स्टोक्स? धर्मसेना? की ICC ? ३ वर्ष झाली पण चूक कुणाची याची संगीतखुर्ची थांबली नाही

२०१९ चा जुलै महिना. १० जुलै २०१९ ला बंद झालेले भारतीय चाहत्यांचे टीव्ही क्रिकेट मॅचच्या वेळेस चालू होण्याचं नाव घेत नव्हते. कारण दोन दिवस चाललेल्या सेमीफायनलमध्ये भारतानं बेक्कार माती खाल्ली होती. धोनीचा तो रनआऊट आणि रोहित शर्माच्या डोळ्यातलं पाणी कुठला क्रिकेट फॅन विसरू शकणार..?

आपल्याला हरवून न्यूझीलंडनं फायनल गाठली आणि ऑस्ट्रेलियाला हरवून यजमान इंग्लंड फायनलमध्ये पोहोचलं.

आता साधारणपणे आपल्याला हरवलेल्या टीमला सपोर्ट करायचा नाही, असा कुठंच न लिहून ठेवलेला नियम आपल्या भारतात पाळला जातो. पण न्यूझीलंड मात्र याला अपवाद होतं, कित्येक भारतीय चाहते फायनलमध्ये किवींना सपोर्ट करत होते आणि कारण सिम्पल होतं. आपल्याला हरवल्यानंतरही त्यांनी माज दाखवला नव्हता.

फायनलचा दिवस आला १४ जुलै. स्थळ- क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं लॉर्ड्स. 

टॉस जिंकणाऱ्या न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या फुल तगड्या बॅटिंगमध्ये फक्त दोन कार्यकर्ते चालले, एक फिफ्टी मारणारा हेन्री निकोल्स आणि ४७ रन्स करणारा टॉम लॅथम वगळता सगळ्यांचाच कार्यक्रम गंडला. पण थोडे थोडे रन्स करत त्यांनी ५० ओव्हर्स खेळून काढल्या आणि बोर्डावर स्कोअर लागला २४१.

इंग्लंडची बॅटिंग लाईनअप आणि त्यांचा फॉर्म पाहता, त्यांच्यासाठी हे आव्हान किरकोळ होतं. पण त्यांची टॉप ऑर्डर जराशी गंडली आणि स्कोअर झाला ४ आऊट ८६ रन्स. न्यूझीलंडच्या चाहत्यांना आनंद व्हायला सुरुवात झालीच होती आणि तेवढ्यात बेन स्टोक्स आणि जोस बटलरनं ११० रन्सची खतरनाक पार्टनरशिप केली.

२३ व्या ओव्हरमधून ४५ व्या ओव्हरपर्यंत या दोघांनी मॅच खेचली. पुढच्या तीन ओव्हरमध्येही सनासना स्कोअर वाढला आणि इंग्लंडसमोर वर्ल्डकप जिंकण्यासाठी टार्गेट उरलं २४ बॉलमध्ये १२ रन्स.

४९ व्या ओव्हरमध्ये काय झालं..?

तिसऱ्याच बॉलवर लियाम प्लंकेटनं लॉंग ऑफला ट्रेंट बोल्टकडे सोपा कॅच दिला. त्याच्या पुढचा बॉल स्टोक्सनं हवेत भिरकावला, खाली बोल्ट उभा होता. त्यानं कॅच पकडला खरा पण पुढच्याच क्षणाला त्याचा पाय बाऊंड्री लाईनला लागला. वर्ल्डकप आणि नशीब अजून तरी इंग्लंडच्या बाजूनं होतं. पाचव्या बॉलवर सिंगल निघाली आणि सहाव्या बॉलवर आर्चर बोल्ड झाला.

मग आली वनडे क्रिकेटच्या इतिहासातली सगळ्यात खुंखार ओव्हर

१५ रन्स हवे असताना, पहिले दोन बॉल डॉट गेले. तिसऱ्या बॉलला मात्र स्टोक्सनं सिक्स हाणला, चौथ्या बॉलला स्टोक्स सिंगल पूर्ण करुन तो पुढच्या रनसाठी पळाला. गप्टीलनं थेट थ्रो केला आणि स्टम्प्सऐवजी बॉल स्टोक्सच्या बॅटला धडकला आणि थेट बाउंड्रीपार गेला.

अंपायर कुमार धर्मसेनानं सहा रन्सचा इशारा केला.

वर्ल्डकप फायनलमध्ये असलं काही होईल याचा कुणी विचारच केला नव्हता. पाचव्या बॉलवर सिंगल निघाली पण दुसरा रन पूर्ण होण्याआधीच आदिल रशीद रनआऊट झाला. लास्ट बॉलला स्टोक्सनं सिंगल पूर्ण केली पण यावेळी दुसरा रन पूर्ण करण्यात मार्क वूडला अपयश आलं आणि इंग्लंडची इनिंग २४१ वर संपली. वर्ल्डकप फायनल टाय झाली.

