एकदा नाही दोनदा चिन्ह गेलं तरी इंदिरा गांधींनी काँग्रेस गांधी घराण्याकडेच कायम ठेवली

इंदिरा गांधींचे सल्लागार रोमेश थापर यांची पत्नी राज थापर यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल एक अनुभव लिहून ठेवला आहे. दिल्लीमध्ये एकदा टॅक्सीने जात असताना त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरला विचारले, “तुम्ही कोणाला मत देणार ?  त्यावर क्षणाचाही विलंब न लावता तो टॅक्सीवाला उत्तरला  ‘आम्ही सर्व टॅक्सीवाल्यांनी इंदिराजींनाच मत देण्याचं ठरवलं आहे.’  त्यावर ‘म्हणजेच काँग्रेस ना?’ असा प्रतिप्रश्न थापर यांनी केला.

‘नाही. अर्थातच नाही. आम्ही काँग्रेसला मत देणार नाही. आम्ही इंदिरा गांधींनाच मत देणार ‘

१९७१ च्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या जनमानसावर केवढा प्रभाव होता हे सांगणारा हा किस्सा. यात काँग्रेस आणि इंदिरा गांधी असा फरक केला आहे आणि यामागचं कारण होतं काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट आणि त्यानंतर पक्षाचं गोठवण्यात आलेलं चिन्ह. तरी इंदिरा गांधी यांनी राजकीय चातुर्य आणि चिकाटी दाखवत अशा प्रसंगातून मार्ग काढत पुन्हा पक्ष उभारला आणि काँग्रेस म्हणजे गांधी- नेहरू हेच इक्वेशन राहील याची काळजी घेतली.

विशेष म्हणजे दोन इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात दोनदा असा प्रसंग घडला होता.

याची सुरवात झाली होती इंदिरा गांधी यांची पहिल्यांदा पंतप्रधानपदी निवड होण्यापासून. ज्या परिस्थितीत इंदिरा गांधी यांची पंतप्रधानपदी निवड झाली होती तेव्हा पासूनच पक्ष ताब्यात ठेवण्यासाठी इंदिरा गांधी याना संघर्ष करावा लागणार हे स्पष्ट होतं.

लालबहाद्दूर शास्त्री यांच्या अकाली जाण्यानंतर इंदिरा गांधी यान पंतप्रधानपदी बसवण्यात आलं होतं. बसवण्यात आलं यासाठी म्हटलं जातं कारण इंदिरा गांधी कमकुवत आहे त्यामुळे त्याना खुर्चीत बसवून सत्ता आपल्याच हातात राहील अशी त्यावेळी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची धारणा होती. त्यामुळे नेहरूंची ”गुंगी गुडिया” असं हिणवलं जात होतं त्या काळात इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या.

त्यांच्या नेतृत्वाखाली पहिली निवडणूक पक्षाने लढली ती 1967मध्ये. ही निवडणूक काँग्रेसने जिंकली पण इंदिरा गांधी त्यात कुठंच नव्हत्या.

मात्र थोड्याच दिवसात इंदिरा आणि मात्र घडलं उलटंच सत्तेत बसल्यानंतर या जेष्ठांच्या मनानुसार कारभार चालवण्यास इंदिरा गांधी यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे दोन्ही गटात खटके उडण्यास सुरवात झाली.

हा वाद टोकाला गेला तो राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी दरम्यान.

संजीव रेड्डी या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास नकार देत इंदिरा गांधींच्या गटाने काँग्रेस खासदार आणि आमदार यांना सद्सद विवेक बुद्धीने मतदान करण्यास सांगून व्हीव्ही गिरी यांना उघडपणे पाठिंबा दिला. त्यामुळे संजीव रेड्डी यांचा काँग्रेसकडे जवळपास ५२% मतं असूनदेखील पराभव झाला.

त्यातच अर्थमंत्री मोरारजी देसाई यांना विश्वासात न घेताच बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णयही इंदिरा गांधी यांनी घेऊन टाकला. पराभवानंतर चिडलेल्या काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला.

मात्र त्यानेही इंदिरा गांधी खचल्या नाहीत. त्यांनी जेष्ठांनी डावलल्यानांतर आपल्याभोवती नवीन नेत्यांची, प्रशासकीय अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांची टीम बांधली आणि काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी त्यांनी काँग्रेस – आर म्हणजे रिक्विझिशनिस्ट असा गट स्थापन केला.

रिक्विझिशनिस्ट म्हणजे स्वतंत्र मागणारे.

मात्र काँग्रेसचे जेष्ठ नेते ज्यामध्ये के कामराज, निंजिंगलाप्पा, मोरारजी देसाई यांचा गट जो काँग्रेस (वो) ची संघटना अजूनही आपल्या हातात ठेवून होता तो गट सिंडिकेट म्हणून ओळखला जाऊ लागला. नवा पक्ष स्थापन केल्यानंतर इंदिरा गांधींनी  काँग्रेसचं बैलजोडीचे निवडणूक चिन्ह मिळवण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्या निवडणूक चिन्हावर काँग्रेसने (ओ) देखील दावा केला होता. काँग्रेस (ओ) चे बहुतेक सदस्य स्वातंत्र्यसैनिक होते. तसेच ते दीर्घकाळ पक्षाचे सदस्य होते. त्यामुळे बैलजोडी असलेले निवडणूक चिन्ह आपल्या पक्षाला द्यावे अशी त्यांची मागणी होती.

अखेर इंदिरा गांधी यांना चिन्ह मिळालंच नाही. बराच विचार करून त्यांनी गाय आणि वासरू हे आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह बनवलं. इंदिराजींनी त्यांच्या पक्षाचे नवीन निवडणूक चिन्ह गाय आणि वासरू यासाठी जोरदार प्रचार केला. एक ब्रँड म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यामुळे लोकं इंदिरा म्हणजेच काँग्रेस असं म्हणू लागले. त्यातच बॅंकाचं राष्ट्रीयकरणासारख्या मुद्यांना पुढे करून त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला.

