…आणि या मुळेच शशी कपूर अभिनेत्री नंदा बाबत कायम कृतज्ञ राहिला!

आपल्या संघर्षाच्या काळात ज्या ज्या व्यक्तींनी आपल्याला साथ दिली मदत केली त्या सर्वांबाबत कृतज्ञ राहणे हे नैसर्गिक भावना आहे. अर्थात प्रत्येक जण राहतातच असे नाही पण काही लोक आपल्या ‘स्टेपिंग स्टोन’ ला कधीच विसरत नाहीत.

यांच्यामुळेच आपण इतक्या उंचावर पोहोचलो याची सदैव जाणीव ठेवत असतात. असाच एक कलाकार होता शशि कपूर! कपूर खानदानात जन्म घेतलेला हा राजबिंडा कलावंत जेव्हा हिंदी सिनेमांमध्ये आला त्यावेळी सुरुवातीला सलग आठ ते दहा सिनेमांमध्ये त्याला अपयशाचा सामना करावा लागला. हळूहळू त्याच्यावर ‘फ्लॉप स्टार’ असे स्टॅम्पिंग होऊ लागले. त्याने जिद्द सोडली नाही.

१९६५ साली दिग्दर्शक सुरज प्रकाश एक चित्रपट बनवत होते, ‘जब जब फुल खिले’.

या सिनेमात नायक म्हणून त्यांनी शशी कपूर ला घेतले परंतु त्याकाळच्या आघाडीच्या नायिका शशी कपूर सोबत काम करायला फारशा उत्सुक नव्हत्या. कारण त्यांच्या मते शशी कपूर च्या नावाला मार्केट व्हॅल्यू नाही. पण अशाही परिस्थितीत त्या काळाची आघाडीची अभिनेत्री नंदा हिने शशी कपूर सोबत काम करायला होकार दिला.

तोवर नंदा त्या काळातील आघाडीची नायिका बनली होती. नंदा आणि शशी कपूरचा ‘जब जब फूल खिले’ हा चित्रपट १९६६ सालचा लोकप्रिय चित्रपट ठरला. यानंतर या जोडीचे अनेक चित्रपट येत राहिले. लवकरच ही जोडी प्रेक्षकांना आवडू लागली आणि यांच्या पुढच्या सर्व सिनेमांना यश मिळाले.

पुढे शशी कपूर ने देखील मोठे यश मिळवले. शशी नंदा यांनी एकून आठ सिनेमात एकत्र काम केले. चार दिवारी, मुहोब्बत इसको कहते है, जुआरी, नींद हमारी ख्व्वाब तुम्हारे, जब जब फूल खिले, रूठा न करो, मेहंदी रंग लायेगी, राजा साब. या दोघांवर चित्रित अनेक गाणी आजही रसिकांच्या मनात ताजी आहेत. ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे, ठहरीये होश में आ लू तो चले जाइयेगा, कभी तेरा दामन ना छोडेंगे हम, आपका चेहरा माशाअल्ला…

सत्तरच्या दशकात तर शशी कपूर अमिताभ बच्चन नंतरचा मोठा स्टार ठरला.

पण शशी कपूर ने कायम नंदाचा आदर केला. तिच्यामुळेच आपण या स्थानावर पोचलो आहोत याची जाणीव त्याला कायम होत असे. त्याने अनेक मुलाखती मधून याचा उल्लेख केला. ‘जब जब फूल खिले’ नंतर पंधरा वर्षांनी इस्माईल श्रॉफ यांचा ‘अहिस्ता अहिस्ता’ हा चित्रपट आला.

या चित्रपटात अभिनेत्री नंदा बऱ्याच वर्षानंतर चित्रपटात पुनरागमन करणार होती. ती चित्रपटात नायिका नव्हती पण नायिकेची आई होती. या चित्रपटाची नायिका होती पद्मिनी कोल्हापुरे आणि तिचा नायक होता शशी कपूरचा मुलगा कुणाल कपूर! कुणाल कपूर पहिल्या दिवशी जेव्हा सेटवर आला. त्यावेळी त्याने अभिनेत्री नंदाला पाहिले आणि तो घाईघाईने नंदापर्यंत आला आणि तिला वाकून नमस्कार केला.

नंदाला हा सर्व प्रकार नवीन होता तिने त्याला उठवले आणि विचारले,” अरे हे तू काय करत आहेस?” त्यावेळी कुणाल कपूर नम्रपणे म्हणाला ,”नंदाजी माझे वडील शशी कपूर, घरी कायम आपल्याबद्दल मोठ्या आदराने बोलत असतात. आपण आघाडीच्या अभिनेत्री असून देखील त्यांच्यासारख्या नवोदित कलाकारासोबत काम करायला होकार दिला.

हिंदी सिनेमात शशी कपूरला प्रस्थापित व्हायला मदत झाली. ते कायम असेही म्हणतात जर नंदाने माझ्यासोबत काम करायला नकार दिला असत तर कदाचित चित्रपटात यशस्वी व्हायला मला आणखी दहा वर्षे लागली असती! तुमचे खूप उपकार आहेत आमच्या घरावर!”

हे सर्व ऐकून नंदाच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. यशाच्या शिखरावर पोचल्यावर देखील शशी कपूर नंदाला विसरला नव्हता. त्याने त्याच्या पुढच्या पिढीला देखील आपल्या संघर्षाच्या काळात मदत केलेल्या कलाकारांची जाणीव करून दिली होती. जनरली लोक प्रस्थापित झाल्यानंतर आपल्या संघर्षाच्या काळाला पडद्याआड ठेवण्याचा प्रयत्न करतात पण शशी कपूर हा जातीवंत कलावंत होता त्याने नंदा बाबतच्या आपल्या भावना ह्या कायम लक्षात ठेवल्या.

शशीकपूर चा पहिला साईन केलेला चित्रपट चार दिवारी होता ज्याची नायिका नंदा होती.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.