शिंदे गट जरी बरोबर असला तरी भाजपाला मुंबईत मनसेची गरज लागणारच कारण….

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाल्याच्या बातम्या काल   प्रसिद्ध झाल्या. अतिशय गुप्तपणे ही भेट झाल्याचं सांगितलं गेलं. मात्र दोन्ही बाजूने नंतरअशी कोणतीही भेट झालं नसल्याचं  सांगण्यात आलं. पण  महाराष्ट्राने एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांनी वेषांतर करून घेतलेल्या भेटीचे किस्से ऐकले असल्यामुळे या स्पष्टीकरणा नंतरही भेटीच्या चर्चा काही थांबल्या नाहीत.

विशेषतः येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता अशी भेट झाली असेल तर तिला एक वेगळं महत्व प्राप्त होतं. 

राज ठाकरेंनी हार्डकोअर हिंदुत्वाची लाइन धरल्यानंतर मनसे -भाजप युती होणार हे जवळपास फिक्स मानलं जात होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपमध्येसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने यामध्ये ट्विस्ट निर्माण झाला. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या पाठिंब्यामुळे भाजपाला मनसेची गरज लागेल का? यावर अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या.

मात्र एकनाथ शिंदेंना आपल्याकडे वळवल्यानंतरही भाजपाला पाठिंब्याची गरज लागेलच याची बरीच  सांगण्यात येत आहेत त्यातील महत्वाची पाच कारणं पाहुयात.

पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे मनसेची मतं…

२०१७ची  मुंबई महानगरपालिकेची भाजप आणि शिवसेना यांनी वेगवेगळी लढवली होती. भाजप आणि शिवसेना यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सेनेला ८४ तर भाजपला ८२ उमेदवार निवडून आणता आले होते.

भाजपने पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत २०१२ निवडणुकीमधला आपला ३५ नगरसेवकांचा आकडा थेट ८२ वर नेउन ठेवला होता. मात्र तरीही त्यांना विरोधात बसावं लागलं होतं. एकूण मतदानातही दोन्ही पक्षांमध्ये फक्त ५०,००० मतांचा फरक होता. भाजपाला २७.२८% तर शिवसेनेला २८.२९ टक्के मतं मिळाली होती.

एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने भाजपला फायदा होईलच. 

त्याचबरोबर सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, यामिनी जाधव, दिलीप मामा लांडे, प्रकाश सुर्वे हे शिंदे गटातील आमदार आल्याने शिवसेनेची काही मतं भाजपाला मिळतीलच. पण सेनेचं मुंबईतलं मजबूत संघटन, एकनाथ शिंदेचा मुंबईमध्ये असलेला मर्यादित प्रभाव यामुळे ते नेमकी किती मतं आणतील याची शाश्वती नाही.  त्याचवेळी जर महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली तर भाजपाला आपला महापौर बसवणं अवघड जाऊ शकतंय. 

गेल्या निवडणुकीतील सेनेची २८.२९ टक्के  काँग्रेसची १७.९३ टक्के आणि राष्ट्रवादीची ४.७५ टक्के अशी मतदानाची टक्केवारी जरी लक्षात घेतल्यास महाविकास आघाडीची एकूण मतं ५० टक्क्यांच्यावर जातात. अशावेळी खात्रीशीर मतं आणणाऱ्या एका मित्रपक्षाची भाजपाला गरज लागू शकतेय. त्यावेळी मनसे हा एकंच ऑप्शन राहतो. 

मनसेने गेल्या निवडणुकीत ७.७३% मतं घेतली होती. 

विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी काही कारणांमुळे त्यावेळच्या निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतला नव्हता. मनसे आणि भाजप यांचा मागच्या निवडणुकीत असलेला मतांचा आकडा ३५% मतांचा होतो आणि याला राज ठाकरेंच्या झंझावाती प्रचाराची जोड मिळाली तर हा आकडा निश्चितपणे वाढू शकतो.

दुसरं महत्वाचं कारण म्हणजे शिवसेनेच्या भाजपचा महाराष्ट्रपासून मुंबई तोडण्याचा डाव असल्याच्या आरोपाला काउंटर करण्यासाठी फक्त राज ठाकरेंचाच ऑप्शन राहतो.

सेना महाविकासआघाडीमध्ये गेल्यापासून मुंबईला स्वतंत्र करण्याचा ,मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव आहे अशी टीका करत स्वतः उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धारेवर धरले होते. त्याच्याबरोबर मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात आलेली गिफ्ट सिटी यामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत सापडले आहे.

यात भर पडली शिंदे गटाच्या आमदारांचं बंडखोरी करून सुरतला जाणं. या सर्व गोष्टींमुळे सेनेला मराठी अस्मितेचा आणि मुंबईचा मुद्दा पुढं करून भाजपाला टार्गेट करणं सोपं होणार आहे.