मात्र इंदिरा ब्रँड हा १९७१च्या  लोकसभा निवडणुकांतही दिसणार होता आणि हे लक्षात घेऊन इंदिरा गांधींनी प्रयत्नही तसेच केले.

आठ आठवडे चाललेल्या या प्रचारदौऱ्यात इंदिरा गांधींनी प्रयत्नांची पराकाष्टा केली.जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून ते निवडणुका होईपर्यंत म्हणजे मार्च महिन्यापर्यंत इंदिरा गांधींनी विमानाने ३०००० मैल प्रवास केला. त्यांनी एकंदर ३१० प्रचारसभांमध्ये भाषणं केली. त्यांच्या सभेसाठी गावोगावचे लोक कित्येक मैलांचे अंतर पार करून येत असत. नेहरूंनी त्यांच्या उमेदी काळातही कधी एवढे झंझावाती प्रचारदौरे केले नव्हते असं त्या काळात बोललं गेलं.

१९७१ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालात इंदिरा गांधींच्या या झंझावाती प्रचाराला यश आल्याचं दिसत होतं.

निवडणुकीचा निकाल इंदिरा गांधींच्या बाजूने लागला होता. त्यांनी अभूतपूर्व विजय मिळाला होता. त्यांच्या काँग्रेस (आर) या पक्षाला लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळाले. त्यांच्या पक्षाला लोकसभेच्या ३२५ जागा मिळाल्या. १९६७ साली कॉंग्रेस पक्ष एकसंध असताना त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्याहूनही आता सत्तर जागा त्यांनी जास्तच पटकावल्या होत्या. त्यामुळे चिन्ह जाऊनही इंदिरा गांधी यांनी खरी काँग्रेस कोणाची हे सिद्ध करून दाखवलं होतं आणि काँग्रेस म्हणजे नेहरू -गांधी फॅमिली हे इक्वेशन पुन्हा मजबूत झालं.

मात्र ही पकड जास्त वेळ चालली नाही इंदिरा गांधी यांनी १९७५ ला आणीबाणीची घोषणा करण्यात आल्यानंतर त्यानं देशभरातून विरोध होत असताना पक्षांतर्गत देखील विरोध झाला. त्यातच १९७७च्या निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा दारुण पराभव झाला. स्वतः इंदिरा गांधीही हरल्या. त्यातून काँग्रेसमध्ये पुन्हा विरोध झाला आणि 1979मध्ये इंदिरा पुन्हा एकदा काँग्रेसमधून बाहेर पडल्या.

यावेळी त्यांना जुनं चिन्हं मिळालं नाही.

असंही सांगितलं जातं कि विरोधकांकडून गाय वासरू चिन्हांवरून इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची तुलना केली जात असल्याने  इंदिरा गांधी सुद्धा ते चिन्ह घेण्यास उत्सुक नव्हत्या. शेवटी मग त्यांनी निवडणूक आयोगाकडून हाताचा पंजा हे चिन्ह घेतलं आणि पुन्हा नव्या जोशाने निवडणुकीला सामोरे गेल्या.

आणीबाणीच्या दरम्यान झालेले अत्याचार, संजय गांधी यांची बेबंदशाही, शहा कमिशनच्या बाजूने इंदिरा गांधी यांची झालेल्या चौकश्या यामुळे १९८०ची लोकसभा निवडणूक इंदिरा गांधी यांच्यासाठी सोपी नव्हती.

१९८० सालच्या जानेवारी महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी इंदिर गांधींनी पुन्हा भारताचा  झंजावाती दौरा केला. एकंदर ६२ दिवसांत त्यांनी ४०,००० मैल प्रवास केला. रोजी दोन प्रचार सभांमध्ये त्या भाषण करत. इंदिरा गांधींच्या राजकीय कारकिर्दीतील  हा सर्वात कष्टप्रद सर्वांत मोठा आणि अखेरचा प्रचारदौरा होता.

या वेळी उत्तर प्रदेशातील आपल्या जुन्या रायबरेली मतदारसंघाबरोबरच आंध्र प्रदेशातील मेढक येथूनही इंदिराजींनी उमेदवारीचा अर्ज भरला.

दोन्ही मतदारसंघांमधून त्या प्रचंड बहुमताने निवडून आल्या. संपूर्ण देशातून काँग्रेसला प्रचंड मतांनी विजय प्राप्त झाला. लोकसभेच्या ५४८ जागांपैकी ३५१ जागा इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने जिंकल्या. निवडणुकीनंतरची ‘टाइम्स ऑफ इंडिया’ची हेडलाईन   “इंदिरा सर्वत्र विजयी’ ही त्यांच्या विजयाबद्दल बरंच काही सांगून जात होती.

निवडणुकीनंतर १४ जानेवारी १९८० रोजी इंदिराजींनी परत एकदा चौथ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली व त्यानंतर लगेच १ सफदरजंग रोडवरील आपल्या जुन्या घरी त्या राहायला गेल्या.

निवडणुकीच्या निकालानंतर एका स्कँडिनेव्हियन पत्रकाराने इंदिराजींना विचारले ” परत एकदा भारताचं नेतृत्व हाती आल्यावर आता कसं वाटतंय?” त्यावर इंदिराजी रागाने उत्तर दिला

“भारताचे नेतृत्व मी नेहमीच करत आले आहे.”

आणि इंदिरा गांधींचं हे उत्तर त्यांनी केलेल्या संघर्षाबद्दल बरंच काही सांगून जात होतं.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.