त्याने तिहारचा जेल फोडून त्यावर सिगारेटचा वर्षाव केला होता, कशासाठी दोस्तीसाठी !

तिहार जेल !!!

भारतातला सगळ्यात मोठा जेल. राजधानी दिल्लीच्या मधोमध असणाऱ्या या तुरुंगात क्रूर अतिरेक्यांपासून ते हाय प्रोफाईल राजकारण्यांपर्यंत अनेक छोटे मोठे गुन्हेगार शिक्षा भोगत असतात. अतिशय कडक सुरक्षाव्यवस्था या जेलच्या सभोवताली आहे. असा तिहार जेल फोडण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. 

पण पहिल्यांदाच इथून पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या एका गुन्हेगाराची ही मज्जेशीर कहाणी ! 

त्याच नांव होत डॅनियल हेली वालकोट जुनिअर.

मुळचा अमेरिकेतल्या टेक्सासचा चलाख स्मगलर. त्याची एक छोटी विमान कंपनी होती “ट्रान्स अटलांटिक एअरवेज”. त्याच्याजवळ ५ विमाने होती. १९६२ साली त्याला एअर इंडियाशी दिल्ली, लाहोर, अफगाणिस्तान दरम्यान विमानाद्वारे मालवाहतूकिची परवानगी मिळाली. त्याचा दिल्लीत येणं जाणं वाढलं. 

अशाच त्याच्या एका दिल्ली दौऱ्यात विमानतळ पोलिसांनी त्याला स्मगलिंग केलेल्या दारुगोळा समवेत पकडले. त्याची दोन विमाने देखील ताब्यात घेतली. त्याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.  डॅनियलला १९६३ च्या जानेवारी मध्ये तिहार मध्ये हलवण्यात आले.

डॅनियलला लोकांच्यात मिसळायची खूप आवड होती. त्याने तिहार मध्ये मित्र बनवले. 

फक्त कैदीच नाही तर गार्ड्स मध्ये देखील तो फेमस झाला. त्याला तुरुंगात खास वागणूक मिळायची. जेल मध्ये सोबत्यांना तो अनेक किस्से सांगायचा. “इथून बाहेर पडल्यावर मी तुम्हाला चॉकलेट आणि कुकीज पाठवून देईन ” अस आश्वासन तो कैद्यांना द्यायचा. त्याकाळात भारतात या गोष्टींचे अप्रूप होते. आणि त्यातही सिगरेट जेल मध्ये मिळत नसल्याने तर त्याची ओढ जास्त होती. डॅनियलच्या गप्पा ऐकून कैद्यांचे डोळे चमकायचे. 

वापर नसल्याने गंजू नये म्हणून विमानाची देखभाल करण्यासाठी डॅनियल जेल मधून विमानतळावर जायचा. तशी विशेष परवानगी त्याने मिळवली होती. अशी त्याची बडदास्त होती. एक दिवस अचानक तो जेल मधून गायब झाला. 

अस म्हणतात की त्याच्या तुरूंगवास संपला असे सांगून तो राजरोस पणे ताठ मानेन तिहारच्या दरवाजातून बाहेर पडला होता. त्याने तिथून टॅक्सी पकडली आणि पहिला तो कनॉट सर्कसला पोहचला. तिथे त्याने खूप सारे चॉकलेट, सिगरेट आणि बिस्किट्स खरेदी केली. तिथून तो सफदरजंग विमानतळावर पोहचला. 

Screen Shot 2018 08 31 at 8.44.49 PM
twitter

या आधीच्या भेटीत विमानाची रखवाली करणाऱ्या कॉन्स्टेबलशी डॅनियलची खास दोस्ती झाली होती. त्यालाही आपली सुटका झाली आणि आपण परत अमेरिकेला जातोय अशी थाप मारली. भोळ्या कॉन्स्टेबलने फिरंगी साहबवर विश्वास ठेवला. 

डॅनियल आपल्या दोन विमानापैकी लाडके पायपर अपाची या छोट्या विमानावर स्वार झाला. विमान रनवे वर आणून लगेचच त्याने आकाशात झेप घेतली. एअरपोर्ट कंट्रोल रूमला कळेना की परवानगी शिवाय कोणत्या विमानाने उडाण केले. सगळीकडे खळबळ उडाली. विमान तिहार जेलच्या दिशेने गेले.

तिहार जेलच्या आकाशातून चॉकलेट ,सिगरेट आणि कुकीजचा वर्षाव कैद्यांवर झाला. कैद्यांना कळाले विमानात डॅनियल आहे आणि त्याने आपला शब्द खरा केलाय.

विमानाने दिशा बदलली आणि ते पश्चिमेला पाकिस्तानला निघाले. ही घटना एवढ्या फास्ट घडली की कंट्रोल रूम ला झाला प्रकार लक्षात यायलाच वेळ झाला. तब्बल तासाभराने एअरफोर्स ची विमाने त्याच्या मागावर निघाली.

डॅनियल ने विमान ३००० फुट इतक्या कमी उंचीवर उडवले त्यामुळे तो रडारच्या टप्प्यात सापडला नाही. तो एअरफोर्स च्या विमानाना गुंगारा देऊन पाकिस्तान हद्दीत शिरला. पुढे कराची विमानतळावर त्याने विमान उतरवले.

नाही एवढ्यात त्याची स्टोरी संपत नाही. 

लोकसभेपर्यंत त्याच्या पलायनाची चर्चा झाली. सरकारने स्पष्टीकरण दिले की त्याची खरोखर जामिनावर सुटका झाली होती मात्र त्याचे विमान त्याच्या ताब्यात दिले नव्हते. तरीही तो विमान घेऊन पसार झाला. भारतीयांचा गलथानपणा डॅनियलच्या पथ्यावर पडला. 

पण म्हणतात ना ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. डॅनियलने सेम तेच केले. तो परत दोन वर्षानी १९६५ साली भारतात आला. यावेळी तो श्रीलंकेतून स्मगलिंगचा माल घेऊन मद्रासला उतरला. त्याच्या आणि त्याच्या साथीदाराजवळ इंग्लंड चा खोटा पासपोर्ट होता. यावेळी त्याला १० वर्षाची शिक्षा झाली. ती त्याने पूर्ण केली. पुढे खूप वर्षांनी २००१ साली अमेरिकेच्या लॉस एंजिलीस मध्ये ड्रग स्मगलिंग करताना त्याचं खून झाला.

 

हे ही वाच भिडू –

Leave A Reply

Your email address will not be published.