ऑलिम्पिकमध्ये महिला खेळाडूंनी बिकिनी विरूद्ध बंड पुकारलं आहे.

नॉर्वेच्या महिला बीच व्हॉलीबॉल संघाच्या समर्थनार्थ, अमेरिकेच्या सिंगर पिंकने एक ट्वीट केलेय.  त्यात तिने असं म्हंटलय कि, “दंड हा नॉर्वे च्या टीमवर नाही तर युरोपियन हँडबॉल फेडरेशनवर लावला पाहिजे, त्याच्या लैंगिकतेच्या मानसिकतेवर हा दंड लावला पाहिजे, पण तरीही युरोपियन हँडबॉल फेडरेशनला दंड लावला तर मग इतरही क्रीडा महासंघांना दंड लावायला पाहिजे”

हा वाद इथेच संपला नाही तर,  मागच्या रविवारी टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता सामन्यात जर्मनच्या  महिला जिम्नॅस्ट्सने अंगभर असलेला बॉडी सूट परिधान करून सामन्यात उतरत बिकिनीसारख्या कपड्यांविरोधात आपला निषेध व्यक्त केला.

परंतु महिलांविरुद्ध भेदभाव आणि खेळांच्या गणवेशावर महिलांनी आक्षेप घेतलेली अनेक उदाहरणे आहेत. मात्र प्रथमच नॉर्वे आणि जर्मनीच्या महिलांनी प्रत्यक्षात त्या विरोधात बंड केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

खेळांमध्ये ड्रेसच्या नावाखाली चालणाऱ्या लैंगिकतेच्या  विरोधात, नॉर्वेच्या महिला बीच व्हॉलीबॉल संघाने अलीकडेच बिकिनी बॉटम ड्रेस कोडऐवजी पुरुषांप्रमाणेच शॉर्ट्स घालून एक सामना खेळलाय. थोडक्यात बिकिनीपेक्षा थोडा अजून जास्त शरीर झाकणारा युनिफॉर्म घालून, हा नॉर्वेजियन महिला संघ युरोपियन हँडबॉल बीच चॅम्पियनशिप सामना खेळला.

मात्र युरोपियन हँडबॉल महासंघाने, नॉर्वेजियन संघाला ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याबद्दल  $ १५०० दंड ठोठावला आहे. 

आता या महिला संघाच्या समर्थनार्थ अनेक लोकं सरसावले आहेत, त्यांनी या महिलांनी काहीही चुकीचे केले नाही आणि त्यांच्यावर लावण्यात आलेला दंड ते भरतीलही मात्र त्यांचा स्टॅंड मात्र चुकला नाही. तसंच नॉर्वेच्या व्हॉलीबॉल महासंघाने आपल्या संघाला पाठिंबा दिला आहे आणि दंड भरण्याची तयारी हि दाखवली आहे.

बीच व्हॉलीबॉल मध्ये ड्रेस कोड काय आहे?

या गेममध्ये महिलांना स्पोर्ट्स ब्रा आणि बिकिनी बॉटम घालावे लागतात. बिकिनी बॉटम देखील स्वतःच्या पसंतीचा नसतात तर युरोपियन हँडबॉल फेडरेशनने ठरवल्याप्रमाणेच असतात.

दुसरीकडे पुरुष व्हॉलीबॉल खेळाडू, शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्ये खेळतात. एकाच खेळासाठी महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी वेगवेगळे ड्रेस कोड का बरं? महिलांना दिलेला ड्रेस कोड परिधान करण्यास सोयीस्कर आहे का नाही हे  देखील त्यांना विचारण्यात येत नाही.

बीच व्हॉलीबॉलच्या महिला खेळाडूंनी याबद्दल अनेक वेळा विरोध केला होता.

नॉर्वे महिला बीच व्हॉलीबॉल हा एकमेव खेळ नाहीये जिथे पुरुष आणि महिलांमध्ये भेदभाव केला जातो. इतरीही असे खेळ आहेत ज्या खेळांच्या कपड्यांमध्ये लैंगिकता दिसून येते.

फक्त जिम्नॅस्टिकमध्ये महिलांसाठी बिकिनी स्टाईल ड्रेस :

जर्मन खेळाडू, ज्यांनी रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये बिकिनीसारखे कपडे घालण्याऐवजी फुल-बॉडी सूट परिधान केले होते. त्यांचं म्हणन होतं की,  त्यांनी असे केले कारण स्त्रियांना जे आरामदायक वाटेल ते घालण्यास प्रोत्साहित करणे हेच उद्दिष्ट होतं.

टीमची मेंबर असणारी सारा वोस हिने पूर्वीही अशा ड्रेससाठी पुढाकार घेतला होता. त्याच वर्षी, सारा व्हॉसने युरोपियन आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये पूर्ण अंगभर  सूट घातला. नंतर, साराच्या हालचालीला आणखी दोन सहकारी खेळाडूंनी पाठिंबा दिला आणि पूर्ण शरीर बॉडीसूट घातला. तिच्या या धाडसी कृतीनंतर सारा प्रसिद्धीझोतात आली आणि महिला खेळाडूंव्यतिरिक्त परदेशी माध्यमांमध्येही तिचे कौतुक झाले होते.

जिम्नॅस्टिकमध्येही पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र ड्रेस कोड आहे. जिथे पुरुष एक जिम्नॅस्टिक पूर्ण बॉडीसूट घालतो ज्याला युनिटॅड म्हणतात. महिला जिम्नॅस्टिक लियोटार्ड घालते, ज्यात बिकिनी स्टाईलचा ड्रेस असतो आणि ती नितंबांपासून पूर्णपणे उघडलेली असते.

२०१९ मध्ये फ्रेंच ओपन दरम्यान, जेव्हा सेरेना विल्यम्स सूटमध्ये टेनिस कोर्टवर आली, तेव्हा त्यावर बरेच वाद झाले होते. जरी त्यामागचे कारण सांगितले गेले असले तरी, तो ड्रेस सेरेनाने गरोदरपणात ब्लड क्लॉट टाळण्यासाठी घातला होता. पण याआधीही महिला टेनिसपटू आणि पुरुष टेनिसपटूंच्या स्वतंत्र ड्रेस कोडवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.

हे अत्यंत दुर्दैवी आहे की महिलांसोबत सर्वसाधारणपणे खेळात अजूनही भेदभाव केला जातो. यासर्वांसाठी महिला खेळाडूंच्या खाजगी जीवनात रस घेणारी प्रसारमाध्यमे, क्रीडा संघटना आणि जनता तितकीच जबाबदार आहे.

हे हे वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.