इंग्लंडच्या राणीचा चहा भाजपला पश्चिम बंगाल मध्ये विजय मिळवून देणार ?
‘चहाला वेळ नसते, मात्र वेळेला चहा हा लागतोच’ असं अनेकांच्या तोंडून ऐकायला भेटत. मग सकाळी दिवसाची सुरुवात करताना असो, किंवा संध्याकाळी निवांत वेळी, चहा हा लागतोच. जो आपल्या दैनंदिन जीवनातला एक भाग आहे.
चहाचे वेगवेगळे प्रकार पण पाहायला मिळतात, जसं कि, ब्लॅक टी, लेमन टी, ग्रीन टी. आणि आजकाल तर गल्लोगल्ली चहाचे ब्रॅंड सुद्धा बनलेत.
आपल्या देशात तर चहाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतातील खाजगी उद्योगांत चहाचा उद्योग नंबर वनला आहे. तसचं भारतात रेल्वेच्या खालोखाल चहा उद्योगातील कामगारांची संख्या आहे. मात्र चहाप्रेमी केवळ भारतातच नाही तर विदेशात देखील आहे. ताग उद्योगानंतर चहाचा व्यवसाय भारताला सर्वांत अधिक परदेशी चलन मिळवून देतो. भारताला मिळणाऱ्या एकूण परदेशी चलनाच्या पंधरा टक्के चलन चहा उद्योगातून मिळते.
भारतात आसाम हे चहाची सर्वाधिक लागवड करणारे राज्य आहे. त्या खालोखाल पश्चिम बंगालचा नंबर लागतो.
खुद्द ब्रिटनची राणी, भारतीय चहाची दिवाणी
पश्चिम बंगालमधील दार्जीलिंग शहर चहासाठी विशेष प्रसिद्ध आहे. इथल्या चहाच्या पानाला युरोपमध्ये बरीच मागणी आहे. दार्जीलिंग ६ प्रकारची चहाची पाने पाहायला मिळतात. ज्यात ओलोंग, व्हाईट, दार्जीलिंग ब्लॅक टी, फस्ट फ्लश यासोबतच फ्लेवर आणि सीजनल सारखे प्रकार आहे. ज्याची जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते.
यात फस्ट फ्लश चहाच्या पानांचा आपला एक वेगळाच इतिहास आहे. ब्रिटनच्या महाराणीची ती विशेष पसंती.
१८४१ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतात होती, त्यावेळी ब्रिटेन या चहाच्या पानांचे उत्पादन चीनमधून करत असे. मात्र जेव्हा त्यांना दार्जीलिंगची खासियत, चहाच्या लागवडीसाठी तिथल्या हवामानाचा अंदाजा लागला. तेव्हा त्यांनी दार्जीलिंगमध्ये त्याचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. आणि तेव्हापासून ब्रिटेनमध्ये या चहाची निर्यात केली जाते.
या फस्ट फ्लशची पाने मुख्यतः फेब्रुवारीच्या शेवटला किंवा मार्चच्या सुरुवातीला काढली जातात. बाजारात त्याची किंमत काही साधीसुधी नाही. १ किलोमागे या चहाची पाने तब्बल ३०,००० ते ३५, ००० पर्यंत विकली जातात. यासोबतच ओलोंग प्रकारच्या चहाची पाने देखील प्रतिकिलो १५ ते २० हजार रुपयांपर्यंत विकली जातात.
दार्जीलिंग मधील चहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने इथल्या चहाला हजारोंच्याचं नोटा मोजाव्या लागतात. ही चहाची पाने चवीप्रमाणे आरोग्यासाठीही लाभदायक असतात. अँटी ऑक्सीडंट गुणधर्मानी समृद्ध असलेल्या या पानांत अँटी बॅक्टेरियल, अँटी कँन्सर, फॅट बर्नींंग गुणधर्म असतात. या कारणांमुळे देखील याची मोठ्या स्तरावर मागणी आहे.
चहा तर महाग मात्र मजुरी कवडीमोल
दार्जिलिंगमधला असाच एक चहा आहे, जो परदेशात किलोमागे सुमारे दोन लाख रुपयांना विकला जातो. तर भारतात हा खास चहा ९४ हजार रुपयांना विकला जातो. चहाचा व्यवसाय लागवड करणार्यांना किंवा कंपन्यांना बराच नफा मिळवून देतो, परंतु मजुरांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे.
केरळमधील चहा लागवड मजुरांना दिवसाला ३१० रुपये मिळतात. तर पश्चिम बंगालमध्ये हा दर २०२ रुपये आहे.
आधी तर या मजुरीचे केवळ १७६ रुपये मिळायचे. मात्र, नंतर ममता बॅनर्जी सरकारने यात किरकोळ वाढ करत दिवसाला २०२ रुपये मजुरी केली. राज्य सरकारने २०१४ पासून किमान वेतनाचे पुनर्मूल्यांकन केले नाही. यासाठी एक समिती स्थापन केली गेली होती, ज्यांनी २०१८ मध्ये आपला अहवाल सादर केला होता. मात्र या अहवालावर राज्य सरकारने मौन बाळगले. राज्य सरकार वेतनावर तणाव निर्माण करीत असल्याचा इथल्या कामगारांचा आरोप आहे.
भाजपने निवडणुकीत घेतला फायदा
सध्या पश्चिम बंगलाच्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. अश्या परिस्थितीत भाजप ममता सरकारला चहा कामगारांच्या मजुरीवरून गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतंय.
उत्तर बंगालमध्ये १३२ चहा लागवड कामगारांच्या उपासमारीचा भाजपने मुख्य मुद्दा बनविला. त्यांच्या किमान वेतनाचा प्रश्न हा निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा आहे.
संधी मिळाली तर २०२ रुपये असणारे किमान वेतन वाढवून ३५० रुपये निश्चित केले जाईल, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. १० एप्रिल रोजी नरेंद्र मोदींनी शिलगुडी येथील निवडणूक सभेत सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सरकार बनल्यास ३ टी हा नवीन फॉर्म्युला आणला जाईल. ३ टी अर्थात टी (चहा), टुरिझम (पर्यटन), टिंबर (लाकूड) यामुळे विकासाचा मार्ग तयार होईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
एकूणच ब्रिटनच्या राणीला लाखो रुपयांना विकला जाणारा चहा मजुरांसाठी मात्र काहीशे रुपये कमवून देतो या मुद्द्यावर अमित शहा आणि त्यांची टीम भर देत आहे. बघू आता यावर त्यांना मतदानाला किती फायदा होतोय ते..
हे ही वाच भिडू.
- चहा पिणे हे पाप समजलं जायचं त्या काळात त्यांनी महाराष्ट्राचा चहा ब्रँड बनवला..
- एलिझाबेथ आणि तिच्या राजघराण्याला इंग्लंडमध्ये उपरे असं का म्हटलं जातं ?
- तृणमूलमधून आलेल्या या ‘४’ जणांच्या विश्वासावर भाजप बंगाल जिंकण्याच्या प्रयत्नांत आहे…