भिडू तू इनोचा वापर केक बनवण्यासाठी करतोयस पण त्याचा १५० वर्षांचा इतिहास खूप वेगळाय

भारताच्या लोकांनी लॉकडाउनच्या काळात लावलेल्या शोधापुढे जगातले सगळे शोध म्हणजे अतिसामान्य…! हा भिडू या शोधाचा तू सुद्धा साक्षीदार आहेस आणि निव्वळ साक्षीदारच नाही तर तू त्यात वाटेकरी सुद्धा आहेस. आता तुम्ही म्हणाल असा काय शोध लावला गड्या,  तर भिडू लॉकडाऊनमध्ये बेकऱ्या बंद असताना घरी केक बनवून खाल्ला का नाय ? तेही बिना बेकिंग सोडा, ओव्हन, विना अंड्याचा.

थोडक्यात असं सांगतो कि इनोचा केक खाल्ला का नाय ? आता दुकानचं बंद असल्याने आपण बेकिंग सोड्याऐवजी इनो वापरली तर कुठं बिघडलं ! म्हणजे बघ लॉकडाऊनमध्ये हे जोक तर तू वाचलेच असशील,

इनो कंपनीवाल्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल कि लॉकडाऊनमध्ये आपलं प्रॉडक्ट पोटाच्या गॅससाठी कमी अन केक बनवण्यासाठी जास्त विकलं जाईल. 

केक आणि ढोकळे बनवण्यासाठी इनो वापरली जाते हे तुला आता कळलं असेल तर कशाला सायन्सला ऍडमिशन घेतलं भावा

भावा एक काम सुरु करायचं होतं थोडे पैसे पाहिजे होते. भावा पैसे तर नाही पण इनो आहे जी सहा सेकंदात काम सुरु करील. 

लॉकडाउनच्या काळात अचानक इनोचं प्रोडक्शन वाढलं होतं, याला कारण काय ऍसिडिटी वैग्रे नव्हतं तर हे केक बनवण्याचा फंडा होता. म्हणजे आपल्या मित्रांच्या/मैत्रिणींच्या खासकरून नातेवाईकांच्या स्टेटसला तुम्हाला एक ओळ तर हमखास दिसली असेल DM FOR CAKE ORDER. इतकंच नाही भिडू या घरगुती बनवलेल्या केकच्या स्पर्धाही झाल्या होत्या. हे सगळं श्रेय जातं ते इनोला.

सुरवातीला आपल्याला इनो फक्त ऍसिडिटीसाठी वापरतात इतकंच माहिती होतं पण इनोचा वापर केक बनवण्यासाठी होतं हे लॉकडाऊनमध्ये कळलं.  पण इनो नक्की कशी तयार झाली ? कोणी सुरु केली याबद्दल आपण जाणून घेऊया. सहा सेकंदाचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इनोचा यशस्वी प्रवास. 

पचनाचे आजार हे सगळीकडे सारखेच आहेत. जास्त खाल्ल्याने किंवा पित्तामुळे जळजळ होणे आणि यावर घरगुती उपाय करणे यात काही नवीन नाही. पण सगळ्यात आधी या समस्येवर उपाय शोधला तो जे सी इनो या माणसाने. पुढे त्याने इनोचा इतका अफाट ब्रँड बनवला कि जगभरात ऍसिडिटी फक्त इनोचं थांबवू शकते अशी लोकांची धारणा झाली.

इंग्लंडमध्ये जेम्स क्रॉसली इनो हा एका औषधगृहात कामाला होता. तिथला एक डॉक्टर लोकांना सोडियम बायकाबरेनेट आणि सायट्रिक अ‍ॅसिड यांच्या वापरासह एक पाचक मिश्रण अपचनावर उपाय म्हणून देत असे. इनोने तो फॉर्म्युला शिकून घेतला आणि स्वतःच दुकान एका भागात सुरु केलं. त्यावर अजून थोडीफार त्याने प्रक्रिया केली. 

इनोने जिथं दुकान थाटलं होतं तो भाग बंदराचा होता. तिथे समुद्री व्यापारी आणि खलाशांची प्रचंड वर्दळ असायची. समुद्री खलाशी बंदरात उतरल्यावर नवनवीन पक्वान्न बघून ते त्यावर तुटून पडत. काय खावं किती खावं असे प्रश्न त्यांना पडत, पण यामुळे एक समस्या उभी राहिली ती अपचनाची आणि जळजळ होण्याची. अशा वेळी इनोने आपलं प्रोडक्ट विकायला सुरवात केली जे अगदी काही क्षणातच अपचनाची समस्या दूर करत असे.

खलाशी लोकांसाठी इनो वरदान ठरू लागलं आणि त्यांनी प्रवासात इनो राखायला सुरवात केली. यामुळे आपसूकच इनोचा प्रचार आणि प्रसार होत ते वेगवेगळ्या देशात जाऊन पोहचलं. इनोची जाहिरात हि साध्या औषधांसारखीच होती ज्यातून बरे होणारे आणि न बरे होणारे आजार सगळे क्लियर व्हायचे. इंग्लंडपासून सुरु झालेला हा प्रवास हळूहळू फ्रांस, कॅनडा, अमेरिका, जर्मनी,स्पेन अशा अनेक देशांमध्ये विस्तारला. 

इतर देशांच्या मानाने इनोची सगळ्यात मोठी बाजारपेठ भारतात आहे. मागील १५० वर्षांपासून इनो आणि भारताचे घनिष्ठ संबंध आहे. अनेकांच्या फ्रिजमध्ये इनो हमखास दिसते. पाण्यात टाकल्यावर येणारे बुडबडे आणि प्यायल्यावर येणारे ढेकर हे काहींसाठी समाधानाचे क्षण असतात. वेगवेगळ्या फ्लेव्हरमध्येसुद्धा सध्या इनो बाजारात उपलब्ध आहे.

१८५२ मध्ये इनो सुरु झाली आणि जगभर विस्तारली, भारताबरोबरच्या १५० वर्षांच्या काळात इनो केवळ ऍसिडिटी साठी वापरली गेली मात्र

मागच्या वर्षी लोकांनी केक आणि ढोकळे इनोपासून बनवायला सुरवात केली त्यामुळे बाजारपेठेत अचानक इनोची मागणी वाढली होती.

इनोचा एकच फायदा होता तो आपण मोडीत काढून त्याला केक आणि ढोकळे बनवण्यासाठी सुद्धा वापरला. लॉकडाऊन काळात केक बनवणे हाच एक छंद लोकांना लागला होता. इनो घाला, केक बनवा आणि ऑर्डर घ्या……

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.