मग आली सुपर ओव्हर

इंग्लंडनं पहिली बॅटिंग करत १५ रन्स मारले, न्यूझीलंडला जिंकायला १६ रन्स हवे होते. जिमी निशमनं दुसऱ्याच बॉलला सिक्स हाणला, मात्र शेवटी गणित लागलं एक बॉल २ रन. गप्टिलनं बॉल मारला, सिंगल पूर्ण झाली पण डबल पूर्ण होण्याआधीच गप्टिल रनआऊट झाला. सुपर ओव्हरही टाय झाली.

आयसीसीच्या नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. बरोबरीत सुटलेली मॅच इंग्लंडनं नियमांच्या आधारे जिंकली.

पण या विजयावर चहूबाजूंनी टीका झाली, आजही कित्येक चाहते असे आहेत जे इंग्लंडला वर्ल्डकप विजेते मानायला तयार नाहीत. इंग्लंडच्या या (नियमांत बसणाऱ्या) अपघाती विजयासाठी तिघांचं नाव पुढं केलं जातं.

पहिला विषय येतो बेन स्टोक्सचा –

खरंतर स्टोक्सनं मुद्दाम बॅटमध्ये घातली नव्हती, बॉल चुकून बॅटला लागला आणि बाऊंड्री पार गेला आणि त्याचे चार रन इंग्लंडला मिळाले आणि याच ४ रन्समुळे मॅचचा निकाल पलटला. मॅच झाल्यानंतर स्टोक्सनं हे रन कमी करण्याबाबत अंपायर धर्मसेनाला विचारलं होतं, अशा बातम्याही चर्चेत आल्या होत्या. मात्र या सगळ्या अफवा असल्याचं खुद्द स्टोक्सनंच स्पष्ट केलं होतं. कित्येक जणांचं म्हणणं होतं, की स्टोक्सनं स्वतःहून या बोनस रन्ससाठी नकार द्यायला हवा होता. पण त्यानं तसं केलं नाही.

दुसरा विषय येतो अंपायर कुमार धर्मसेनाचा –

बॉल स्टोक्सच्या बॅटला लागून बाउंड्रीपार गेला तेव्हा धर्मसेनानं ६ रन्स दिले, २ स्टोक्स आणि आदिल रशीदनं पळून पूर्ण केलेले आणि ४ बाऊंड्रीचे. या ६ रन्समुळंच इंग्लंडला मॅच टाय करता आली. आता आयसीसीचे नियम बघितले, तर बॅटर्सनं एकमेकांना क्रॉस केल्यावरच तो रन पकडण्यात यावा असा स्पष्ट नियम आहे. त्यामुळं इंग्लंडला ५ च रन्स देण्यात यायला हवे होते आणि स्ट्राईकवर स्टोक्सऐवजी आदिल रशीद असायला हवा होता. 

मात्र धर्मसेनानं ६ रन्स दिले आणि मॅच फिरली. आता अंपायरही माणुसच असतात, त्यामुळं तेही चुकू शकतात. मात्र धर्मसेना इतक्या महत्त्वाच्या क्षणी चुकला की त्यामुळं सगळ्या स्पर्धेचाच निकाल बदलून गेला.

तिसरा विषय येतो आयसीसीचा –

मॅच टाय झाली की सुपरओव्हर घ्यायची हा आयसीसीचा नियम. मात्र जर सुपर ओव्हर टाय झाली तर? या प्रश्नाचं उत्तर शोधताना तेव्हा आयसीसीनं असा नियम बनवला की, मॅचमध्ये ज्या टीमनं सगळ्यात जास्त सिक्स आणि फोर मारले असतील, ती टीम जिंकणार आणि याच न्यायानं इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं.

नंतर या निर्णयावर इतकी टीका झाली की आयसीसीनं थेट नियमच बदलला, आता असा नियम बनवण्यात आलाय की, जोवर निकाल लागत नाही तोवर सुपर ओव्हर खेळवण्यात यावी.

आता हा नियम आधी बनवला असता, तर फायनलचा निकाल वेगळा लागला असता, जर स्टोक्सच्या बॅटला बॉल लागला नसता, तर चित्र वेगळं असतं आणि जर धर्मसेनानं ५ रन्स दिले असते तरीही. एक गोष्ट मात्र बदलली नसती, ती म्हणजे केन विल्यम्सनच्या चेहऱ्यावरचं हसू.

क्रिकेटमध्ये जर तर ला महत्त्व नसतं हेच खरं…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.