंही या बातमीत म्हटलं गेलं आहे. याचा सविस्तर वृत्तांत ‘अंबालहरी’ या पत्रातही छापून आला होता.

त्याच वर्षीच्या डिसेंबरमध्ये होणारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सभा भालेकरांनी याहून कल्पक पद्धतीने गाजवली. कधीतरी त्यावरही बोलूयात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.