अशावेळी आता जरी ‘हिंदुजनानायक’ झाले असले कधीकाळी ‘मराठी हृदयसम्राट’ बिरुद ज्यांना लावण्यात येत होते ते राज ठाकरे भाजपच्या कामी येऊ शकतात. मनसे आणि मराठी माणूस हे इक्वेशन अजूनही लोकं विसरलेले नाहीत. त्यामुळे जेव्हा राज ठाकरे भाजपबरोबर स्टेज शेअर करतील तेव्हा भाजप मराठी माणसांच्या विरोधात आहे या आरोपाला तितकीशी धार राहणार नाही.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मनसेनं स्वीकारलेलं हिंदुत्व

२३ जानेवारी २०२० ला रोजी राज ठाकरे यांनी पक्षाच्या झेंड्याचा नुसता रंग बदलून त्याला भगवा केलं नाही तर हिंदुत्व हा पक्षाचा प्रमुख मुद्दा बनवला.

येत्या काळामध्ये आपल्या पक्षाची राजकीय आणि सामाजिक भूमिका काय असे याचीसुद्धा कल्पना दिली होती. त्यानुसार मनसेने मशिदीवरील भोंगे, अयोध्येतील राम मंदिर या मुद्यांवर लक्ष केंद्रित केलं. त्यामुळं भगवी शाल गुंडाळलेल्या राज ठाकरेंच्या या नवीन हार्डकोअर हिंदुत्ववादी नेत्याच्या इमेजचा फायदा सगळ्यात जास्त भाजपाला होऊ शकतोय.

याआधी अमराठी मतदानाचं महत्व लक्षात घेऊन भाजपला मनसेशी युती करण्यात अडचण येत होती मात्र हिंदुत्ववादी मनसेशी युती करणं त्यांना शक्य झालं आहे. 

तसेच राज ठाकरेंच्या भाषणातील मोदी विरोधही केव्हाच मावळला आहे. उलट काश्मीर, राममंदिर या मुद्यांना पकडून त्यांनी अनेकदा मोदींची स्तुतीच केली आहे. यामुळे भाजपाला आता मनसेशी युती करण्यात तितकीशी अडचणही आता नसणार आहे.

शिवसेनेच्या मराठी मतांच्या वोटबँकेला सुरुंग लावण्यास मनसेचा पर्याय

साऊथ मुंबईमधील लालबाग, दादर, माहीम असू दे की उपनगरातील भांडुप, विक्रोळी या मराठी बहुल भागात कित्येक वर्षे सेनेचा एक हाती दबदबा राहिला आहे. अलीकडच्या काळात मुंबईमधील मराठी बहुल भागात सेनेला फाइट फक्त एकाच पक्षाने दिली होती ती म्हणजे मनसे.

२००९ मध्ये जेव्हा मनसेचे १४ आमदार निवडून आणून मनसे यशाच्या शिखरावर होती तेव्हा याच भागातून मनसेने भरभरून मतं घेतली होती आणि याचा फटका सेनेला बसला होता. मात्र त्यानंतर सेनेनं पुन्हा कमबॅक करत मराठीबहुल भागात आपलं प्रस्थ पुन्हा बसवलं होतं.

दुसऱ्या बाजूला भाजपने उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांत आपली हक्काची वोटबँक बनवली आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ३७ अमराठी नगरसेवक महानगरपालिकेत पाठवले होते. मात्र मराठी मतदारांमध्ये तितकासा भाजपाला स्ट्रॉंग होल्ड बसवता आलेला नाहीये. 

अशावेळी सेनेच्या मराठी वोटेबँकेला खिंडार पाडणे आणि ती मतं आपल्याकडे वळवणे यासाठी मनसेशी युती हा भाजपसाठी एक चांगला आणि एकमेव ऑप्शन आहे.

शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मनसेशी लॉन्ग टर्म युती करण्यासाठीची लिटमस टेस्ट 

मनसे आणि भाजप युती होईल अशा चर्चा मागच्या एक दीड वर्षांपासून सारख्या होत आहेत मात्र भाजपने याबाबतीत सावध भूमिका घेतल्याचे दिसते. अशावेळी मुंबई महानगरपालिकेत युती करून भाजप मनसेशी दीर्घकालीन आणि पूर्ण महाराष्ट्रभर युती करता येइल का? चाचपून पाहू शकते.

रोकठोक स्वभावाच्या राज ठाकरे भाजपसोबत ज्युनियर पार्टनर म्हणून राहू शकतात का हे सुद्धा भाजपाला या निवडणुकीच्या निमित्ताने पाहता येऊ शकते. त्याचबरोबर राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतदान होत नाही असा आरोप नेहमी होत असतो त्यामुळे  मनसेशी युती केली मतदानात वाढ होईल का ? हे सुद्धा भाजप मुंबई निवडणुकीच्या निमीत्ताने चेक करू शकते.

त्यामुळे मनसेशी युती करणे हा भाजपाला फायद्याचा सौदा असल्याचं दिसतं. त्यामुळे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी भाजप-माणसे युतीचा मुहूर्त साधला जाणार का हे येणाऱ्या काळातच कळेल.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.