चंद्रशेखर यांनी ३९ वर्षांपूर्वी केली होती “भारत जोडो” यात्रा, त्यानंतर ते पंतप्रधान झाले..

बहुचर्चित राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेंचा शुभारंभ आजपासून झाला. उद्या कन्याकुमारीपासून सुरू होणारी ही यात्रा देशातल्या 12 राज्यातून आणि 2 केंद्रशासित प्रदेशातून जाणार आहे. पुढील 148 दिवसात पार पडणाऱ्या या पायी यात्रेमार्फत राहूल गांधी व इतर कॉंग्रेसचे नेते सुमारे 3 हजार 570 किलोमीटरचा प्रवास पायी करणार आहेत..

पण हे झालं आत्ताच, अशी यात्रा पहिल्यांदाच होत आहे का? तर नाही.. 

सुमारे 39 वर्षांपूर्वी भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी देखील अशीच पायी यात्रा केली होती. अन् या यात्रेमधून मिळालेल्या प्रेरणेतूनच चंद्रशेखर पुढे जावून भारताचे पंतप्रधान होवू शकले होते..

कशी होती चंद्रशेखऱ यांची भारत जोडो यांची यात्रा…

चंद्रशेखर यांच्या भारत जोडो यात्रेंच्या पुर्वइतिहास पहावा लागेल. तर तो काळ होता आणिबाणीचा. इंदिरा गांधींनी देशभरात आणिबाणी लागू केली होती. मात्र जानेवारी 1977 साली लोकसभेचा कार्यकाळ संपण्यापुर्वीचं इंदिरा गांधींनी आणिबाणी दूर करत देशात लोकसभेच्या निवडणूका घेण्याचं निश्चित केलं.

आणिबाणीला लोकांचा पाठींबाच होता या समजूतीतून इंदिरा गांधींनी हा निर्णय घेतला पण देशभरातला इंदिरा गांधींना विरोध करणारा गट जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एकवटला. जनता पक्षाने इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण निर्माण केलं आणि सुमारे 295 जागा जिंकल्या.

इंदिरा गांधींच्या विरोधात ही लाट निर्माण करण्यात प्रमुख वाटा होता तो चंद्रशेखर यांचा. जनता पक्षाने त्यांनाच पक्षाचं अध्यक्ष केलं होतं. त्यामुळे निवडणूकीनंतर आपणच पंतप्रधान होवू असा विश्वास चंद्रशेखर यांना होता..

पण निवडणूका झाल्या आणि चंद्रशेखर यांना डावलून मोरारजी देसाई यांना पंतप्रधान करण्यात आलं… 

मोरारजी देसाईंच्या मंत्रीमंडळात चंद्रशेखर यांनी मंत्रीपदाची धुरा संभाळावी अशी इच्छा अनेक नेत्यांना व्यक्त केली होती मात्र चंद्रशेखर यांनी मंत्री होण्यास नकार दिला.. पुढे जनता पक्षात फुट पडू लागली आणि अवघ्या दोन वर्षात जनता पक्षाचं सरकार कोसळलं..

त्यानंतर 1980 साली सातव्या लोकसभेसाठी निवडणूका झाल्या, यामध्ये ३५३ जागांवर विजयी होत इंदिरा गांधींनी सत्तेत पुनरागमन केलं..

मात्र या काळात जनता पक्षात हेवेदावे सुरू झाले. जनसंघासारखे अनेक पक्ष जनता पक्षातून बाहेर पडले. इंदिरा गांधींच्या विरोधात असणारा हा गट हळुहळू विभाजित होवू लागला. पक्षात सत्तासंघर्ष सुरू झाला व याच काळात पुन्हा जनतेत जावून सत्तेचा पाया मजबूत करण्यासाठी चंद्रशेखर यांनी भारत जोडो यात्रेची संकल्पना पुढे आणली..

तारिख होती ६ जानेवारी १९८३..

जिथून आज राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेची सुरवात होत आहे तिथूनच या यात्रेची सुरवात झाली होती.  केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यातून प्रवास करत दिल्लीच्या राजघाटावर समाप्त झाली. या पदयात्रेत ६ जानेवारी १९८३ ते २५ जून १९८३ या सहा महिन्यांच्या काळात तब्बल १७१ दिवसात ४२६० किमी अंतर पायी पार करण्यात आले होते. 

यात्रेच्या काळात चंद्रशेखर सिंग भारतातील अनेक प्रांतातील लोकांना भेटले. लोकांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. चंद्रशेखर यांनी सगळ्या समस्या अगदी आत्मीयतेने ऐकून घेतल्या. लोकांच्या समस्या अगदी मूलभूत गरजांच्या संदर्भात होत्या. कुणी उपाशी होतं तर कुणी आजारी.   

याच यात्रेकदरम्यान चंद्रशेखर यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग घडला…

चालत चालत ती यात्रा तमिळनाडूच्या डोंगराळ भागात पोहोचली होती. तेव्हा चंद्रशेखर पायवाटांच्या  आधारे आतल्या भागात प्रवास करत होते. त्यातीलच एका पायवाटेवर एक म्हातारी बाई आपल्या हातात कंदील घेऊन उभी होती. जेव्हा चंद्रशेखर हे तिच्याजवळ पोहोचले तेव्हा तिने केवळ दोन वाक्यात आपले म्हणणे मांडले होते. 

ती बाई एवढंच म्हणाली की, “देश स्वतंत्र होऊन ४० वर्ष झाली परंतु अजूनही पिण्याचं पाणी मिळालं नाही. अखेर केव्हा देणार पिण्याचे पाणी?”

त्या वाक्याने चंद्रशेखर सिंग यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यांना पाण्याच्या समस्येची जाणीव झाली. ती यात्रा संपल्यानंतर एक बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत त्यांनी पिण्याचा पाण्याचा मुद्दा सगळ्यात आधी मांडला होता. 

त्या बैठकीत चंद्रशेखर सिंग म्हणाले की, “अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि उपचार यांसारख्या मूलभूत सुविधांशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. सरकारी आकडे जे काही सांगत असतील मात्र देशातील जनता या मूलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे.” 

१९८९ मध्ये परत एकदा काँग्रेसला पराभवाचं तोंड पहावं लागलं. पुन्हा एकदा जनता दलाचं सरकार आले मात्र यावेळी देखील चंद्रशेखर यांच्या पदरी निराशा आली. व्ही. पी. सिंग यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

मात्र पंतप्रधान पदाची माळ कधीना कधी चंद्रशेखर यांच्या गळ्यात पडणारच होती. व्हिपी सिंग यांच्या काळात अडवाणींना अटक झाल्यामुळे भाजपने आपला पाठींबा काढून घेतला. देशात अस्थिरतेच वातावरण निर्माण झालं, व्हिपी सिंग यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला..

अशा वेळी सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय राजीव गांधी यांनी घेतला. कॉंग्रेसच्या पाठींब्यावर जनता दलाच सरकार पुन्हा सत्तेवर आलं,

यावेळी पंतप्रधान होते चंद्रशेखर…

सत्तेतला अनिश्चितेचा काळ, स्वत:ची राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी चंद्रशेखर यांना भारत जोडो यात्रेंचा फायदा झाला होता. असाच फायदा राहूल गांधींना होईल का हे येणारा काळच ठरवेल..

हे ही वाच भिडू  

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.