२० पंडितांना मारून फाशी होईल म्हणणारा बिट्टा नंतर मोकाटच सुटला

”जर त्याने मला माझ्या भावाला किंवा आईला जरी मारायला सांगितलं असतं तर मी त्यांनाही मारलं असतं”

चेहऱ्यावर पश्चात्तपाचा थोडासुद्धा भाव न दाखवता बिट्टा कराटे अगदी थंड डोक्याने कॅमेरासमोर कबुली देत होता.

“मी किती जणांना मारले ते मला आठवत नाही, १०-१२ मारले असतील किंवा कदाचित २० मारले असतील. मी ज्यांना मारले त्यांच्यापैकी काही मुस्लिम होते पण बहुतेक काश्मिरी पंडित होते” 

 १९९० मध्ये जम्मूतील कोट भलवल तुरुंगात बंद असलेल्या बिट्टा कराटे एक जुन्या मुलाखतीत हे सगळी सुन्न करणारी माहिती देत होता.

 

न्यूजट्रकसाठी मनोज रघुवंशी यांनी हा इंटरव्ह्यू मनोज रघुवंशी यांनी घेतला होता. २०१७ मध्ये न्यूजलाँड्री मध्ये लिहलेल्या एका लेखात मनोज रघुवंशी या मुलाखतीबद्दल लिहतात,

”त्याच्या बोलण्यापेक्षा त्याच्या आवाजातला विश्वास आणि त्याच्या प्रतिसादातील उत्स्फूर्त आत्मविश्वास यावरून हे दिसून येत होतं की जम्मूच्या कोट भालवाल तुरुंगात असतानाही तो कोणाच्या दबावाखाली बोलत नव्हता.”

तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मुहम्मद सईद यांची कन्या रुबैया हिच्या अपहरणानंतर जानेवारी १९९० मध्ये काश्मिरी पंडितांची हत्या करण्यास पद्धतशीरपणे सुरू झाली होती. बिट्टा कराटे या हत्त्यांमागचं एक प्रमुख नाव असल्याचं सांगण्यात येत होतं. जून १९९० मध्ये अटक होईपर्यंत तो जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF)च्या टॉपच्या शूटर्सपैकी एक होता.

“मला जी काही शिक्षा होईल, ती मी मान्य करेन. मला वाटतं मला जन्मठेप होईल किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. मला वाटतं की फाशीची शिक्षा मिळेल, मी ती स्वीकारेन,” 

बिट्टा कराटे त्या मुलाखतीमध्ये म्हणाला होता.

बिट्टा १९९० ते २००६ अशी १६ वर्षे तो गजाआड होता. मात्र त्याच्यावरचे आरोप सिद्ध होत नव्हते. २००६ मध्ये त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

बिट्टाची सुटका करताना टाडा न्यायालयाचे न्यायाधीश एन.डी. वाणी म्हणाले होते,

 “न्यायालयाला याची जाणीव आहे की, आरोपींवरील आरोप किती गंभीर आहेत. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा अपेक्षित आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की खटल्याचा युक्तिवाद करण्यात फिर्यादी (सरकारी) पक्षाने पूर्ण अनास्था दाखवली आहे.”

पब्लिक सेफ्टी ॲक्ट (PSA) अंतर्गत त्याची अटक रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्याची सुटका झाली होती. सुटकेनंतर त्याचे काश्मीर खोर्‍यात फुल्ल जल्लोषात स्वागत झाले. JKLF ने  मिरवणूक काढत फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत त्याचे स्वागत केले होते.

पुन्हा २०१७ मध्ये इंडिया टुडेने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बिट्टा पाकिस्तानकडून पैसे मिळत असल्याचे सांगताना सापडला होता. 

त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी आणि विध्वंसक कारवायांसाठी निधी पुरवल्याच्या प्रकरणाच्या संदर्भात दोन काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांना २९ मे २०१९ रोजी दिल्लीतील मुख्यालयात बोलावले होते. त्यात बिट्टा कराटेचा देखील समावेश होता. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) नेता फारुख अहमद दार उर्फ ​​’बिट्टा कराटे’  हे त्या लिस्टमधलं एक नाव होतं.

२०१९ मध्ये पुलवामामध्ये लष्करावर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा पुन्हा बिट्टा कराटे याच्यावर  दहशतवादी फंडिंगचा आरोप झाला होता. त्यानंतर एनआयएने बिट्टा कराटेला अटक केली होती. या हल्ल्यानंतरच केंद्रातील मोदी सरकारने जेकेएलएफवर बंदी घातली होती. तेव्हापासून अनेक फुटीरतावादी नेते तुरुंगात आहेत.

कधीकाळी एका इशाऱ्यावर काश्मिरी पंडितांची हत्या करणारा बिट्टा कराटे आता जेकेएलएफचा नेता झाला आहे.

बिट्टा कराटेचं खरं नाव फारुख अहमद दार. कराटेमधील प्रवीणतेमुळे त्याला बिट्टा कराटे हे नाव पडलं. त्यानं पाकिस्तानमध्ये दहशतवादाची ट्रेनिंग घेतली होती. एक मात्र आहे, आज ३१ वर्षांनंतरही पंडितांची हत्या करणारे त्यांना त्यांच्याच मायभूमीतून हुसकवू लावणारे मोकाट आहेत…

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.