मोदी दरवेळी असे इव्हेंट घेऊन येतात कि मोदी विरोधक असला तरी त्याला साजरा करावाच लागतो

गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा प्रोफाईल फोटो बदललाय आणि त्याजागी  तिरंगा ठेवला आहे. तर १३ ऑगस्टपासून अनेक जण आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकवत आहे. हे सगळं लोकं स्वतःहून करत नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा या आवाहनामुळे प्रभावित होऊन केलं जातंय.

देशातल्या प्रत्येक घरी तिरंगा फडकवून हर घर तिरंगा अभियान राबवण्यात यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं

पंतप्रधान मोदी यांनी २ ऑगस्टला प्रोफाइल फोटोला तिरंगा ठेवण्याचं आवाहन केलं होतं तर १३ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरी तिरंगा फडकवण्यात यावा असं आवाहन केलं होतं. त्यांनतर लोकांनी हे दोन्ही इव्हेंट साजरे करायला सुरुवात केलीय.

परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर तिरंगा डिपीला ठेवणे आणि प्रत्येक घरी तिरंगा फडकवणे हे पहिलेच इव्हेंट नाहीयेत. याआधी सुद्धा पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनांतर अनेक इव्हेंट लोकांनी साजरे केलेत.

त्या सगळ्या इव्हेंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या इव्हेंट्सची सुरुवात सेल्फी विद डॉटरने झाली होती.

१. सेल्फी विथ डॉटर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातुन बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाची सूरूवात केली होती. त्याचदरम्यान हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील बीबीपुर गावचे माजी सरपंच सुनील जगलान यांनी सेल्फी विथ डॉटर अभियान सुरु केलं होतं.

सुनील जगलान यांनी सुरु केलेल्या स्वतःच्या मुलीबरोबर सेल्फी काढण्याच्या ‘सेल्फी विथ डॉटर’ मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्धी दिली. पंतप्रधान मोदी यांनी देशभर सुरु केलेला हा इव्हेंट  सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या वतीने एकत्रीतरित्या साजरा करण्यात आला होता.

या अभियानात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यापासून नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस अशा सर्व पक्षातील नेत्यांनी सहभाग घेतला होता आणि आपल्या मुलीबरोबर फोटो काढून शेअर केला होता. 

२. व्होकल फॉर लोकल 

२६ जुलै २०२० ला नरेंद्र मोदींनी देशातील लोकांना व्होकल फॉर लोकलचं आवाहन केलं होतं. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये हे आवाहन केलं होतं. भारतात तयार होणाऱ्या वस्तू, कपडे खरेदी करण्यासाठी हे आवाहन करण्यात आले होते. 

व्होकल फॉर लोकलने भारतातील स्थानिक उद्योगांना चालना मिळेल आणि भारताची औद्योगिक भरभराट होईल असं मत पंतप्रधान मोदींनी मांडलं होतं.

अनेकांनी पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्थानिक आणि लघुउद्योगांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले होते. त्यात खादीचे कपडे, मधुबनी चित्र, हस्तउद्योगातल्या वस्तू खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला होता.

३. थाळ्या वाजवणे 

कोविड महामारीच्या सुरुवातीनंतर २२ मार्च २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. सकाळी ७ वाजता पासून रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन केले होते. जनता कर्फ्यूच्या संध्याकाळी ५ वाजता घराच्या दरवाज्यावर किंवा खिडकीतुन टाळ्या आणि थाळ्या वाजवाव्यात असेही आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देशभरातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला होता. देशातील नागरिकांनी आपल्या घराच्या गच्चीवर, दरवाज्यावर, बाल्कनीमध्ये उभं राहून टाळ्या, थाळ्या, घंट्या, शंख वाजवले होते.तर अनेकांनी सामुदायिकरीत्या रस्त्यावर येऊन टाळ्या, थाळ्या, घंट्या, शंख वाजवले होते.

४. दिवे, मेणबत्त्या लावणे 

कोविड महामारीच्या काळात पहिल्यांदा २१ दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात आला होता. २५ मार्च २०२० ला लावण्यात आलेला लॉकडाऊन १४ एप्रिल २०२० ला संपणार होता. 

पहिल्या लॉकडाऊनदरम्यान ५ एप्रिलला घरातल्या लाईट बंद खिडक्या किंवा दरवाज्यांवर दिवे, मेणबत्त्या किंवा टॉर्चच्या फ्लॅशलाईट लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. 

लॉकडाऊनदरम्यान लोकांचे धैर्य वाढवण्यासाठी ५ एप्रिल २०२० ला रविवारच्या रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी देशभरात लाईट बंद करण्यात आली. त्यांनतर अनेकांनी नऊ मिनिटांसाठी दिवे, मेणबत्त्या आणि टॉर्चच्या फ्लॅशलाईट लावल्या होता. 

५. टीका उत्सव (लसीकरण उत्सव)

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेमध्ये करोनाचे केसेस वाढू लागले होते. तेव्हा लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लोकांना टीका उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. 

११ एप्रिल २०२१ ला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंती दिनापासून १४ एप्रिल २०२१ म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदरम्यान ४ दिवस टीका उत्सव साजरा करण्यात आला होता. 

त्या टीका उत्सवादरम्यान ७० टक्के आरटी पीसीआर टेस्ट पूर्ण करणे आणि वॅक्सीनेशन पूर्ण करण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. 

याबरोबरच आता हर घर तिरंगा अभियानाचे आवाहन पंतप्रधानांनी केलेय.

२ ऑगस्ट रोजी भारतीय राष्ट्रध्वजाचे डिझायनर पिंगली व्यंकय्या यांची जयंती होती. त्यांच्या जयंतीचे निमित्त साधून २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान भारतीयांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या  प्रोफाइल फोटोला तिरंगा ठेवावा असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते. 

अनेकांनी पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपल्या वॉट्स ॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अकाऊंटच्या प्रोफाइल फोटो बदलले आणि त्या जागी तिरंगा ठेवला आहे.

भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगाचे आवाहन केलेय. त्यामुळे अनेक जण १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घराच्या अंगणात, छतावर किंवा बाल्कनीत फडकवत आहेत त्याचबरोबर देशातील बऱ्याच संघटना, स्वयंसेवी संस्था, कंपन्या तिरंगा फडकवत आहेत.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.